श्रीरामपूर / प्रतिनिधी:
डेंगूसदृश्य लक्षणे ताप डोकेदुखी अंगदुखी पूर्व दिसल्यास त्वरित डॉक्टरांना भेटून उपचार घेऊन भरपूर विश्रांती घ्यावी असे प्रतिपादन डॉ. अश्विनी लिपटे यांनी केले. तालुक्यातील बेलापूर येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात सावित्रीबाई फुले विद्यार्थिनी मंचच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्या पुढे असेही म्हणाल्या की, पॅरासिटामॉल घेऊन ताप व वेदना कमी करा, पण ॲस्पिरिन व आयबुप्रोफेन टाळा. पौष्टिक आहार घ्या आणि डास चावण्यापासून बचाव करावा असेही त्यांनी सांगितले.
श्री.ज्ञानेश्वर रायजादे म्हणाले की,डेंग्यूची लक्षणे सौम्य ते गंभीर असू शकतात. ताप, डोळ्यांमागे दुखणे, सांधेदुखी किंवा पुरळ यांसारखी लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. साठवलेल्या पाण्यावर झाकण ठेवा.पाणी साचून देऊन नका,पाण्याचे डबके होऊ देऊ नका असेही ते म्हणाले.
राहुल आहेर म्हणाले की, भरपूर पाणी प्या.शरीराला हायड्रेटेड ठेवणे महत्त्वाचे आहे.हलका आणि पौष्टिक आहार घ्या.व्हिटॅमिन सी आणि के असलेल्या फळे आणि भाज्या खा. मसालेदार, चरबीयुक्त पदार्थ आणि चॉकलेट टाळा. डास चावू देऊ नका.प्रतिबंधात्मक उपाय करा.डास चावण्यापासून स्वतःला वाचवा, शक्य असल्यास, मच्छरदाणी वापरा आणि खिडक्यांना जाळ्या लावा. यामुळे डासांचा धोका कमी होतो असे ते म्हणाले.
प्राचार्य डॉ गुंफा कोकाटे म्हणाल्या की,शरीर झाकणारे कपडे घाला. विशेषतः दिवसा डास चावण्यापासून बचाव करण्यासाठी लांब बाह्यांचे कपडे घाला.डेंग्यूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी परिसर स्वच्छ ठेवा आणि पाणी साचू देऊ नका कारण डास साठलेल्या पाण्यात अंडी घालतात. घाण, अस्वच्छता, दुर्गंधीपासून सावध रहा असेही त्यांनी सांगितले.
अहिल्यानगर येथील समाज कल्याण खात्याचे प्रा.एजाज पिरजादे यांनी महाराष्ट्र शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजना यांविषयी माहिती दिली. कौशल्याधिष्ठीत कोर्सेस, स्पर्धा परीक्षा आदि विषयांवर मार्गदर्शन केले. बार्टी योजना ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (BARTI) पुणे द्वारे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी चालवली जाते, जी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्य देते. याउलट, कौशल्य विकास कार्यक्रम हे एक प्रशिक्षण आहे, ज्यात विद्यार्थ्यांना नोकरीसाठी आवश्यक असलेले कौशल्य शिकवले जाते, जे केंद्र शासनाच्या नियमांनुसार राष्ट्रीय कौशल्य पात्रता आराखड्यात (NSQF) समाविष्ट आहे. या दोन्ही योजनांचा उद्देश विद्यार्थ्यांचे शिक्षण व कौशल्य विकास करणे आहे, परंतु त्यांची उद्दिष्ट्ये आणि कार्यक्षेत्र भिन्न आहेत असेही ते म्हणाले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. कार्यक्रमाचे आयोजन , संयोजन व आभार सावित्रीबाई फुले विद्यार्थिनी मंच समन्वयक रुपाली उंडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर सेवक यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111