प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी
बीड जिल्ह्यात तसेच केज तालुक्यात सध्या जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, येवता जिल्हा परिषद गट (ओबीसी महिला राखीव) चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. या गटातून माजी सभापती (पंचायत समिती केज) सौ. परिमल विष्णू घुले या महायुतीकडून भाजपच्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत.
सौ. परिमल घुले यांचे पती विष्णू घुले हे भाजपचे युवा नेते, माजी सरपंच आणि पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांचे खंदे समर्थक म्हणून परिचित आहेत. स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून घुले कुटुंबीय मुंडे घराण्याशी एकनिष्ठ असून, विष्णू घुले यांची ओळख मंत्री पंकजा मुंडे व माजी खासदार प्रीतमताई मुंडे यांचे विश्वासू कार्यकर्ते अशी आहे.
दांडगा जनसंपर्क आणि सामाजिक कार्यात सक्रियता:
विष्णू घुले हे राजकीय घडामोडींसोबतच सामाजिक कार्यातही सतत कार्यरत असतात. त्यांनी आपल्या संपर्काच्या बळावर येवता जिल्हा परिषद गट पिंजून काढला आहे. ते जनतेच्या अडीअडचणींसाठी २४ तास उपलब्ध असणारे कार्यकर्ता म्हणून ओळखले जातात. विष्णू घुले मित्र मंडळाच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम आणि आंदोलनात सक्रिय सहभाग घेत गरजूंना वेळोवेळी मदत केली आहे. केज तालुक्यात आणि विशेषतः येवता जिल्हा परिषद गटात 'कामाचा माणूस' म्हणून त्यांची ओळख आहे.
माजी सभापती म्हणून कामाची छाप:
सौ. परिमल विष्णू घुले यांनी केज पंचायत समितीच्या सभापती म्हणून आपल्या कामाची छाप उमटवली आहे. त्यांचा प्रशासकीय अनुभव आणि विष्णू घुले यांच्या दांडग्या जनसंपर्कामुळे, सौ. परिमल घुले यांनाच महायुतीकडून भाजपची उमेदवारी मिळावी, अशी मागणी येवता जिल्हा परिषद गणातून अनेक गावांतून जोर धरू लागली आहे.
माजी सभापती म्हणून सौ. परिमल घुले यांनी केलेल्या विकासकामांची पावती म्हणून, त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळाल्यास, त्या निश्चितपणे निवडून येतील, अशी चर्चा येवता जिल्हा परिषद गटातील गावोगावी सुरू आहे. ओबीसी महिलांसाठी राखीव असलेल्या या महत्त्वाच्या जागेवर आता भाजप कोणाला संधी देणार, याकडे संपूर्ण केज तालुक्याचे लक्ष लागले आहे.