shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आरक्षणातील वाढते अराजक !!!


पंधरा वीस वर्षापूर्वी मराठा आणि धनगर आरक्षणाचे विषय समाजात चर्चेला आले. त्याच वेळी आमच्या सारख्या चळवळीत वावरणाऱ्या लोकांच्या लक्षात आले होते, कारण मूळ विमुक्त भटक्या जाती जमातींच्या आरक्षणात ज्या वेळी धनगर समाजाचा समावेश झाल्याने मूळ विमुक्त भटक्यांच्या आरक्षणाचा तंबू फाटला.त्याचा थेट फटका मूळ विमुक्त भटक्या जमाती च्या आरक्षणावर झाला .त्यानंतर मी स्वतः अप्रत्यक्ष त्या लढ्यात सामील होतो.मी सरकारी नोकरी मध्ये असल्याने मला ही बंधने होती .मग त्यात अ,ब,क,ड झाले व धनगरांना क म्हणुन स्वतंत्र आरक्षण दिले .त्यानंतर लगेच वंजारी ड म्हणुन घुसले .सुरुवातीच्या काळात आरक्षणाची अम्मल बजावणी करण्यासाठी फक्त " आंबेडकरी समाज " रस्त्यावर उतरला .आंबेडकरी समाजच आरक्षणाचा बॉकलाग भरण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करत होता. आज वर्गीकरणासाठी आग्रहाची मागणी करत असलेले मातंग अज्ञानी असल्याने अलिप्त होते. तर चर्मकार गुपचूप आरक्षणाचा लाभ घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ध्येय धोरणापासुन पुर्ण अलिप्त होते तर व्होल्लार। सारख्या छोट्या जातींनी जाती व्यवस्थेची झुल झिडकरली नव्हती.

हळूहळू का होईना मूळ विमुक्त भटक्या जमाती व ओबीसी मध्ये जागृती येत असताना मंडल आयोग लागू करण्यासाठी तत्कालीन प्रधानमंत्री व्ही.पी.सिंग यांनी पुढाकार घेतला .ओबीसी करिता असलेला मंडल आयोग लागू करावा म्हणून आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरत असतानाच प्रस्थापित वर्गाने मंडल आयोगाला विरोध करण्यासाठी ओबीसींच्याच हातात दगड दिला.मार आंबेडकरी जनतेने खाल्ला तो ही ओबीसींच्या आरक्षणासाठी हेतू इतकाच होता.त्यांना ओबीसी यांची साथ हवी होती .दुर्देवाने या देशात प्रखर जातीव्यवस्था आहे आणी ती तशीच रहावी यासाठी अनेक लोक आजही आग्रही आहेत. हिंदू म्हणुन जो पददलित वर्ग भरडला जात आहे त्याला हेच धर्ममार्तंड धार्मिक उत्सवात नाचायला लावत आहेत.मी शालेय जीवनापासून " विमुक्त भटक्या जमाती पददलित वर्गांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही बांधील आहोत " अशी अनेक पुढार्यांची भाषणे ऐकली पण आरक्षण लागु होणार नाही याची मात्र त्यांनी पुरेपूर काळजी घेतली .कॉंग्रेस च्या कालावधीत ब्राह्मण आणी मराठा हे सत्तेत होते आज भाजपाच्या राजवटीत ब्राह्मण मराठा व बनीया सत्ता गाजवत आहेत मात्र कॉंग्रेस व भाजपाच्या राज्यात एससी, एसटी ,व्हिजेएनटी, कमकुवत ओबीसी हे आहे तिथेच आहेत, उलट त्यांना परतीचा रस्ता दाखवण्यासाठी प्रस्थापित वर्गाने कंबर कसली आहे हेच वास्तव आहे.

आरक्षणाचा हेतू हाच होता की ज्या वर्गाला इथल्या वर्णव्यवस्थेचा आधार घेऊन या पददलित वर्गाला शिक्षण बंदी ,शस्र बंदी धनसंपत्ती साठवण्याची बंदी अश्या बंद्या उठवून समाज व्यवस्थेत सर्वांना समान वागणुक मिळावी.अनुसूचित जाती हे बहिष्कृत होते ,विमुक्त भटक्या जमाती व कमकुवत ओबीसी हे उपेक्षित आहेत. 78 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर ही त्यात फारसा बदल झालेला नाही उलट या पददलित हिंदुन लोकशाहीचा लाभ न देता राज्यकर्ते मुस्लिमांना आभासी शत्रू दाखवुन एकमेकांविषयी तिरस्कार निर्माण केला जात आहे.आणि ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळवुन समान पातळीवर आणायचा उद्देशालाच बाधीत करून अनेक अडथळे आणले जात आहेत.

आता आपण प्रस्थापित वर्गातील राज्यकर्त्यांनी तोंडात फुले, शाहु आंबेडकर यांचे नाव घेतले,पुरोगामी महाराष्ट्र म्हणुन गजर केला हा देश संविधानानुसार चालतो.ते विशेषतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधान यांचे कौतुक ही करतात पण सत्य आपल्याला तपासणे गरजेचे आहे.त्यांनी पहीली चाल खेळली ती आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या जातींना पहिला अडथळा आणला तो म्हणजे बॅकलॉग कधीच भरला नाही.प्रशासकीय अधिकारी सुद्धा त्यांचेच असल्यामुळे वेळोवेळी खोटे अहवाल दिले.दुसरी चाल अशी खेळली संबंधित वर्गातील व्यक्ती न मिळाल्यामुळे दुसऱ्या आरक्षण लाभार्थी जमातीकडे ती जागा अंतरपरिवर्तनीय जी.आर.काढून वळवली.आणि तिसरी भयानक चाल म्हणजे बोगस जातघुसखोरी करण्यासाठी प्राधान्य दिले.आज ही आदिवासी विमुक्त भटक्या जातीजमाती समाजातील लाखात नोकऱ्या चोरीला गेल्या .विमुक्त समाजातील राजपुत भामटा ही त्या विमुक्त जाती पैकी एक आहे. ज्यांची लोकसंख्या महाराष्ट्रात जेमतेम वीस हजाराच्या आसपास आहे पण राजपुत भामटा जातीचे दाखले मात्र लाखात वितरीत झाले आहेत.आज ही या बोगस जातघुसखोरी च्या प्रश्नांवर डॉ.अनिल साळुंके व डॉ.कैलास गौड जिवाच्या आकांताने लढा देत आहेत.त्यांना जीवघेण्या धमक्या ही आलेल्या आहेत.घिसाडी,टकारी आणि छप्पर बंद सारख्या अनेक जाती बोगस जातघुसखोरी च्या बळी ठरत आहेत.आता मराठ्यांचा सरसकट कुणबी म्हणुन दाखला घेण्यासाठी शासनाला वेठीस धरत आहेत .या देशात समतेचा विषय गाडण्याची पुर्ण तयारी झाली आहे.

स्वतःची जात उंच ठरवायची व कमकुवत जातीचा बळी घ्यायचा हेच धोरण चालू आहे.धनगरांचा मराठ्यांचा ओबीसी मधील शिरकावाला विरोध करायचा व धनगर समाजाच्या समावेश आदिवासी मध्ये करण्यासाठी आग्रह धरायचा. या सगळ्या मध्ये मूळ विमुक्त भटक्या जमाती आदिवासी व कमकुवत ओबीसी बलुतेदार अलुतेदार मायक्रो ओबीसी सध्याच्या आरक्षणाच्या लढ्याचे स्वरुप पाहून पूर्ण भेदरुन गेलेले आहेत.म्हणजे ज्यांना काहीच मिळाले नाही त्यांना काही मिळेल अशी आशा ही राहीलेली नाही.आरक्षण हा विषय सामाजिक समतेच्या ऐवजी दांडगाव्याचा झालेला आहे. एक जात दुसऱ्या जातीला पाण्यात पहात आहे.समाज्यातील बंधूभाव पूर्ण रसातळाला गेला असताना कोणी त्या वर बोलले तर त्याला " शहरी नक्षलवादी " ठरवले जात आहे.याच गतीने आपण लोकशाहीचा गळा तर घोटत नाही ना ? अशी परिस्थिती आहे.

मी स्वतः जात व्यवस्थेचा बळी आहे.मी सरकारी नोकरी करत असताना माझे सहकारी जे उच्च वर्णीय होते त्यांचे मला फार कटु अनुभव आलेले आहेत .फार क्रूर लोक आहेत. त्याच जाचाला कंटाळून मी सरकारी नोकरी सोडली.

साधारण स्वातंत्र्यानंतर ते अगदी 1990 पर्यंत जे अधिकारी होते, ते उच्च वर्णीयच होते. पण ते या पददलित वर्गाला सहानुभूती देऊन सहकार्य करत होत.माझे वडील कै.बाबुराव आण्णा माने हे कोकणात महाड ,रत्नागिरी ,चिपळूण अश्या ठिकाणी जाऊन किरकोळ ठेकेदारी करत असत त्यावेळी के.व्ही .साठे साहेब ,हसबनीस साहेब ,दि.ना.गारखेडकर साहेब अश्या अनेक लोकांनी माझ्या वडिलांसारखे जे वडार, बेलदार ,बंजारा अश्या बांधकामाशी निगडित काम करणाऱ्या जातींच्या लोकांना सहकार्य केले .मी स्वतः 1983 सार्वजनिक बांधकाम खात्यात अभियंता म्हणुन नोकरीला लागलो .मला पी.बी.इनामदार ,व्हि एस. करंदीकर ,ए .जे जगताप असे उच्च वर्णीय अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम केले पण त्यांच्या कडे चांगली वागणुक तर मिळालीच शिवाय सहकार्य सुद्धा चांगले मिळाले.1995 नंतर मात्र उच्च वर्णीय अधिकाऱ्यांची वर्तणूक ही भेदभावाची होती.मी माझ्या " मी अनुभवलेला जातीभेद " या पुस्तकात सविस्तर नावानिशी सर्व प्रसंग लिहिले आहेत .

आरक्षणाकडे सामाजिक विकृती च्या नजरेतुन 1990 नंतर बघण्याचा फार मोठा प्रघात सुरु झाला.1950 ते 1965 पर्यंत जन्मलेली मुले ज्यांनी शिक्षण अनेक विपरीत परिस्थिती मधुन घेतले .त्यांच्या घरची हालाखीची परिस्थिती तर होतीच शिवाय सामाजिक अवहेलना सुद्धा सामोरे जावे लागले.  त्याच परिस्थिती मधुन तयार झालेली पहील्या पिढीसाठी नोकरी मध्ये सर्व काही आलबेल नव्हते.आरक्षणा मधील पदोन्नतीला तर प्रस्थापित अधिकारी बिलकुल अनुकूल नव्हते .शिवाय डिपार्टमेंटल इन्क्वॉयरी ,खोट्या केसेस तर केल्याच शिवाय पदोन्नती बाबत अनेक कोर्ट केसेस ही केल्या .थोडक्यात जाती व्यवस्थेच्या कचाट्यातून काहीच सुटले नाही.1995 नंतर अनेक जातीवादी अधिकार्यांनी वडार, बेलदार ,बंजारा व मागासवर्गीय ठेकेदारांना त्रास देण्यास सुरुवात केली .व त्यांच्याच जातींच्या ठेकेदाराला काम देण्यासाठी आग्रह धरला म्हणजे थोडक्यात प्रस्थापित जातींनी मागासवर्गीय जातींची आर्थिक कोंडी करण्यासाठी चंग बाधला. हे वास्तवात घडलेले आहे. व मी उघड्या डोळ्यांनी सारे पहात होतो.

जातीय तेढ फक्त आरक्षणांपुरतीच होती असे नाही.महाराष्ट्रातील अनेक मागासवर्गीय शिकलेल्या लोकांनी ब्राह्मण मुलींशी लग्न केले पण तेथे फार खळखळ झाली नाही. पण मागासवर्गीय ,विमुक्त भटक्या जमाती व बलुतेदार अलुतेदार मायक्रो या वर्गातील मराठा अथवा तत्सम जातीच्या मुलींनी जर उपरोक्त वर्गातील मुलांच्या बरोबर प्रेम विवाह केल्यावर एक मूल झाल्यावर सुद्धा मुलगी आणि जावयाला जिवांनिशी मारुन टाकलेली असंख्य उदाहरणे आहेत.ग्रामीण पातळीवर एससी, एसटी ,व्हिजेएनटी, व कमकुवत ओबीसी यांच्या जमीनीवर जाणूनबुजून अतिक्रमण केले जाते, हे वास्तव सर्वांना माहित आहे .स्वातंत्र्याला आज 78 वर्षे पूर्ण होऊन ही संविधानातील न्याय ,स्वातंत्र्य, समता व बंधुभाव अजून कागदावरच म्हणजे फक्त हे आरक्षणा पुरते मर्यादीत नाही .हा गुंता लवकरात लवकर सोडवावा लागेल. अर्थात साराच दोष दुसऱ्याला देता येणार नाही .ज्यांनी सरकारी नोकरी चे आरक्षणाचा लाभ घेतला व घेत आहेत त्यांनी उर्वरित समाजासाठी काय केले हे तितकेच महत्वाचे आहे.तर आरक्षणातील राखीव जागेवर निवडून गेलेल्या खासदार ,आमदारांनी काय केले ? की केवळ  प्रस्थापित राजकारणी लोकांशी जुळवून घेऊन स्वतःच्या तुंबड्याच भरल्या काय ?

ओबीसी आरक्षण हे फक्त माळी धनगर,वंजारी पुरतेच मर्यादित आहे. ग्रामीण आणि राज्य पातळीवर आमदारकी साठी याच समाजाचा विचार होतो.ओबीसी मधील जे आमदार आहेत ते याच समाज्यातील आहेत.कुणबी मराठा हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे.ओबीसी मधील नाभिक, परिट, लोहार, सुतार ,कासार आमदार झाल्याचे माझ्यातरी ऐकवात नाही .तीच परिस्थिती मुळ विमुक्त भटक्या जमाती मधील आहे मुळ विमुक्त भटक्या जमातींच्या 42 जाती पैकी खासदार आमदार फक्त बंजारा समाज्यातील आहेत .त्याच मुळे जातवर्गीकरणा सारखे विषय पुढे येतात म्हणुनच म्हणतो  या देशात " सामाजिक समता नांदेलच कशी? आजही अनुसूचित जाती ,अनुसूचित जमाती मुळ विमुक्त भटक्या जमाती व कमकुवत ओबीसी मधील तरुणांना व महिलांना अमानुष मारले जाते, ते केवळ जातीघृणतेतून, या साऱ्या गोष्टी आज ही थांबलेल्या नाहीत.इतकी प्रखर आणि क्रुर या देशातील जातीव्यवस्था आहे.
। जयभीम।    


लेखक:-- 
तुकाराम माने निवृत अभियंता व विमुक्त भटक्या मधील पुरोगामी विचारांचा पुरस्कर्ता
close