मुंबई प्रतिनिधी
स्वातंत्र्य दिन म्हटलं की तरुणाईचाच जल्लोष असेल असं वाटतं. पण मुंबईतील द असोसिएशन फॉर सीनियर सिटीजन मँगो गार्डन च्या सभासदांनी दाखवून दिलं की देशप्रेम आणि देशभक्तीची भावना वयाच्या कुठल्याही टप्प्यावर कमी होत नाही.
प्रणाम हॉटेलमध्ये झालेल्या या सोहळ्याचे नेतृत्व विरंगुळा केंद्राच्या अध्यक्षा सौ. लता प्रकाश पोवार आणि सरचिटणीस श्री. विलास बर्वे यांनी केले. कार्यक्रमास बी.पी. मारिनचे अध्यक्ष श्री. आर. सी. सिंग, फेस्कॉम मुंबई–नवी मुंबई विभागाचे अध्यक्ष श्री. सुरेश पोटे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या ज्येष्ठ नागरिकांनी 17 ऑगस्ट रोजीच स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा करण्याचे एकमताने ठरविले. भारतमातेच्या आत्मीयतेतून झालेला हा सोहळा देशभक्तीने ओथंबून गेला. दीप प्रज्वलन श्री. आर. सी. सिंग व श्री. सुरेश पोटे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर पाहुण्यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
टाळ–मृदुंगाच्या गजरात कार्यक्रमास सुरुवात झाली. देशभक्तीपर गीतांच्या सादरीकरणाने वातावरण भारून गेले. त्यानंतर नृत्य, नाट्य, गायन व वादनाच्या सादरीकरणांनी उत्सवाला रंगत आणली. विशेष आकर्षण ठरली ती ‘रनिंग ट्रेन’ आणि ‘बागवान 2’ ही नाटके. प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या गजरात ज्येष्ठांनी रंगभूमीवर आपली कला सादर केली.
शेवटी राष्ट्रगीताच्या स्वरांनी हा आनंदोत्सव संपन्न झाला. ज्येष्ठांचा हा उपक्रम पाहून असं जाणवलं की देशभक्तीची ज्योत मनामनांत कायम पेटती ठेवणं हेच खरं स्वातंत्र्याचं खरेपण आहे.
०००