एल. जी. बनसुडे विद्यालयात महिषासुर वधाचे चित्तथरारक सादरीकरण
इंदापूर : पळसदेव (ता. इंदापूर) येथील गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल. जी. बनसुडे विद्यालयात नवरात्रोत्सवाचे औचित्य साधत विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांतून देवीची उपासना, सामाजिक संदेश व आत्मसन्मानाचे दर्शन घडवले. आजच्या
कार्यक्रमात शाळेच्या विविध इयत्तांतील विद्यार्थ्यांनी विविध कलाकृती सादर केल्या. यामध्ये महिषासुर वधावर आधारित चित्तथरारक सादरीकरण प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून गेले. इयत्ता पहिली इंग्लिश मिडीयम च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले नाटक, नृत्य व अभिनय विशेष कौतुकास पात्र ठरले.
सीनियर केजीमधील विद्यार्थ्यांनी "नवरात्र म्हणजे केवळ देवीची उपासना नसून स्वतःच्या शरीराची देखील काळजी घेणे आवश्यक आहे" या संकल्पनेवर आधारित नृत्य सादर करून योगा व ध्यानधारणेचे महत्त्व अधोरेखित केले. तर ज्युनियर केजीतील बालिकांनी ‘आजची नवदुर्गा’ या संकल्पनेतून स्त्रीशक्तीचे प्रतीक दाखवत शिक्षणाच्या माध्यमातून महिला लैंगिक शोषण, बालविवाह, बालमजुरी, महिला अत्याचार यांसारख्या वाईट प्रथांवर मात करू शकतात, असा प्रभावी संदेश दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्री-प्रायमरी विभागातील शिक्षकवृंद – सौ. स्नेहल गायकवाड, सौ. सोनाली साळवे, सौ. विजया घेरडे, सौ. सोनाली लावंड, सौ. वसुधा नगरे, सौ. क्रांती मखरे – यांनी अथक परिश्रम घेतले.
विभाग प्रमुख सौ. ज्योती मारकड यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले, तर सौ. तनुजा फुगे यांनी मनःपूर्वक आभार प्रदर्शन केले. आजच्या कार्यक्रमाला
संस्थेचे अध्यक्ष हनुमंत बनसुडे, सचिव नितीन बनसुडे, प्राचार्या वंदना बनसुडे, मुख्याध्यापक राहुल वायसे व उपमुख्याध्यापिका सुवर्णा वाघमोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या उपस्थितीने व प्रोत्साहनाने विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावले.

