shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तिघांच्या शतकाने टिम इंडियाची स्थिती भक्कम..

           डब्ल्यूटीसी अंतर्गत खेळल्या जात असलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी आपली ताकद दाखवली. केएल राहुल, ध्रुव जुरेल आणि रविंद्र जडेजा यांनी शतके झळकविल्याने भारताने दिवसअखेर पहिल्या डावात पाच बाद ४४८ धावा केल्या. भारताकडे आतापर्यंत २८६ धावांची आघाडी आहे. खेळ संपला तेव्हा जडेजा १७६ चेंडूत सहा चौकार आणि पाच षटकारांसह १०४  तर वॉशिंग्टन सुंदर नऊ धावांवर खेळत होते. वेस्ट इंडिजकडून रोस्टन चेसने दोन तर जेडेन सील्स, जोमेल वॉरिकन आणि कॅरी पियरे यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.


                भारताने दुसऱ्या दिवशी २ बाद १२१ धावांवर खेळ सुरू केला आणि ३२७ धावा करत तीन गडी गमावले. शुभमन गिल, केएल राहुल आणि ध्रुव जुरेलच्या रूपात भारताला तीन झटके सहन करावे लागले. गुरुवारी यशस्वी जयस्वाल (३६) आणि साई सुदर्शन (७) आधीच बाद झाले होते. वेस्ट इंडिजचा पहिला डाव १६२ धावांवर संपला. पहिल्या दिवशी भारताच्या गोलंदाजांनी आपली ताकद दाखवली होती, तर दुसऱ्या दिवशी फलंदाजांनी वर्चस्व गाजवले.

                 गिल आणि राहुलने दुसऱ्या दिवशी फलंदाजीची सुरुवात केली. शुभमन गिलने अर्धशतक ठोकले, तर राहुलने पहिल्या सत्रात आपले शतक पूर्ण केले. अर्धशतक झळकविल्यानंतर गिल जास्त वेळ क्रीजवर राहू शकला नाही आणि ५० धावांवर बाद झाला. राहुल आणि गिलने तिसऱ्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी केली. या दरम्यान, राहुलने जवळजवळ नऊ वर्षांनंतर घरच्या मैदानावर कसोटी शतक फटकविले. राहुलचे हे अकरावे कसोटी शतक ठरले, जे भारतीय भूमीवरील त्याचे दुसरे शतक आहे. त्याने १९० चेंडूत शतक पूर्ण केले. उपहारानंतर राहुलला त्याची लय राखता आली नाही आणि तो वॉरिकनच्या गोलंदाजीवर १९७ चेंडूत बरोबर १०० झेलबाद झाला, त्यात त्याचे १२ चौकार होते.

                राहुल आणि गिल परतनंतर, जुरेल आणि जडेजाने भारतीय डाव सावरला. दोन्ही फलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना जेरीस आणले. या दरम्यान जुरेलने त्याच्या कारकिर्दीतील पहिले कसोटी शतक ठोकले. जुरेल आणि जडेजाने पाचव्या विकेटसाठी २०५ धावांची भागीदारी केली, जी पियरे-ज्युलियसच्या जोडीने मोडली. जुरेलने २१० चेंडूत १५ चौकार आणि तीन षटकार मारून १२५ धावा केल्या.

               जुरेल बाद झाल्यानंतर, जडेजाने गियर बदलले आणि आक्रमक खेळ करत त्याचे सहावे कसोटी शतक गाठले. शतक झाल्यानंतर, जडेजाने त्याच्या खास शैलीत तलवारीसारखी बॅट फडकावून आनंद साजरा केला. जडेजा खेळ संपेपर्यंत क्रीजवर होता आणि दुसऱ्या दिवशी नाबाद परतला. आता आहे त्या धावा पुरेशा असून भारत आपला डाव घोषितही करु शकतो. तसं झालं नाही तर जडेजा आणि सुंदर तिसऱ्या दिवशी भारताची आघाडी आणखी वाढवण्याचे लक्ष्य ठेवतील, तर जर वेस्ट इंडिजला सामन्यात पुनरागमन करायचे असेल तर त्यांना भारतीय संघाला लवकर बाद करावे लागेल.

               वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताच्या ध्रुव जुरेलने पहिल्या डावात शतक झळकावले. जुरेलने १९० चेंडूत आपले पहिले कसोटी शतक पूर्ण केले. जुरेल आणि रवींद्र जडेजा यांनी पाचव्या विकेटसाठी २०० पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली आणि संघाची आघाडी २६० धावांच्या पुढे नेली. वेस्ट इंडिज मालिकेसाठी जखमी यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंतच्या जागी जुरेलला संधी देण्यात आली आणि त्याने त्याचा पुरेपूर फायदा घेतला. जुरेल २१० चेंडूत १२५ धावा करून बाद झाला, ज्यामध्ये १५ चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता.

                 जुरेल हा कसोटी शतक झळकविणारा बारावा भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. मनोरंजक म्हणजे, यापैकी पाच खेळाडूंनी वेस्ट इंडिजविरुद्ध पहिले कसोटी शतक झळकावले. जुरेलच्या आधी विजय मांजरेकर, फारुख इंजिनियर, अजय रात्रा आणि वृद्धिमान साहा यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले. या वर्षी, भारतीय यष्टीरक्षक-फलंदाजाने तीन शतके ठोकली आहेत, जी एका कॅलेंडर वर्षातली त्यांची सर्वाधिक शतके आहेत. पंतने या वर्षी भारतासाठी दोन कसोटी शतके झळकविली आहेत आणि जुरेलने एक शतक ठोकले आहे. ही जुरेलची सर्वोच्च कसोटी धावसंख्या आहे. कसोटीतील त्याची मागील सर्वोत्तम खेळी इंग्लंडविरूध्द ९० धावांची होती. जुरेल आणि जडेजा यांनी पाचव्या विकेटसाठी २०६ धावांची भागीदारी करून वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना त्रास दिला आहे.

               ध्रुवने सन २०२२ मध्ये विदर्भाविरुद्ध उत्तर प्रदेशकडून रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले. आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात राजस्थान रॉयल्स (आरआर) ने त्याला २० लाख रुपयांना विकत घेतले. तथापि, त्याला आयपीएल २०२३ मध्ये पहिला ब्रेक मिळाला. ध्रुवने ५ एप्रिल २०२३ रोजी गुवाहाटी येथे पंजाब किंग्जविरुद्ध इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्याच्या पहिल्याच सामन्यात, त्याने १५ चेंडूत ३२ धावांची धमाकेदार खेळी खेळली आणि तो प्रसिद्धीच्या झोतात आला. ध्रुव धोनीप्रमाणे भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची आकांक्षा बाळगतो. तो संयम आणि हुशारीने यष्टीरक्षक फलंदाजांना अडचणीत आणण्यात माहिर आहे. तो एबी डिव्हिलियर्सला आपला फलंदाजीचा आदर्श देखील मानतो. फिटनेसच्या बाबतीत जुरेल विराट कोहलीचे कौतुक करतो.

              वेस्ट इंडिजची पहिल्या डावातील फलंदाजी व त्यांचा सध्याचा फॉर्म बघता सद्यस्थितीत असलेली २८६ धावांची आघाडी सुध्दा फेडणे त्यांना अवघड आहे. भारतातील पावसाळी वातावरण व मागच्या विंडीज दौऱ्यात पावसामुळे हुकलेला विजय लक्षात घेता शनिवारी भारत सकाळी आपला डाव पुढे नेणार नाही असे दिसते. तसे झाले तर शनिवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशीच निकाल भारताच्या झोळीत पडून १२ गुणांची वाढ होऊ शकते. त्यामुळे भारत डब्ल्यूटीसी फायनलच्या दृष्टीने आणखी एक आश्वासक पाऊल टाकेल.

@डॉ.दत्ता विघावे                    
    क्रिकेट समिक्षक 
    मो. क्रं - ९०९६३७२०८२.
close