प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी:
केज मतदार संघातील पाच ग्रामपंचायतींना ‘मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजने’ अंतर्गत कार्यालयीन इमारती उभारण्यासाठी एक कोटी पाच लाखांचा निधी मंजूर झाला आहे. आमदार नमिता मुंदडा यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले असून, याबाबतचा शासन निर्णय ३० सप्टेंबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आला आहे.
ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी आणि ग्रामपंचायतींना स्वतंत्र व सुसज्ज कार्यालयीन इमारती मिळाव्यात या उद्देशाने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आमदार नमिता मुंदडा यांनी या योजनेत आपल्या मतदारसंघातील ग्रामपंचायतींचा समावेश व्हावा यासाठी शासनदरबारी पाठपुरावा केला होता.
या मंजुरीनुसार, केज तालुक्यातील उंदरी (₹ २५ लाख), डोका (₹ २० लाख), पिंपळगव्हाण (₹ २० लाख) व बावची (₹ २० लाख) आणि बीड तालुक्यातील कारेगव्हाण (₹ २० लाख) या पाच ग्रामपंचायतींच्या इमारत उभारणीसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. शासनाने या इमारतींचे बांधकाम एक वर्षाच्या मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
या निर्णयामुळे केज, अंबाजोगाई आणि बीड तालुक्यातील ग्रामपंचायतींना सुसज्ज कार्यालयीन इमारती उपलब्ध होणार असून, स्थानिक प्रशासन अधिक प्रभावीपणे कामकाज करू शकेल. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय सुविधा मिळणे अधिक सुलभ होणार आहे.
या महत्त्वाच्या निर्णयाबद्दल आमदार नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आणि मंत्री पंकजाताई मुंडे यांचे विशेष आभार मानले आहेत.


