शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
सामाजिक बातमी
बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी सध्या राष्ट्रीय पुरस्कार जिंकण्याचा उत्सव साजरा करत आहे. तिला 'मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे' या चित्रपटासाठी पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार तिच्यासाठी खूप विशेष आहे. राणीनं पहिल्यांदा राष्ट्रीय पुरस्कार जिंकला आहे. राणी मुखर्जीला हा पुरस्कार मिळल्यानंतर तिच्या चाहत्यांमध्ये एक आनंदाची लाट उसळली होती. 'मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे' या चित्रपटामध्ये राणी ही मुख्य भूमिकेत दिसली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन आशिमा चिब्बर यांनी केलं आहे.
राणी मुखर्जीनं व्यक्त केल्या भावना : "खूप चांगले वाटले, आज शिर्डीत येऊन साईबाबांच्या जवळ आल्यानंतर कायमच चांगले वाटते. साईबाबांचे बोलावणे कधी येईल याची कायम वाट पाहत असते. साईबाबांचे बोलावणे आले की, शिर्डीला येते. नुकताच मला नॅशनल अवॉर्ड मिळाल्यानं साईबाबांचे आभार मानण्यासाठी आले असल्याचे अभिनेत्री राणी मुखर्जी सांगितलं आहे." प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी हिनं आज आपल्या दोन्ही भावांसह शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले आहे. साईबाबांच्या दर्शनानंतर माध्यमांशी संवाद साधताना राणी मुखर्जी म्हणाली की, "माझ्या पतीचा 'वॉर २' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांनाच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या यशासाठीही साईबाबांच्या चरणी प्रार्थना केली आहे. मुंबईतील साईबाबा मंदिरात जाऊन दर्शन घेतच असते. मात्र शिर्डीत येऊन साईबाबांचे दर्शन घेणे, हा एक वेगळाच अनुभव मिळतो. सर्वांनी एकदा तरी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घ्यावे." असं आव्हान देखील राणी मुखर्जीनं साईभक्तांना केलं आहे. शिर्डीत येऊन साईबाबांचे अनुभव आपल्या बरोबर घेऊन गेले पाहिजेत. हा अनुभव वर्षभर आपल्या बरोबर राहतो असेही यावेळी अभिनेत्री राणी मुखर्जी सांगितलं.
राणी मुखर्जीचा केला सत्कार : साईबाबांच्या दर्शनानंतर, साईबाबा मंदिर पर्यवेक्षक राजेंद्र पवार, जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे, नवनाथ मते यांनी राणी मुखर्जी आणि तिच्या दोन्ही भावांचा शॉलसह साईमूर्ती देऊन सत्कार केला आहे. साईदर्शनानंतर राणी मुखर्जी हिनं शनिशिंगणापूर येथे जाऊन शनिदेवाचे देखील दर्शन घेतले आहे.