shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गुंडेगाव येथे मैत्रीच्या प्रवासातील आठवणींचे विलक्षण क्षण अनुभवण्याचा स्नेहमेळावा संपन्न

*ज्या शाळेने घडविले तेच आता शाळेलाही घडवणार...*

*माजी विद्यार्थी सन २००२ बॅचचा स्नेहमेळावा संपन्न....*

वाळकी प्रतिनिधी(दादासाहेब आगळे) :- 
न्यू इंग्लिश स्कूल गुंडेगाव,तालुका अहिल्यानगर येथील सन २००२ या वर्षातील विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा स्नेहमेळावा नुकताच संपन्न करण्यात आला.यावेळी संमेलनाच्या सुरुवातीला शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे स्वागत करण्यात आले व दिवंगत शिक्षक,मित्रांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.प्रमुख पाहुणे शिक्षकांच्या हस्ते सरस्वती पूजनाने संमेलनास प्रारंभ झाला नंतर विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी आपली मनोगते व्यक्त करत सर्वांनी मैत्री शाळेतील बाकांवरची आठवणीच्या नात्यांची आपल्या शाळेच्या आठवणी, शिक्षक,अभ्यास,शाळेदरम्यान घडलेले विविध प्रसंग,शाळेच्या सहली असे अनुभव परिचय व भाषणातून देत असताना या माजी विद्यार्थ्यां सोबतच त्यांचे शिक्षक देखील समोर सांगत असलेल्या आठवणींमध्ये रमलेले पहायला मिळाले.जुन्या आठवणींना उजाळा देताना विद्यार्थी विद्यार्थिनी सांगितले की दहावीचा शेवटचा पेपर लिहिला की एका क्षणात शाळा संपल्याची जाणीव तसेच दहावी निकालानंतर शाळेकडे वळणाऱ्या पावलांना हळूहळू झालेला शाळेचा रस्ता अनोळखी होता आज केवळ व्ह़ॉट्सअप ग्रुपवर चर्चिल्या जाणाऱ्या आठवणी,शाळेतील धमाल,मित्रांसह केलेला दंगा पुन्हा एकदा आनंदी जगण्याची संधी आजच्या स्नेहमेळामुळे विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळली आहे.वय,नोकरीचे क्षेत्र,शेती,व्यवसाय, धकाधकीचे जीवन या सगळ्याच सीमा ओलांडत आज शाळेच्या प्रांगणात आठवणींचे ढग दाटून आले आहेत.आज जरी शाळेच्या नूतनीकरणासाठी जुन्या इमारतीला निरोप देण्यात आला असला तरी आपल्याला घडवलेली शाळा, इथली इमारत, वर्ग, फळा, आवार, तिथल्या आठवणी सगळे मनात साठवण्यासाठी खास स्नेहमेळावा समारंभ झाला असुन अवघ्या तीन दिवसांतच शाळेच्या हाकेला प्रतिसाद देत सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक जमले आहेत.
        न्यू इंग्लिश स्कूल गुंडेगाव केवळ विद्यादान करणारी शाळा नाही तर सुसंस्कार करणारे  केंद्र आहे असे अनेक विद्यार्थ्यांच्या मनोगतांच्या भावनांतून दिसून आले. यावेळी लाभलेल्या व आज हयात नसलेल्या शिक्षकांच्या अध्यापन विषयक अनेक आठवणी काढल्या. शिक्षक अध्यापनाचे कार्य करीत असतातच पण एखादा विद्यार्थी एखाद्या शिक्षकाचे शब्द मनात घेऊन तो त्याच्या भविष्याला आकार देत असतो त्याची प्रचिती अशा कार्यक्रमातून ठळकपणे दिसत असते.विद्यार्थ्यांवर असणारे  शाळेचे आजीवन संस्कार ऋण कायम असतेच पण त्या शाळेच्या वास्तूत एक स्नेहस्मृती भेटवस्तू असावी या भावनेने २००२ च्या विद्यार्थी, विद्यार्थीनींनी रोख स्वरूपात ५० हजार रुपये शाळेला भेट देऊन हे शाळेचे ऋण व्यक्त करण्याचा अल्पसा प्रयत्न केला.ही मदत सर्वस्वी जरी नसली तरी त्यामागची भावना संस्कारित करणारी आहे असे भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
         यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विजय कासार यांनी केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास दादा कोतकर,तर उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक उत्तम निकम होते. प्रमुख पाहुणे शिक्षण क्षेत्रातील आधारस्तंभ शिक्षक सुधीर काळे,श्रीमती.एस.यु.वाघ,एस.एस.वाघ,आर.एन.पिंपळे,बी.आर.काळे.एम.एम.शिंदे,एन.एम.बोठे,एस.आर.पेठकर, बाळासाहेब साबळे, शंकर झेंडे, अनिल कोतकर,सोपान भापकर, दिलीप लोखंडे आदी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

      शिक्षकांनी आपल्या मनोगतात सांगितले की त्याकाळी लावलेल्या शिक्षण बीजाचा आज वटवृक्ष झाला आहे. शिक्षण,क्रीडा,कला,उद्योग,समाजकारण,राजकारण,शेती यांसारख्या सर्वच क्षेत्रात न्यू इंग्लिश स्कूल गुंडेगावचे विद्यार्थी दिसले नाहीत तर नवल.माजी विद्यार्थ्यांच्या यादीतील प्रत्येकजण आज गावांसह शहरात अनेकजण उच्च पदावर कार्यरत आहेत हे आज शिक्षकांनी दिलेल्या शिक्षण शिदोरीचे यश असुन आज आम्ही शिक्षक समाधान व्यक्त करत आहोत आज स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने जमलेला प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनी त्यावेळची शाळेतील शिक्षणपद्धती, सराव आणि संस्कार या त्रिसूत्रीमुळे यशाचे श्रेय आहे असे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी विलासदादा कोतकर,सुधीर काळे,श्रीमती.एस.यु.वाघ,एस.एस.वाघ,आर.एन.पिंपळे,बी.आर.काळे,यांनी व्यक्त केले.सदर औपचारिक  कार्यक्रम संपल्यावर  सर्वांनी उत्तम जेवणाचा आस्वाद घेतल नंतर सर्वांनी एकत्र बसून थट्टा मस्करी करीत काही वेळ व्यतीत केला.असा हा स्नेहमेळावा सर्वांच्या स्मृतीत कायम राहणारा व आनंद देणारा ठरला आहे.या स्नेहमेळाव्यासाठी माजी विद्यार्थी विद्यार्थिनी मध्ये न्यू इंग्लिश स्कूल गुंडेगावचे संदिप भापकर,रवींद्र कासार, रविकांत हराळ,सचिन माने,दत्ता कुताळ,सुनिल दिवटे,सीमा जगताप,राजश्री मोहारे,अर्चना शिंदे,रोहिणी कुताळ,रमेश हराळ,सुनीता हराळ,निलम जाधव शेटे,राजश्री जगदाळे भापकर, ताई येठेकर,मनिषा भापकर,सचिन कोतकर,संदिप,भापकर संभाजी कासार,जयश्री भापकर,पुष्पा कळमकर,युवराज कुताळ,स्वाती  कोतकर,शिवाजी सकट, योगेश जवक,भूषण इंगळे,सागर जाधव,नितीन हराळ,मनीषा कोतकर,शरद कुताळ,कल्पना चौधरी,बाळू कासार,संदिप हराळ,मनिषा हराळ,दादासाहेब आगळे,सीमा साळवे,स्वाती माने, प्रिया भोसले इ.विद्यार्थी विद्यार्थिनींनी स्नेह संमेलनाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.सचिन माने यांनी कार्यक्रमाला उपस्थित सर्वांचे आभार मानले.


चौकट...

हे ज्ञानमंदिर आता नव्या ढंगात उभे राहिले आहे‌.शालेय जीवनाचा चित्रपट डोळ्यांसमोरून झरझर सरकतोय. काही चित्र पुसट, तर काही खूपच उजळ! आमचे वर्ग, वर्गातला फळा, बेंच, वर्गात बसून दिलेल्या परीक्षा आणि गॅदरिंग सहल हे सगळं आठवताना चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात आसू नकळत येत आहेत ! या ज्ञानमंदिराचे हे साजिरे गोजिरे रूप आपल्या नजरेसमोर आहे.

रविंद्र कासार - माजी विद्यार्थी.

चौकट...

शाळेने काय दिले तर ते म्हणजे संस्कारांची शिदोरी आणि जगण्याची उमेद. ही शिदोरी आज आम्ही आपआपल्या परीने नव्या पिढीला देत आहोत. तब्बल २० वर्षांनी मी शाळेत आले आणि मैत्रिणी,शिक्षिका यांसह शाळेच्या वास्तूला भेट देता आली हा क्षण आयुष्यभर स्मरणात राहील.२० वर्षांपूर्वी शाळेने दिलेली शिक्षणाची ही सुंदर भेट आज आमच्यासाठी फार अनमोल ठरली आहे.मातृभाषेतून शिक्षण देऊ करणारी आमची शाळा आम्ही ज्ञानदेवता मानतो.

निलम शेटे (जाधव)- माजी विद्यार्थीनी

चौकट..

 तब्बल पाच  हजारांहून अधिक विद्यार्थ्यांशी संपर्क साधायचा कसा हा विचार करताना सोशल मीडियाचा आधार घेण्यात आला आणि अवघ्या काही तासांत सोशल माध्यमे सरस्वतीमय झाली. विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने  विद्यार्थी जोडण्याचे काम व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून करण्यात आले असून माजी विद्यार्थी यांच्या मदतीने शाळेचे रुपड बदलण्यास वेळ लागणार नाही.ग्रुप स्थापना झाल्यानंतर सोशल माध्यमे विद्यार्थ्यांच्या आठवणीत रंगली आहेत कार्यक्रमाचे फोटो,व्हिडीओ, अनेक कविता,विद्यार्थ्यांच्या आठवणी व्हायरल झाल्या विद्यार्थ्यांनी याच माध्यमाचा वापर करत कार्यक्रमात सहभाग घेत आहे तसेच भविष्यात सन १९७० ते २०२५ पर्यंत विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक स्नेहमेळावा आयोजित करण्यात येणार आहे याचा फायदा विद्यालयास होणार आहे.

उत्तम निकम - मुख्याध्यापक,गुंडेगाव.
close