जनविकास फाउंडेशनच्या माध्यमातून आधार; हारुणभाईंच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक
प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी
वडिलांचे छत्र हरवलेल्या दोन लहान मुलांचे पालकत्व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा पवार पक्ष) पक्षाचे ज्येष्ठ नेते, जीवन शिक्षण संकुलचे सचिव आणि जनविकास फाउंडेशनचे प्रमुख हारुणभाई इनामदार यांनी स्वीकारले आहे. जन विकास फाउंडेशन आणि जीवन शिक्षण संकुलच्या माध्यमातून त्यांनी दिवंगत अशोक रामकिसन सौदागर यांच्या कुटुंबाला मोठा आधार दिला आहे. त्यांच्या या कार्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
दुर्दैवी घटना:
अशोक रामकिसन सौदागर (वय ३५, रा. अहिल्यादेवी नगर, उमरी रोड, केज) हे कुटुंबासह (आई-वडील, पत्नी आणि दोन लहान मुले) वास्तव्यास होते. केज शहरातील एका गॅस एजन्सीमार्फत गॅस सिलिंडर वितरण करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. शनिवार, दिनांक ११ ऑक्टोंबर २०२५ रोजी सायंकाळी ते त्यांच्या कुलदैवताच्या यात्रेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील पठाण कुलवडी येथे श्री विठ्ठल बिरुदेव यांच्या दर्शनासाठी निघाले होते. वाटेत नरसिंग वाडी येथील दत्त मंदिर नदीकाठी रविवार, दिनांक १२ ऑक्टोंबर २०२५ रोजी सकाळी ५ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास अंघोळ करत असताना पाण्यात बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती नागरिकांतून मिळत आहे. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही.
अश्रुपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार:
दिनांक १३ ऑक्टोंबर २०२५ रोजी सकाळी ९:३० वाजता केज शहरातील क्रांतीनगर येथील सार्वजनिक स्मशानभूमी येथे स्व. अशोक रामकिसन सौदागर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, वैद्यकीय, धार्मिक क्षेत्रांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर, मित्र परिवार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकत्व स्वीकारून दिलासा:
अशोक सौदागर यांना श्रद्धांजली वाहताना सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले आणि काही नागरिकांनी त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत हारुणभाई इनामदार यांनी तातडीने मदतीचा हात पुढे केला. त्यांनी स्व. अशोक सौदागर यांचे दोन पुत्र चि. अथर्व अशोक सौदागर (वय ८, इयत्ता ३ री) आणि चि. आरुष अशोक सौदागर (वय ४) यांच्या इयत्ता बारावीपर्यंतच्या शिक्षणाचे पालकत्व स्वीकारले आहे. हारुणभाई इनामदार यांच्या या सामाजिक बांधिलकीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
गरजू कुटुंबाला मदतीचे आवाहन:
दिवंगत अशोक सौदागर यांच्या पश्चात आई-वडील (दोघेही वयोवृद्ध), पत्नी आणि दोन लहान मुले असे कुटुंब आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांच्या निधनानंतर हे कुटुंब उघड्यावर आले आहे. कुटुंबाकडे उपजीविकेचे कोणतेही साधन नसल्याने मुलांच्या शिक्षणासह जगण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले यांनी मित्र परिवाराच्या वतीने सर्व सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, वैद्यकीय, धार्मिक क्षेत्रांतील मान्यवर, संस्था आणि नागरिकांना स्वर्गीय अशोक सौदागर यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे. ही मदत स्व. अशोक सौदागर यांचे वडील रामकिसन सौदागर यांच्याकडे जमा करावी, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
नगराध्यक्षांकडून मदतीचा संदेश:
नगराध्यक्षा सौ. सीताताई प्रदीप बनसोड यांनी देखील या दुर्दैवी घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. "स्वर्गीय अशोक सौदागर हे गॅस वितरणामुळे केज शहरातील प्रत्येक कुटुंबाचा सदस्य बनले होते. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली असून सौदागर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांना आधाराची व आर्थिक मदतीची फार मोठी गरज आहे. म्हणूनच आम्ही जनविकास फाउंडेशन आणि जीवन शिक्षण परिवाराच्या वतीने त्यांच्या दोन मुलांच्या शिक्षणाचे बारावीपर्यंतचे पालकत्व स्वीकारले आहे," असे त्यांनी सांगितले. तसेच, "जी समाजबांधव जबाबदारी देतील ती स्वीकारण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. परंतु, सर्वच क्षेत्रांतील लोकप्रतिनिधींनी पुढे येऊन सौदागर कुटुंबियांना होईल तेवढी मदत देऊन आर्थिक आधार देण्याचे काम करावे," असे आवाहन त्यांनी केले.