अंबाजोगाईकरांच्या विकासाचा संकल्प राबवणार : भाजपा शहराध्यक्ष संजय गंभीरे
प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी
अंबाजोगाई नगरपरिषदेची आगामी निवडणूक भारतीय जनता पार्टी (भाजपा) मोठ्या ताकदीने लढवणार असून, अंबाजोगाईकरांच्या विकासाचा संकल्प आमदार सौ. नमिताताई अक्षय मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येईल, असे प्रतिपादन भाजपा शहराध्यक्ष संजय गंभीरे यांनी केले आहे. या पार्श्वभूमीवर, भाजपाकडून नगरपालिका निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या इच्छुकांनी तातडीने उमेदवारी मागणी अर्ज दाखल करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन, पर्यावरण आणि हवामान बदल विभागाच्या मंत्री पंकजाताई मुंडे, माजी खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे आणि आमदार सौ. नमिताताई अक्षय मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली, तसेच ज्येष्ठ नेते नंदकिशोरजी मुंदडा काकाजी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा नेते अक्षय भैय्या मुंदडा यांच्या दूरदृष्टीतून अंबाजोगाईच्या विकासाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपा सज्ज झाली आहे.
अर्ज दाखल करण्याची मुदत:
नगराध्यक्षपद आणि नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या भाजपाच्या इच्छुकांनी आपले उमेदवारी मागणी अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह मंगळवार, दिनांक १४ ऑक्टोबर आणि बुधवार, दिनांक १५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आमदार सौ. नमिताताई अक्षय मुंदडा यांच्या संपर्क कार्यालयात दाखल करावेत, असे आवाहन शहराध्यक्ष गंभीरे यांनी केले आहे. या ठिकाणी भाजपा शहराध्यक्ष संजय गंभीरे, माजी नगराध्यक्ष महादू मस्के आणि नाना गायकवाड हे उपस्थित राहून अर्ज स्वीकारणार आहेत.
निवडणुकीत विजयाची खात्री:
यावेळी बोलताना शहराध्यक्ष गंभीरे यांनी अंबाजोगाई शहरातील संघटनात्मक कार्याचा आढावा घेतला. प्रत्येक प्रभागात भाजपाकडे ताकदीचे उमेदवार उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्री पंकजाताई मुंडे, माजी खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे आणि आमदार सौ. नमिताताई अक्षय मुंदडा यांच्या माध्यमातून शहरासाठी आणलेला भरीव विकास निधी, ज्येष्ठ नेते नंदकिशोरजी मुंदडा काकाजी आणि युवा नेते अक्षय भैय्या मुंदडा यांच्या दूरदृष्टीतून झालेली असंख्य विकास कामे, तसेच जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांच्या सूचनेनुसार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेले प्रभावी काम आणि राबविलेले उपक्रम यामुळे आगामी निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला निश्चितच चांगले यश मिळेल, असा विश्वास शहराध्यक्ष संजय गंभीरे यांनी व्यक्त केला.


