शिक्षक दिन विशेष लेख– "शिक्षकही माणूस आहे..."
इंदापूर : शाळेच्या दारातून आत पाऊल टाकलं की एक नवा जगाचा दरवाजा उघडतो – तिथे ज्ञान आहे, संस्कार आहेत, शिस्त आहे. आणि या सगळ्याचा पाया म्हणजे शिक्षक. समाजाने शिक्षकाला देवासमान मानलं, गुरूला जगातल्या सगळ्यात मोठ्या स्थानावर बसवलं. पण या गौरवामागे एक कडू सत्य आहे – तोही शेवटी माणूस आहे. त्याच्या डोळ्यांत स्वप्नं आहेत, त्याच्या मनात भावनांचा सागर आहे, त्याच्या जीवनात संघर्ष आहे... तरीही त्याला समाज फक्त "शिक्षक" म्हणून पाहतो, माणूस म्हणून नाही.
शिक्षकाचं जीवन म्हणजे सतत देत राहणं. सकाळच्या घंटेसोबतच त्याचं जगणं विद्यार्थ्यांभोवती गुंफलं जातं. एखाद्या गरीब मुलाला शिक्षणाचं औदार्य देताना त्याला स्वतःच्या घरातली आर्थिक कसरत आठवते, पण तो सांगत नाही. एखाद्या विद्यार्थ्याला उभं करण्यासाठी तो स्वतःच्या वेळेचं, आरामाचं बलिदान देतो, पण कधी कुणाकडे त्याचं कौतुक पोहोचत नाही.
त्याच्या पायांना कधी थकवा येतो, त्याच्या मनाला कधी वेदना होतात. पण वर्गात उभं राहताना त्याला हसावंच लागतं. कारण विद्यार्थी त्याच्या चेहऱ्याकडे पाहून शिकतात; त्याच्या वागण्यावरून घडतात. तो जर क्षणभरही खचला, तर समाज म्हणतो – "हा शिक्षक असून असं करतो?" मग तो आपल्या मनातली सारी दुखणी, सारी वादळं दाबून ठेवतो आणि पुन्हा दिवा पेटवतो.
शिक्षकाला अनेक मर्यादा असतात. तो वर्गात कठोर झाला तर लोक म्हणतात "विद्यार्थ्यांवर रागावतो", तो मोकळा झाला तर म्हणतात "शिस्त नाही." तो जर कधी एखाद्या आनंदात मनसोक्त हसला, तर टीका होते – "हा शिक्षक असून असं करतो?" म्हणजेच त्याचं प्रत्येक पाऊल, प्रत्येक शब्द, प्रत्येक कृती समाजाच्या आरशात तपासली जाते. पण त्याच्या मनातल्या माणसाला कोणी पाहत नाही.
तरीही शिक्षक आयुष्यभर एक गोष्ट विसरत नाही – विद्यार्थी हेच त्याचं खऱ्या अर्थाने कुटुंब आहे. त्यांच्या यशात तो स्वतःचं यश पाहतो, त्यांच्या अश्रूंनी त्याचं मन पाझरते. विद्यार्थी एखाद्या छोट्या परीक्षेत यशस्वी झाले की त्याला वाटतं जणू आपलं मूल उंच भरारी घेतंय. विद्यार्थी चुकीच्या मार्गावर गेला की त्याच्या हृदयाला टोचतं, जणू आपल्या लेकराला हरवल्यासारखं.
म्हणूनच शिक्षक दिनी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी – शिक्षक हा देव नाही, तोही माणूस आहे. त्याला भावना आहेत, थकवा आहे, जगण्याची ओढ आहे. त्यालाही चुकण्याचा हक्क आहे, त्यालाही मोकळेपणाने जगण्याची गरज आहे. त्याचं कौतुक फक्त ५ सप्टेंबरला नव्हे, तर वर्षभर व्हावं. त्याला केवळ आदर्श मानू नये, तर माणूस म्हणून समजून घ्यावं.
कारण जेव्हा समाज शिक्षकाला "माणूस" म्हणून स्वीकारेल, तेव्हा तो अधिक संवेदनशील होईल, अधिक प्रेरणादायी ठरेल आणि भविष्यातल्या पिढ्यांना अधिक उज्ज्वल करू शकेल.
शिक्षक दिनी आपण सगळ्यांनी एकच गोष्ट लक्षात ठेवूया –
"शिक्षकाला देव मानणं मोठं आहे, पण त्याला माणूस म्हणून समजून घेणं त्याहूनही मोठं आहे."
भारत ननवरे सर(शेळगाव,ता.इंदापूर, जि.पुणे)