झटका तारेच्या सापळ्यातून सुटू न शकल्याने कुटुंबाचा अंत...
एरंडोल – तालुक्यातील वरखेडी शिवारात बुधवारी (दि. २० ऑगस्ट २०२५) पहाटे उघडकीस आलेल्या एका दुर्दैवी घटनेने परिसर शोकमग्न झाला. वीजेचा धक्का लागून एकाच आदिवासी कुटुंबातील तब्बल पाच जणांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे शेतकरी बंडू युवराज पाटील (रा. वरखेडी) यांनी नेहमी प्रमाणे सकाळी शेतावर गेल्यावर हा हृदय पिळवटून टाकणारा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला.
शिवारात वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी शेताच्या चारही बाजूस झटका तार टाकण्यात आला होता. या तारांमध्ये शेतातील डी.पी. वरून अवैधरीत्या वीजप्रवाह सोडण्यात आला होता. रात्रीच्या अंधारात त्या तारा न दिसल्याने आदिवासी कुटुंबातील पाच जणांचा वीजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला.
या घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे अशी आहेत –
विकास रामलाल पावरा (वय ४५ वर्षे)
सुमन विकास पावरा (पत्नी, वय ४२ वर्षे)
पवन विकास पावरा (मुलगा)
कवल विकास पावरा (मुलगा)
सासू – नाव समजून आले नाही
हे सर्व मुळचे ओसरणी, ता. खकना, जि. बऱ्हाणपूर (मध्यप्रदेश) येथील रहिवासी असून नातेवाईकांना भेटण्यासाठी पायी जात असताना या दुर्घटनेला बळी पडले. मात्र नियतीच्या खेळात अवघी दिड वर्षांची दुर्गा विकास पावरा चमत्कारिकरीत्या वाचली.
“आई-बाबा गेले… पण दुर्गा देवदूतासारखी वाचली”
वरखेडी शिवारातील या हृदयद्रावक घटनेत पाच निरपराध जीव वीजेच्या धक्क्याने गमावले गेले. पण या काळ्याकुट्ट शोककाळात अवघी दिड वर्षांची चिमुरडी दुर्गा विकास पावरा जीवंत राहिली.आई-वडील,भाऊ, आजी सगळ्यांना हरवूनही तिच्या चेहऱ्यावर निरागसतेचे हास्य आहे. आता या निष्पाप लेकराला भविष्यात कोणाचा आधार मिळणार? हा प्रश्न आजूबाजूच्या प्रत्येकाच्या मनात अस्वस्थता निर्माण करणारा आहे. गावकऱ्यांच्या मते –“दुर्गा देवाच्या कृपेने वाचली, पण तिचं आयुष्य आता समाजाने उचलून धरायला हवं.”
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच एरंडोल पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वीज वितरण कंपनीचे उप कार्यकारी अभियंता रामपाल गेडाम व कक्ष अभियंता उमेश वाणी यांनी अनधिकृत वीज जोडणीबाबत पंचनामा केला.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अतिरिक्त पोलीस उप अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड तसेच प्रांताधिकारी मनिषकुमार गायकवाड आणि तहसीलदार प्रदीप पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन संपूर्ण माहिती घेतली.
सध्या या प्रकरणात एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात येत असून, मृतदेहांचे शवविच्छेदनासाठी जळगाव सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
( अधिकृत सूत्रांची माहिती..)