संभाजीनगर प्रतिनिधी:-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाशी संबंधित असलेले डॉ. अशोक गुरूप्पा बंडगर व त्यांची पत्नी पल्लवी अशोक बंडगर यांच्यावर एका विद्यार्थिनीने केलेले लैंगिक शोषण, मानसिक छळ व धमकीचे गंभीर आरोप सत्र न्यायालयाने फेटाळले आहेत.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश ऋचा दत्तात्रय खेडेकर यांच्या न्यायालयाने दिलेल्या या निर्णयानंतर बंडगर दाम्पत्यास संपूर्ण आरोपांतून निर्दोष मुक्तता मिळाली आहे. या निर्णयाने “न्यायालयीन प्रक्रियेत सत्याचीच विजय मिळतो” हे अधोरेखित झाले आहे.
प्रकरणाचा आढावा
- पीडित विद्यार्थिनीने एम.पी.ए. अभ्यासक्रमात प्रवेश घेतल्यानंतर (२०१९-२१) डॉ. अशोक बंडगर यांच्या संपर्कात आली.
- ११ फेब्रुवारी २०२२ रोजी ती छत्रपती संभाजीनगरात आली असता हॉस्टेल नसल्याने बंडगर दाम्पत्याने तिला त्यांच्या घरी राहण्यास सांगितले.
- जवळपास एक वर्ष ती त्यांच्या घरी वास्तव्यास होती.
- घरी परतल्यानंतर (११ फेब्रुवारी २०२३) तिने वडिलांना घटनांची माहिती दिली आणि २५ एप्रिल २०२३ रोजी एफआयआर दाखल झाला.
पीडितेचे आरोप
- डॉ. बंडगर यांनी वेळोवेळी शारीरिक अत्याचार केल्याचा दावा.
- पल्लवी बंडगर यांनी मानसिक छळ, दबाव व शारीरिक अत्याचारात सहभाग घेतल्याचा आरोप.
- “मुलगा हवाय” असा दबाव टाकल्याचेही नमूद.
तपास व पुरावे
- पोलिसांनी व्हॉट्सअॅप चॅट, कपडे, मेडिकल रिपोर्ट, पंचनामे यांचा तपास केला.
- विद्यापीठातील तक्रारीची नोंद, जबाब सादर झाले.
- मात्र वैद्यकीय तपासणीत बलात्काराचे ठोस पुरावे आढळले नाहीत.
- घटनाक्रमातील वेळापत्रक विसंगत, तक्रार ७० दिवस उशिराने दाखल, तसेच साक्षींमध्ये विरोधाभास आढळल्याचे न्यायालयाने नोंदवले.
न्यायालयाचे निरीक्षण
अतिरिक्त सत्र न्यायाधीश ऋचा खेडेकर यांनी आपल्या निर्णयात स्पष्ट नमूद केले की –
- पीडितेने स्वेच्छेने आरोपींच्या घरी वास्तव्यास रहायचे ठरवले होते.
- तक्रारीत ७० दिवसांचा विलंब असून त्याचे समाधानकारक कारण दिले गेलेले नाही.
- पीडितेच्या वडिलांची साक्षही विसंगत व विरोधाभासी आहे.
- घरात सतत इतर सदस्य उपस्थित असल्याने अत्याचार शक्यप्राय वाटत नाही.
- वैद्यकीय व फॉरेन्सिक तपासणीत बलात्काराचे ठोस पुरावे नाहीत.
- तक्रारीमागे हेतुपुरस्सर उद्देश असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अंतिम निर्णय
- डॉ. बंडगर दाम्पत्यास कलम ३७६(२)(एन), १०९, ११४, ५०४, ५०६ सह ३४ नुसार दाखल गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता.
- जप्त मालमत्ता अपील कालावधी संपल्यानंतर नष्ट करण्याचे आदेश.
- न्याय प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रत्येकी २० हजार रुपयांचा वैयक्तिक हमी बॉंड भरण्याचे आदेश.
सत्याचा विजय
या निर्णयामुळे डॉ. बंडगर दाम्पत्यांवरील डाग धुतले गेले असून त्यांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. समाजात शिक्षण, कला व संशोधन क्षेत्रातील कार्यरत असलेल्या अशा व्यक्तींवर आरोप करून त्यांची बदनामी करण्याच्या प्रवृत्तीला या निकालामुळे मोठा धक्का बसला आहे.
हा निकाल समाजातील अनेकांना धडा देणारा ठरला असून, सत्य कितीही दबवले गेले तरी शेवटी न्यायालयात तेच प्रकट होते याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे.
०००