shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आयुष्यातले सांगाती २१बनवारीलालजी पुरोहित..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!


जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

राष्ट्रपती आणि राज्यपाल ही आपल्या लोकशाही व्यवस्थेतील संवैधानिक पदे म्हणून ओळखली जातात. या पदांवर असलेली व्यक्ती ही साधारणपणे हस्तिदंती मनोऱ्यात राहणारी उच्चपदस्थ व्यक्ती असते. मात्र अशी व्यक्ती जेव्हा व्यापक जनसंपर्क ठेवते आणि जनसामान्यांची असलेले संबंध पदाची प्रतिष्ठा बाजूला ठेवत देखील जपते, तेव्हा ती व्यक्ती अनेकांची सुहृद बनलेली असते. निवृत्त राज्यपाल बनवारीलालजी पुरोहित हे देखील असेच अनेकांचे सुहृद असलेले एक व्यक्तिमत्व आहे. त्या अनेकांमध्ये मी देखील एक आहे.

बनवारीलालजी आज ८५ वर्षाचे आहेत. माझ्यापेक्षा जवळजवळ पंधरा वर्षांनी ते ज्येष्ठ आहेत. तरीही त्यांनी माझ्याशी असलेले स्नेहबंध जपलेले आहेत. ते राज्यपाल असताना कधीही त्यांच्या मोबाईलवर फोन केला तर आधी त्यांचे एडीसी उचलायचे. त्यावेळी ए डी सी उत्तर द्यायचे की राज्यपाल महोदय बैठकीत आहेत. अर्ध्या तासाने फोन करा. बोलणे करून देतो. मात्र दहाव्या मिनिटाला एडीसीचाच फोन यायचा आणि "राज्यपाल महोदय आपल्याशी बोलू इच्छितात" म्हणून  फोन  बनवारी लालजींच्या हातात दिला जायचा. लगेच तिकडून प्रतिसाद यायचा "बोलिये अविनाशजी कैसे क्या याद किया?" आणि मग आमचा संवाद सुरू व्हायचा.

बनवारीलालजींचा माझा परिचय १९७७ पासूनचा आहे. त्याआधी देखील नागपुरातले एक मोठे उद्योजक म्हणून त्यांचे नाव ऐकले होते. मात्र प्रत्यक्ष परिचय नव्हता. त्यावेळी ते भारतीय विद्या भवनचे पदाधिकारी देखील होते. फेब्रुवारी १९७७ मध्ये भारतीय विद्या भवनचा नागपुरात कार्यक्रम होता. त्याला सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यायचे होते. त्यावेळी मी मुंबई दूरदर्शनचा कंत्राटी वृत्त छायाचित्रकार म्हणून कार्यरत होतो. दूरदर्शन ने मला तो कार्यक्रम कव्हर करण्यासाठी सूचना पाठवली. त्यानुसार मी त्या कार्यक्रमाला उपस्थित झालो. तिथे बनवारीलालजी व्यासपीठावरच होते. कार्यक्रम संपल्यावर त्यांचा माझा परिचय करून दिला गेला. तेव्हा मी जेमतेम २२ वर्षांचा होतो. त्यांच्या नावामागे असलेल्या बलयामुळे मी थोडा दबूनच त्यांच्याशी बोलत होतो. मात्र एक चार पाच वाक्यामध्येच त्यांनी माझ्यातली भीड कमी केली आणि आमचा संवाद सुरू झाला. या भेटीनंतर अधून मधून आमच्या भेटी होऊ लागल्या. मी चित्रित केलेला कार्यक्रम मुंबई दूरदर्शन ने प्रक्षेपित केला. तो बनवारीलालजींच्या मुंबईतील नातेवाईक आणि मित्रमंडळींनी बघितला. ते बनवारीलालजींना कळल्यावर त्यांचा मला आवर्जून फोन आला होता. 

यावेळी नुकतीच आणीबाणी उठली होती, आणि देशात लोकसभेच्या निवडणुका होत्या. या निवडणुकांमध्ये देशात सत्तांतर झाले. त्यानंतर विदर्भात जांबुवंतराव धोटे यांचे वेगळ्या विदर्भाचे आंदोलन पुन्हा जोर पकडू लागले. बनवारीलालजी अचानक या आंदोलनात सक्रिय झाले. त्यामुळे मग आमच्या नियमित भेटीगाठी होऊ लागल्या. दरवेळी भेटले की ते आवर्जून चौकशी करायचे.

या काळात नागपुरातील जुने इंग्रजी वृत्तपत्र दैनिक हितवाद बंद पडले होते. बनवारीलालजींनी ते वृत्तपत्र चालवायला घेतले. १९७८ मध्ये ते हितवादाचे प्रबंध संपादक झाले. त्यावेळी मी वृत्तपत्रांसाठी देखील छायाचित्रण करत असे. बनवारीलालजींना कळल्यावर त्यांनी मला हितवादमध्ये बोलावून घेतले आणि आमच्यासाठी देखील तू फोटो देत चल असे सुचवले होते.

१९८० मध्ये विधानसभा निवडणुका आल्या. त्यावेळी जांबुवंतराव धोटेंची महाविदर्भ राज्य संघर्ष समिती काँग्रेसमध्ये विसर्जित झाली होती. त्यामुळे बनवारीलालजी देखील काँग्रेसमध्ये गेले होते. ते मध्य नागपूरमधून काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणुकीला उभे राहिले आणि निवडूनही आले. त्याच काळात दूरदर्शनची राष्ट्रीय स्तरावरील छायाचित्रकारांची एक पॅनल तयार झाली होती. देशभरातून मोजकेच छायाचित्रकार त्यात सहभागी झाले होते. त्यात माझाही समावेश होता. हे वृत्त बनवारीलालजींनी वृत्तपत्रातून वाचले. त्याच दरम्यान भारतीय विद्या भवनचा एक कार्यक्रम चित्रीत करायला मी गेलो होतो. मी भेटतच बनवारीलालजींनी माझे अभिनंदन केले.

बनवारीलालजी आमदार झाल्यामुळे आमच्या भेटी अधिकच वाढल्या. वेगवेगळ्या कार्यक्रमात ते भेटू लागले. मग कधी कधी आम्ही पत्रकार त्यांची गंमत करत असू. "आता लवकरच तुमचा मंत्रिमंडळात नंबर लागणार आहे" त्यावर ते हसून टाळायचे. 

अर्थात बनवारीलालजींचे मंत्रिपदाचे योग प्रबळ होते. ते १९८२ मध्ये बाबासाहेब भोसले मंत्रिमंडळात मंत्री झाले. मात्र त्यांचे मंत्रिपद औट घटकेचे ठरले. अवघ्या सहा महिन्यातच बाबासाहेब भोसले यांचे मंत्रिमंडळ गडगडले आणि बनवारीलालजींना देखील पायउतार व्हावे लागले. त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात त्यांनी एकदा सर्व पत्रकारांना घरी स्नेहभोजनाला निमंत्रित केले होते. त्यावेळी त्यांनी प्रत्येकाला व्यक्तिशः निमंत्रण दिले होते. 

१९८४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत बनवारीलालजी काँग्रेस तर्फे नागपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिले. त्यांचे स्पर्धक वृत्तपत्र असलेल्या दोन वृत्तपत्रांनी त्यांच्याविरुद्ध जबरदस्त मोहीम चालवली होती. मात्र बनवारीलालजी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आपला सकारात्मक प्रचार करत होते. ते निवडणुकीत विजयी झाल्यावर दूरदर्शनतर्फे वृत्त संकलन करायला मी गेलो होतो. त्यावेळी मी सहजच त्या वृत्तपत्राने चालवलेल्या कॅम्पेनचा उल्लेख केला. त्यावेळी बनवारीलालजी हसले आणि म्हणाले "ऐसी चीजे इग्नोर ही करना उचित रहता है अविनाशजी. उनके साथ झगडेंगे तो हम पब्लिक इंटरेस्ट के काम कब कर पायेंगे?" आणि त्यांनी तो विषय लगेच बदलला होता. 

याच दरम्यान केंद्र सरकारच्या एका योजनेत दूरदर्शनचे खाजगी क्षेत्रातील कार्यक्रम निर्मिती केंद्र सुरू करण्यासाठी माझी निवड झाली होती. या प्रकल्पासाठी बँकेचे अर्थसहाय्य आणि केंद्र तसेच राज्य सरकारच्या विविध खात्याकडून मंजुरी मिळवणे हे माझ्या समोर आव्हान होते. त्यादरम्यान मी सतत मुंबई आणि दिल्लीच्या चकरा मारत असे. एकदा दिल्लीत मी जनपथवरून पायी  चाललो होतो. अचानक बाजूला एक गाडी थांबली. गाडी स्वतः बनवारीलालजी चालवत होते. मला बघून कार मधून उतरले आणि माझी चौकशी केली. "अविनाशजी आप दिल्ली मे कैसे क्या?" मग मी त्यांना प्रयोजन सांगितले. त्यांनी लगेच त्यांचा पत्ता सांगितला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी घरी बोलावले. त्यांच्या घरी गेल्यावर माझ्या कामाच्या दृष्टीने त्यांनी मार्गदर्शन देखील केले, आणि काही अधिकाऱ्यांना फोनही केले होते. त्यानंतर या प्रकल्पासंदर्भात जेव्हा जेव्हा अडचणी आल्या तेव्हा तेव्हा मी बनवारीलालजींकडे जाऊन भेटायचो, आणि त्यांनी मला मदतीचा हात देखील पुढे केला होता. 

१९९१ मध्ये राम मंदिराच्या मुद्द्यावरून बनवारीलालजींनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. थोड्याच दिवसात त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याची बातमी आली. त्यानंतर ते नागपुरात आले. त्या दिवशी रेल्वे स्टेशनवर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. नागपूर स्टेशनवर जवळजवळ ५ हजाराचा जमाव त्यांच्या स्वागतासाठी जमला होता. त्यात मी देखील एक होतो. प्लॅटफॉर्म वरून कार्यकर्त्यांच्या गर्दीतच त्यांना बाहेर आणले गेले, आणि ते उघड्या जीपवर विराजमान झाले. त्यावेळी मी समोरून पास होत होतो. माझ्याकडे लक्ष जातच बनवारीलालजींनी स्मितहास्य देत मला हात दाखवला. मी देखील त्यांना प्रतिसाद दिला. त्यावेळी ते भाजपाचे उमेदवार म्हणून लोकसभा लढले. मात्र निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राजीव गांधींची हत्या झाल्यामुळे मतदान पुढे ढकलले आणि एरवी शंभर टक्के निवडून येणारे बनवारीलाल पुरोहित पराभूत झाले. तरीही त्यांनी लोकसंपर्क सुरूच ठेवला होता. त्या काळात अधून मधून भेटी व्हायच्या. त्यावेळी ते आवर्जून चौकशी करायचे.

१९९६ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत बनवारीलालजी भाजपाचे उमेदवार म्हणून दणदणीत बहुमताने विजयी झाले. त्या दरम्यान मी देखील वृत्त छायाचित्रणाचे काम सोडून पूर्णवेळ पत्रकार म्हणून कार्यरत झालो होतो. मग पुन्हा एकदा कार्यक्रम, पत्रपरिषद यात आमच्या भेटी होऊ लागल्या. 

१९९८ च्या दरम्यान भाजप नेते प्रमोद महाजनांशी बनवारीलालजींचे काही मुद्द्यांवर खटकले. परिणामी १९९८ मध्ये झालेल्या लोकसभेच्या मध्यावधी निवडणुकांमध्ये त्यांना नागपुरातून भाजपची उमेदवारी नाकारली. त्या तिरिमिरीत  त्यांनी भाजपला रामराम ठोकला, आणि पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी घेतलेल्या पत्र परिषदेत त्यांची माझी थोडी नोकझोक सुद्धा झाली होती.

काँग्रेसमध्ये आल्यावर लगेचच बनवारीलालजी निवडणूक प्रचाराला लागले. त्यावेळी काही पत्रकारांनी नितीन गडकरींना विचारले असता त्यांनी बनवारीलालजी आता भाजपासाठी एक फ्युजबल्ब आहेत असे विधान केले होते. त्यानंतर लगेचच नागपूरच्या कस्तुरचंद पार्कवर सोनिया गांधींची जाहीर सभा होती. त्या सभेत प्रास्ताविक करताना बनवारीलालजींनी आपली व्यथा बोलून दाखवली. ते म्हणाले "तो नितीन गडकरी मला फ्युज बल्ब म्हणतो, माझे शब्द खरे होणार असतील तर भाजप शिवसेना युतीचे विदर्भातील अकराही बल्ब फ्युज होतील". 

योगायोगाने त्या निवडणुकीत विदर्भात भाजप शिवसेना युतीचे अकराही उमेदवार पडले. त्यावर अनेक राजकीय विश्लेषकांनी वेगवेगळे भाष्य केले होते. मी मात्र मी बातम्या देत असलेल्या वृत्तपत्रांमध्ये "एका रामभक्त ब्राह्मणाची शापवाणी खरी ठरली" या शीर्षकाची एक बातमी चालवली. ती बातमी सर्वत्र माझ्या बाय लाईन ने प्रकाशित झाली. तिथल्या वाचकांनी  बनवारीलालजींना याबाबत कळवले. एक दिवस सकाळी मला बनवारीलालजींचा फोन आला. त्यांनी या बातमीबद्दल माझे अभिनंदन केले आणि त्या दिवशी दुपारी चार वाजता मला हितवाद मध्ये चहाला बोलावले. मी त्या बातम्यांची कात्रणे घेऊनच त्यांच्याकडे गेलो. त्या बातम्या बघून ते खूप सुखावले आणि "तुमची लेखणी खूप शार्प आहे अविनाशजी" म्हणून माझे कौतुकही केले."अविनाशजी मी कुठला ब्राह्मण? मी तर तेलापासून बनवलेला डालडा विकला, म्हणजे मी तेलीच झालो" अशी मिश्किल टिपणी देखील त्यांनी त्या दिवशी केली होती.  मी दिलेली ही बातमी त्यांनी अजूनही लक्षात ठेवलेली आहे. एकदा पंजाबचे राज्यपाल असताना असेच फोनवर बोलणे सुरू होते. त्यावेळी ते बोलता बोलता म्हणाले "अविनाशजी तुम्ही लिहिलेली ती बातमी अजूनही माझ्या लक्षात आहे". नंतर आता दोन वर्षांपूर्वी काही कामाने त्यांना घरी भेटायला गेलो होतो. तेव्हा उपस्थितांना देखील त्यांनी त्या बातमीचा किस्सा ऐकवला आणि अजूनही ती कात्रणे मी जपून ठेवली आहेत असेही सांगितले होते. 

२००३ मध्ये एका पत्रकार सहका-याने कुणाला तरी भारतीय विद्या भवन शाळेमध्ये ऍडमिशन मिळवून देतो असे सांगून त्याच्याकडून काही पैसे घेतले होते. दरम्यान ऍडमिशन झाली नाही म्हणून ते पालक बनवारीलालजींकडे गेले. या पत्रकाराला देखील बोलावले. मग सगळी चौकशी झाली आणि बनवारीलालजी त्या पत्रकारा विरोधात पोलिसात तक्रार करायच्या निर्णयावर आले. त्या पत्रकाराला माझे आणि बनवारीलालजींचे संबंध माहित होते. त्याने लगेचच मला फोन केला. मी तातडीने बनवारीलालजींच्या कार्यालयात पोहोचलो. मला बघताच बनवारीलालजी म्हणाले "अविनाशजी बरे झाले तुम्ही आलात. तुमचे नाव याने घेतले होते." मग सगळी चर्चा झाली. मी बनवारीलालजींना सांगितले की याच्याविरुद्ध पोलीस तक्रार केल्यास याचे कुटुंब अडचणीत येईल. माझ्या शब्दाचा मान ठेवत पोलीस तक्रार करण्याचा निर्णय त्यांनी बदलला. "अविनाशजींनी इतक्या वर्षाच्या संबंधात मला कधीही काहीही मागितलेले नाही, त्यामुळे त्यांच्या शब्दाखातर मी तुम्हाला सोडतो आहे, मात्र ताबडतोब यांचे पैसे परत करा" असे सांगून ते प्रकरण संपवले. नंतर आठवडाभराने बनवारीलालजींनी फोन करून ते पैसे परत केले गेलेत किंवा नाही याची खात्री करून घेतली होती. 

दरम्यानच्या काळात बनवारीलालजी काँग्रेस सोडून विदर्भ राज्य पार्टी नामक पक्षाची स्थापना करते झाले. त्या बॅनरवर त्यांनी २००४ ची निवडणूक देखील लढवली. मात्र त्यात यश आले नाही. नंतर ते २००९ मध्ये पुन्हा भाजपमध्ये आले. त्यावेळी देखील त्यांना पराभवालाच सामोरे जावे लागले. नंतर त्यांनी भाजपच्या पक्ष विस्तारात स्वतःला झोकून दिले होते. 

२००९ पासून मी हिंदुस्थान समाचार या बहुभाषिक राष्ट्रीय वृत्तसंस्थेचा विदर्भ प्रमुख म्हणून कार्यरत झालो होतो. या संस्थेच्या वतीने २०१२ मध्ये आम्ही नागपुरात "देशाच्या विकासात छोट्या राज्यांचे योगदान" या विषयावर एक पूर्ण दिवसाचे राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केले होते. बनवारीलालजींना स्वागत समितीचे अध्यक्ष बनवले होते. चर्चासत्राच्या समारोपाला त्यावेळी छत्तीसगडचे मुख्यमंत्री असलेले डॉ. रमणसिंग यायचे होते. सकाळी साडेनऊ वाजता चर्चासत्र सुरू झाले. तेव्हा नागपूरच्या साई सभागृह जेमतेम ५०-६० उपस्थिती होती. ती उपस्थिती बघून बनवारीलालजी खूपच अस्वस्थ झाले. पहिले सत्र समाप्त झाल्यावर मधल्या चहाच्या वेळेस बनवारीलालजी माझ्याजवळ येऊन म्हणाले "जर अशीच उपस्थिती राहिली तर कठीण आहे, असे असेल तर आत्ताच रमण सिंग यांना येऊ नका असे कळवू या." मात्र मी त्याला नकार दिला. आणि संध्याकाळच्या सत्रात सभागृह पूर्ण हाउसफुल असेल असा शब्द दिला. हळूहळू प्रत्येक सत्रात गर्दी वाढलेली दिसू लागली  आणि समारोपीय  सत्रात डॉ.रमणसिंग आले तेव्हा ४०० क्षमतेचे सभागृह पूर्ण भरले होते आणि अनेक लोकांना बाहेर लॉबीत उभे राहावे लागले होते. ही गर्दी पाहून बनवारीलालजी सुखावले. कार्यक्रम संपला आणि डॉ. रमण सिंग यांना घेऊन बनवारीलालजी आणि इतर प्रमुख मंडळी बाजूच्या व्हीआयपी कक्षात चहासाठी गेली. मी  व्यासपीठावर इतर आवरासावरीसंदर्भात सूचना देत होतो. अचानक बनवारीलालजी व्हीआयपी कक्षातून उठून व्यासपीठावर माझ्याजवळ आले आणि माझी पाठ थोपटत ते म्हणाले "अविनाशजी डेस्पाइट ऑल द ऑड्स, यू हॅव वन द बॅटल". मग ते मला घेऊन व्हीआयपी कक्षात गेले आणि तिथे डॉ. रमणसिंग यांना माझी ओळख करून देत सांगितले "आज की परिचर्चा अविनाश जी के कष्ट के कारणही सक्सेस हो सकी है" माझ्यासारख्या एका सामान्य पत्रकाराचे कौतुक करण्याचा त्यांच्या मनाचा मोठेपणा मला निश्चितच भावला होता. 

२०१६ मध्ये बनवारीलालजी आसामचे राज्यपाल म्हणून नियुक्त झाले. त्यावेळी लगेचच मला नांदेडच्या दै. श्रमिक एकजूटने बनवारीलालजींवर लेख मागितला. त्यांना लगेचच मी "माझे सुहृद बनवारीलालजी" या शीर्षकाचा लेखही पाठवला. हा लेख प्रकाशित झाल्यावर ते अंक मी मागवले आणि नंतर बनवारीलालजी नागपुरात आल्यावर त्यांना भेटून तो लेख दाखवला होता. 

बनवारीलालजी राज्यपाल झाल्यावर देखील आमचा संपर्क कायम राहिला. आधी सांगितल्याप्रमाणे कधीही त्यांना फोन केला तर थोड्या वेळातच त्यांचा उत्तरात कॉल येत असे. नागपुरात आले की देखील त्यांची भेट व्हायची. २०२१ मध्ये पद्मगंधा प्रतिष्ठानतर्फे नितीन गडकरींना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बनवारीलालजी प्रमुख अतिथी होते. कार्यक्रम संपल्यावर माझी त्यांची भेट झाली. तेव्हा खूप दिवसात आपली भेट नाही असे ते म्हणाले. मलाही त्यांना भेटायचे होतेच. मग दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता त्यांनी घरी बोलावले. त्यानुसार आमची मग भेट होऊन सविस्तर चर्चाही झाली होती. त्यांच्या राज्यपाल पदाच्या कारकिर्दीत काही वादाचे प्रसंग देखील आले. त्यावेळी मी त्यावर भाष्य करणारे लेख लिहिले होते. विशेषतः पंजाबचे राज्यपाल असताना एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला होता. त्यावर मी लिहिले होते. बनवारीलालजींना कळल्यावर त्यांचा फोन आला. त्यानंतर त्यांनी त्यांचे चिरंजीव राजेंद्रजी पुरोहित यांनाही कळवले. राजेंद्रजींचाही मला फोन आला, आणि त्या दिवशी त्यांनी मला दुपारी हितवाद मध्ये भेटायलाही बोलावले होते. कोणत्याही चांगल्या कामाची दखल घेण्याची ही त्यांची प्रवृत्ती कोणालाही सुखावूनच टाकणारी होती.

दिल्लीहून प्रकाशित होणाऱ्या चाणक्य वार्ता या हिंदी  पाक्षिकाचा विदर्भ प्रतिनिधी म्हणून मी त्यांना अधून मधून लेख देत असतो. या पाक्षिकाचे संपादक डॉ. अमित जैन हे हिंदुस्थान समाचारचे माझे जुने सहकारीच आहेत. ते एकदा चंदीगडला बनवारीलालजींना भेटायला गेले होते. तिथे चाणक्य वार्ता बघता बघता 'नागपुरात मी हे पाक्षिक बघितले होते" असे बनवारीलालजी म्हणाले. तेव्हा आमच्या प्रतिनिधीने कदाचित दिले असेल असे अमित जैन म्हणाले. लगेचच बनवावे लालजींनी विचारले "नागपुरात तुमचे काम कोण बघतो?"  अमितजींनी माझे नाव सांगितले तेव्हा बनवारीलालजी लगेच म्हणाले "वह हिंदुस्थान समाचार वाले अविनाशजी पाठक ना, वह तो हमारे घर के आदमी है." अमित जैन यांनी नंतर मला फोनवर हे कळवले होते. आज इतक्या मोठ्या माणसाने मला घरचा माणूस म्हणून संबोधावे हा माझ्यासाठी बहुमानच होता. 

गतवर्षी  बनवारीलालजींनी राज्यपालपदाचा राजीनामा दिला. त्या काळात मी दीर्घकाळ आजारीच होतो. त्यामुळे त्यांना मी अजून भेटू शकलेलो नाही. मात्र आजही भेटायला गेल्यावर त्याच आपुलकीने ते माझे स्वागत करतील याची मला खात्री आहे. त्याचबरोबर आज तीन राज्यांचे राज्यपालपद सांभाळणारा एक मोठा नेता आणि मध्य भारतातील प्रमुख वर्तमानपत्राचा प्रबंध संपादक मला आपला मानतो हे मी माझे भाग्यच समजतो.

close