प्रतिनिधी – राहाता
साकुरी येथे शेजाऱ्यांच्या शेतातील वेड्या बाभळीच्या झाडावरून सुरू झालेला वाद धक्कादायक वळणावर पोहोचला आहे. केवळ झाड माझ्या घरावर पडून जीवितहानी होऊ शकते म्हणून साधेपणाने व प्रेमाने समजावून सांगणाऱ्या ७० वर्षीय वृद्धास निर्दयी शेजाऱ्यांनी मारहाण करून जीव घेण्याची धमकी दिली.
🌪️ धोकादायक झाड आणि वृद्धाची आर्त विनंती
२४ जुलै २०२५ रोजी बाबासाहेब कृष्णाजी बनसोडे हे आपल्या शेजाऱ्यांना – आकाश दत्तात्रय बनसोडे, संभाजी मोगल बनसोडे व अभिजीत अनिल बनसोडे – यांना समजावू लागले.
“तुमच्या शेतातील वेड्या बाभळीचे झाड माझ्या घरावर लोंबकळत आहे. वारा-पावसात झाड पडले तर माझ्या घराचे व बालबच्च्यांचे जीवित धोक्यात येईल. गरीब परिस्थितीमुळे घर पडले तर मी पुन्हा उभारू शकणार नाही.”
ही सत्य व आर्त विनंती ऐवजी आरोपींनी वृद्धावर उलट संताप व्यक्त केला.
🍻 दारूच्या नशेत निर्दयी हल्ला
विनंतीचा राग धरून आरोपींनी दारूच्या नशेत या वयोवृद्धाला निर्दयपणे मारहाण केली. इतकेच नव्हे तर “तुला जिवंत ठेवणार नाही” अशी सरळ जिवे मारण्याची धमकी दिली. त्या क्षणी आरोपींच्या हातात धारदार शस्त्रेही होती.
परंतु “देव तारी त्याला कोण मारी” या म्हणीप्रमाणे बाबासाहेब कसाबसा जीव मुठीत धरून झाडीत लपून सुटला. लगेच राहाता पोलिसांत तक्रार नोंदवून ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतले.
⚠️ पूर्ववैमनस्य आणि दहशतवादी प्रवृत्ती
सदर आरोपींचा हा पहिलाच प्रकार नाही. पूर्वीपासूनच ते दारूच्या नशेत गावात दहशत माजवतात, रात्री-बेरात्री वृद्धाच्या घराजवळ हिंडत त्रास देतात. वारंवार मारहाणीच्या घटना घडवून आणून गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे.
💬 वृद्धाची भीतीदायक साक्ष
“माझे व माझ्या कुटुंबाचे प्राण या आरोपींच्या ताब्यात सुरक्षित नाहीत. हे लोक नंगट, आडदांड व खुनशी प्रवृत्तीचे आहेत. कोणत्याही क्षणी ते माझा घात करू शकतात,” अशी भीती वृद्ध बाबासाहेब बनसोडे यांनी व्यक्त केली आहे.
साध्या झाडाच्या फांदीवरून सुरू झालेला हा वाद आता गंभीर जीवघेण्या स्वरूपात गेला आहे. कायद्याचा धाक न मानणाऱ्या या आरोपींवर कठोर कारवाई होणे अत्यावश्यक आहे, अन्यथा निर्दोष जीव धोक्यात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
००००