अहिल्यानगर :-अहिल्यानगर जिल्ह्यातील केडगाव लिंकरोड परिसरात घडलेली एक घटना समाजात मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे. शिरूर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस संतोष बुधवंत यांच्या स्वतःच्या घरात चोरट्यांनी हात साफ केला. विशेष म्हणजे कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसाच्या घरावरच ही चोरी घडली, ही बाब धक्कादायक आहे.
१६ ऑगस्ट रोजी ही घटना घडली. संतोष बुधवंत हे कर्तव्यावर असताना त्यांची पत्नी अर्चना, आई मंदाबाई आणि मुले रक्षाबंधनासाठी मूळ गावी पाथर्डी येथे गेले होते. घर रिकामे असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली.
१७ ऑगस्ट रोजी सायंकाळी अर्चना घरी परतल्या असता घराचे लॉक तुटलेले व घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. कपाटाचे कुलूप मोडून त्यातील ६२ हजार ५०० रुपयांचे सोने-चांदीचे दागिने व रोकड असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याचे उघड झाले.
ही बाब लक्षात येताच त्यांनी संतोष बुधवंत यांना फोन करून कळवले तसेच डायल ११२ वर संपर्क साधला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. बेडरूममधील कपाटाचे लॉक तोडून चोरी करण्यात आल्याचे प्राथमिक पाहणीत स्पष्ट झाले.
कायद्याचे रक्षकच जेव्हा स्वतःच्या घरफोडीचा बळी ठरतात, तेव्हा सामान्य नागरिकांच्या सुरक्षेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होते. ही घटना पोलिस दलासाठीही चिंतेचा विषय ठरली असून चोरट्यांचा मागोवा घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
००००