shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साहित्यिक श्रावण सहलशिवऊर्जेने झाली तेजोमय

पुणे / प्रतिनिधी:
रायरेश्वराचा निसर्ग, डोंगराने पांघरलेली हिरवी शाल, पावसाची सर, डोंगर माथ्यावरून वाहणारे धबधबे, खळखळणारे पाणी, सूर्याची किरणे, सभोवती पठारावर फुलांची सुंदर सजावट, दरीच्या जवळून उंच चढत जाणारी पाऊलवाट आणि येताना धुक्यांनी पांघरलेली चादर तसेच ऐतिहासिक शिवमंदिर व शिवरायांनी रक्त सांडून घेतलेली स्वराज्याची शपथ साहित्यिक मनांना विचार, प्रेरणा, आनंद तसेच ऊर्जा देणारे दृश्य ठरले. याचे निमित्त होते. साहित्य सम्राट पुणे संस्थेची दरवर्षीप्रमाणे साहित्यिक सहपरिवार श्रावण सहल. 
पुणे - सातारा बॉर्डरवर ऐतिहासिक रायरेश्वर पठार या निसर्गरम्यस्थळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोद अष्टुळ यांनी सहल आयोजित केली होती. 

ही संस्था गेली तेरा वर्ष विविध उपक्रमांद्वारे साहित्यसेवा आणि मराठी भाषा संवर्धनाचे कार्य करत आहे. त्यातीलच हा एक सुप्रसिद्ध राज्यस्तरीय साहित्यिक श्रावण सहल उपक्रम आहे. या श्रावण सहलीत, निसर्ग सानिध्यात, ऐतिहासिक शिव मंदिराचे दर्शन, रुद्राक्ष वृक्षारोपण आणि २०८ वे कवी संमेलन माननीय निसर्गकवी लक्ष्मण शिंदे निवृत्त वनाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली रायरेश्वर पठारावर निसर्गरम्य ठिकाणी अतिउत्साहात पार पडले. कवी संमेलनास प्रमुख अतिथी म्हणून कर्नल शरदचंद्र पाटील आणि राहुल निकम वनाधिकारी हे लाभले होते. यावेळी कर्नल असे म्हणाले की, शहाजीराजांच्याकडून बाळकडू घेऊन शिवरायांनी ज्यावेळेस स्वराज्याची शपथ घेतली. त्यावेळी सगळे सरदार मराठी, राजपूत, मुसलमान असे कुणीही आपापली जहागिरी सांभाळताना प्रजेवर प्रचंड अन्याय करायचे. सगळे सरदार एका शाहीतून दुसऱ्या शाहीकडे पळायचे. म्हणून शिवाजी महाराजांनी शपथ घेताना स्वराज्याबद्दल, स्वतःबद्दल व्याकुळता आणि धग प्रजेच्या मनामध्ये निर्माण केली. त्यामुळेच छत्रपती शिवाजीराजे, संभाजीराजे, ताराबाई, पेशवाई गेल्यानंतर सुद्धा हातावर शीर घेऊन तीस वर्ष औरंगजेबाशी महाराष्ट्रातील प्रजा लढत राहिली. ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये महाराजांनी स्वराज्याची शपथ घेऊन रुजवली तसेच पेटवली होती. यानंतर अध्यक्षीय भाषणात लक्ष्मण शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, समस्या सोडवताना किंवा डोंगर चढताना फक्त छत्रपतींचा जयघोष करा कसलीच अडचण येत नाही. निसर्गाने आपल्याला भरभरून दिले आहे. निसर्गात डोळे उघडे ठेवून फिरा असे ते म्हणाले.
या कवी संमेलनात ज्येष्ठ कवी बाळकृष्ण अमृतकर यांना साहित्य सम्राट समाज भूषण पुरस्कार २०२५ देऊन गौरविण्यात आले. शिवप्रेमी आणि सर्पमित्र खलील शेख, गायक किशोर कसबे, विजयराज जाधव, अलका जोगदंड, आशा शिंदे, प्रल्हाद शिंदे, बालकवी प्रेम ताम्हाणे, संदीप परदेशी, शाहीर भाऊराव साळवे, बा.ह. मगदूम, दत्तू ठोकळे, रामचंद्र पाचूरकर, विजय जाधव, बाळासाहेब गिरी, प्रतिमा गुरव, शरयू पवार, विनोद ताम्हाणे, आनंद गायकवाड, सुभाष उमरकर, किशोर टिळेकर, अस्मिता रांजणे बालकवी, सुनंदा अमृतकर, शुभम बाबर, गणेश मानकर, अशोक भांबुरे, सूर्यकांत नामूगडे आणि अर्चना अष्टूळ अशा चाळीस दिग्गज कवी कवयित्री व सहल प्रेमींनी या कवी संमेलनामध्ये आपल्या निसर्ग आणि ऐतिहासिक काव्यरचना सादर करून सहल रसिकांची हसत खेळत, मोठ्या जल्लोषात, टाळ्यांच्या गजरात वाहवा मिळवली. सर्व कवी संमेलन शिवमय झाले. 
हे कवी संमेलन सुरू होण्यापूर्वी पंचपक्वान्न नव्हे तर घरगुती पचासपक्वान्न एकत्र करून पठारावरील आमटी भाताच्या प्रसादासह वनभोजनाचा येथेच्छ आस्वाद प्रत्येकाने घेतला. कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रस्तावना विनोद अष्टुळ यांनी, कवी संमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन गजानन उफाडे यांनी तर आभार  प्रतिभा मगर यांनी व्यक्त केले.

*वृत्त विशेष सहयोग
साहित्यिक विनोद अष्टुळ - पुणे 

*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
close