अहिल्यानगर प्रतिनिधी:-शिक्षण ही समाजघडणीची पायाभूत प्रक्रिया आहे. या क्षेत्रात प्रामाणिकपणा, जबाबदारी आणि पारदर्शकता अपेक्षित असते. परंतु अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात मात्र याच्या उलट प्रकार घडला आहे.
२०१३ ते २०१४ या कालावधीत शिर्डी येथील उर्दू एज्युकेशन सोसायटीमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याचे गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणात तत्कालीन शिक्षण अधिकारी सुलोचना पंढरीनाथ पटारे, वरिष्ठ सहायक जे. जे. वाघ तसेच संस्थेचे सचिव रज्जाक अहमद शेख (दोघे मयत) यांच्या विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्राथमिक शिक्षण विभागाने चौकशी समिती नेमली. समितीच्या अहवालानुसार चार शिक्षकांना बनावट कागदपत्रांच्या आधारे नियुक्ती देण्यात आल्याचे स्पष्ट झाले. यानंतर प्राथमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षण अधिकारी विलास अशोक साठे यांनी तक्रार दाखल केली आणि अखेर या गंभीर गैरप्रकाराचा पर्दाफाश झाला.
या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, पदाचा गैरवापर करून साधारण नागरिकांची फसवणूक कशी होऊ शकते याचे हे ठळक उदाहरण आहे.
००००