आरोपी वकीलावर कठोर कारवाईची मागणी; आजही समाजात जातीयवादी विचारसरणी जिवंत - प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव साळवे
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्या. भूषण गवई यांच्यावर न्यायालयीन सुनावणी दरम्यान बूट फेकून हल्ला करण्याच्या घटनेचा राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे. या घटनेत सहभागी असलेल्या वकिलावर तत्काळ व कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महासंघाच्या शिष्टमंडळाने अहिल्यानगर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव साळवे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देऊन ही मागणी केली. यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब केदारे, राज्य उपाध्यक्ष राजेंद्र बुंदेले, दिपक पाचारणे, मानिक नवसुपे, ज्ञानेश्वर म्हेसमाळे, अतुल देव्हारे, आप्पासाहेब केदारे, संतोष उदमले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनात पुढे अहे नमूद करण्यात आले आहे की, सर्वोच्च न्यायालय हे देशातील न्याय, समता आणि संविधानाचे सर्वोच्च मंदिर आहे. अशा ठिकाणी देशाचे सरन्यायाधीश, जे स्वतः अनुसूचित जातीतील आहेत, त्यांच्यावर अशा प्रकारे हल्ला होणे अत्यंत लज्जास्पद आणि गंभीर बाब असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
याप्रसंगी शिवाजीराव साळवे म्हणाले की, ही घटना केवळ एका व्यक्तीवरचा हल्ला नाही,तर भारताच्या न्यायव्यवस्थेवर आणि संविधानावर थेट आघात आहे. सरन्यायाधीश भूषण गवई हे त्यांच्या कार्यकुशलतेने आणि प्रामाणिकपणाने सर्वोच्च न्यायालयात मानाचे स्थान प्राप्त केलेले न्यायाधीश आहेत. त्यांच्यावर असा अपमानजनक प्रकार घडणे म्हणजे संपूर्ण मागासवर्गीय समाजाचा अपमान आहे, आजही समाजात जातीयवादी विचारसरणी जिवंत असल्याचे या घटनेतून स्पष्ट दिसून येते. देशाच्या सर्वोच्च न्यायालयातील अनुसूचित जातीतील सरन्यायाधीश यांच्यावर असा हल्ला होत असेल, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी कशी राहील, हा गंभीर प्रश्न असल्याचे सांगितले.
महासंघाने दिलेल्या निवेदनात सरकारने या प्रकरणाची तातडीने आणि गंभीर दखल घेऊन आरोपी वकीलावर कठोर कारवाई करावी, तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
...............................................