शिर्डी एक्स्प्रेस वृत्तसेवा:-
अहिल्यानगर प्रतिनिधी :
शहरातील महाविद्यालयीन परिसर सुरक्षित असावा अशी सर्वांची अपेक्षा असते. मात्र मंगळवारी (ता. १९) दुपारी घडलेल्या घटनेने या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. महाविद्यालयाच्या पार्किंगमध्ये दुचाकी लावत असताना कृष्णा उमाप (वय १९, रा. सिद्धार्थनगर) या विद्यार्थ्यावर चार अनोळखी व्यक्तींनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्या डाव्या हाताला व पाठीला गंभीर दुखापत झाली असून सध्या तो उपचार घेत आहे.
कृष्णा उमाप हा बारावीचा विद्यार्थी असून शिक्षणासाठी तो मामाच्या नावावरील दुचाकी वापरत असतो. घटनेच्या दिवशी, तो नेहमीप्रमाणे महाविद्यालयात गेला असता, पार्किंग परिसरात काही तरुण गोंधळ घालत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने परिस्थितीकडे दुर्लक्ष केले असतानाच मास्क घातलेल्या तीन ते चार अनोळखी तरुणांनी त्याच्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला चढवला. शिवीगाळ करत त्याला जमिनीवर पाडले आणि त्यापैकी एका तरुणाने लोखंडी राॅडने निर्दय मारहाण केली.
या घटनेत कृष्णा गंभीर जखमी झाला असून विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महाविद्यालयीन परिसरात असा हिंसक प्रकार घडणे चिंताजनक आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती खबरदारी घेणे ही प्रशासन आणि महाविद्यालय व्यवस्थापनाची जबाबदारी असल्याचे नागरिक सांगत आहेत.
याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करून दोषींना अटक करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून होत आहे.
००००