मागील तीन रविवारी भारताच्या पुरुष संघाने पाकिस्तानी पुरुष संघाचा पराभव कर टी२० आशिया चषक स्पर्धा जिंकली. त्यानंतर महिलांची एकदिवसीय सामन्यांची विश्वचषक स्पर्धा भारत व श्रीलंकेद्वारे संयुक्तरित्या आयोजित केली आहे. वास्तविक भारत व श्रीलंकेचे सामने त्यांच्या त्यांच्या देशात होणार आहे. मात्र भारत व पाकिस्तान यांच्यात आयसीसी सोबत झालेल्या करारानुसार दोन्ही संघांचे सामने हायब्रीड पद्धतीने तटस्थ देशात खेळण्याचे ठरल्यामुळे सदर सामना खेळण्यासाठी कोलंबोला गेला.
या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ८८ धावांनी पराभव करून महिला विश्वचषकात आपले विजयाभियान सुरू ठेवले आहे. यापूर्वी, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाने श्रीलंकेचा पराभव केला होता. रविवारी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत २४७ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान ४३ षटकांत १५९ धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून क्रांती गौड आणि दीप्ती शर्माने प्रत्येकी तीन बळी घेतले, तर स्नेह राणाने दोन बळी घेतले. या विजयासह, भारताने पाकिस्तानविरुद्ध महिला एकदिवसीय सामन्यांमध्ये आपला विक्रम १२-० असा सुधारला आणि भारतीय संघाने आता पाकिस्तानविरुद्ध १२ सामने जिंकले आहेत. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. सलामीवीर मुनीबा अलीचे (२) धावबाद होणे हा सामन्यातील पहिला मोठा टर्निंग पॉइंट ठरला. क्रांती गौडच्या गोलंदाजीवर पायचित झाल्यानंतर ती क्रिझबाहेर पडली, परंतु दीप्ती शर्माने तिला थेट सूर मारून धावबाद केले. त्यानंतर क्रांती गौड (३/२०) ने दोन हादरे देऊन पाकिस्तानला अडचणीत आणले. तिने प्रथम सदाफ शमास (६) ला झेलबाद केले आणि नंतर आलिया रियाज (२) ला बाद केले. त्यावेळी पाकिस्तानची धावसंख्या ३ बाद २६ इतकी होती. त्यानंतर सिद्रा अमीन (८१) ने एका टोक लावून धरले आणि नतालिया परवेझ (३३) सोबत ६९ धावांची भागीदारी करून संघाला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न केला. पण ही भागीदारी तुटताच भारतीय फिरकीपटूंनी सामन्यावर पूर्ण नियंत्रण मिळवले. दीप्ती शर्मा आणि स्नेह राणा यांनी मिळून मधल्या फळीला उद्ध्वस्त केले. सिद्रा अमीनने संयमाने १०६ चेंडूत ८१ धावा केल्या, परंतु तिच्या बाद झाल्याने पाकिस्तानची शेवटची आशा संपुष्टात आली. अखेर, संपूर्ण संघ ४३ व्या षटकात १५९ धावांवर सर्वबाद झाला आणि भारताने सामना ८८ धावांनी जिंकला. भारताकडून क्रांती गौड (३ विकेट) आणि दीप्ती शर्मा (३ विकेट) सर्वात यशस्वी गोलंदाज ठरल्या, तर स्नेह राणाने दोन विकेट घेतल्या.
भारताच्या डावात सलामीवीर प्रतीका रावल (३१) हिने जलद सुरुवात केली आणि डायना बेगच्या एका षटकात सलग तीन चौकार मारले. तथापि, स्टार फलंदाज स्मृती मंधाना (२३) पुन्हा पॉवरप्लेमध्ये बाद झाली. एकदा पायचितच्या अपीलवर वाचल्यानंतर, ती कर्णधार फातिमा सना हिच्याकडून पायचितच झाली. त्यानंतर कट शॉट ऑफ-स्टंप बेल्सवरून बाहेर पडल्याने रावलही लगेचच बाद झाली. त्यानंतर हरलीन देओल (४६) ने डाव सावरला. तिने प्रथम हरमनप्रीत कौर (१९) सोबत ३९ धावांची भागीदारी केली आणि नंतर जेमिमा रॉड्रिग्ज (३२) सोबत ४५ धावांची भागीदारी केली. हरमनप्रीतच्या बॅटच्या आतील बाजूला चेंडू चाटून यष्टीमागे झेलबाद झाली, तर देओल संयमाने खेळत धावा जोडल्या, परंतु अर्धशतक गाठण्यापूर्वी मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न करताना तिचा बळी गेला. जेमिमाला नो-बॉलवर जीवदान मिळाले, परंतु ती देखील ३२ धावांवर बाद झाली. त्यानंतर दीप्ती शर्मा (२५) आणि स्नेह राणा (२०) यांनी ४२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली, ज्यामुळे धावसंख्या समाधानकारक झाली. जेव्हा पाकिस्तानच्या गोलंदाजांनी शेवटच्या षटकांमध्ये जलदगतीने बळी घेत पुनरागमन केले, तेव्हा रिचा घोष (२० चेंडूत ३५ धावा) हिने धमाकेदार खेळी केली. तिने तीन चौकार आणि दोन षटकार मारले, ज्यात एक शानदार स्वीप शॉटचा समावेश होता. पाकिस्तानकडून डायना बेगने चार बळी घेतले, तर सादिया इक्बाल आणि कर्णधार फातिमा सना यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. रमीन शमीम आणि नाशरा संधू यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. भारताच्या सर्वच बॅटर्सना चांगली सुरूवात मिळूनही मोठी खेळी करता आली नाही. पाकिस्तानविरूध्द भारतीय महिला प्रथमच वनडे सामन्यात सर्वबाद झाल्या.
सामन्याच्या सुरुवातीलाच नाणेफेकी वेळी मॅच रेफ्री शांद्रे फ्रिट्झची चूक केली. या चुकीमुळे पाकिस्तानची कर्णधार फातिमा साना हिला टॉसचा विजेता घोषित करण्यात आले. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणे हवेत उडवले आणि सनाने "टेल्स" म्हटले, परंतु फ्रिट्झने ते चुकीचे ऐकले. त्यानंतर सुत्रसंचलक मेल जोन्सने तिला टॉसचा विजेता घोषित केले. नाणे (हेड)डोके वर पडले, परंतु पाकिस्तानला टॉसचा विजेता मानले गेले आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हरमनप्रीतने प्रतिसाद दिला नाही आणि पाकिस्तानी कर्णधाराशी न बोलता बोलण्यासाठी जोन्सकडे गेली. तिने सनाशी हस्तांदोलन केले नाही.
गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही देशांमधील संबंध तणावपूर्ण आहेत आणि याचा परिणाम मैदानावरही दिसून येत आहे. अलिकडेच, पुरुषांच्या आशिया चषक स्पर्धे दरम्यान, भारत आणि पाकिस्तान तीन वेळा आमनेसामने आले आणि तिन्ही सामने वादग्रस्त ठरले. भारतीय महिला संघाने, पुरुष संघाप्रमाणेच हस्तांदोलन न करण्याचे धोरण अवलंबले आणि सामन्यादरम्यान पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही. हरमनप्रीत आणि फातिमा टॉससाठी मैदानावर आल्या तेव्हा त्यांच्यात कोणताही संवाद झाला नाही. हरमनप्रीतने फातिमाकडे दुर्लक्ष केले.
आधीच बिघडलेल्या भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट संबंध आणखी ताणले, जेव्हा पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) प्रमुख मोहसीन नक्वी यांनी दुबईमध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला विजयी ट्रॉफी देण्यास नकार दिला. आशिया चषकानंतर असे मानले जात होते की महिला संघही पाकिस्तानविरुद्ध शेकहँड न करण्याचे धोरण सुरू ठेवेल आणि नेमके तेच घडले.
कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवरील हा सामना सुमारे १५ मिनिटे थांबवण्यात आला होता. मैदानावर मोठ्या प्रमाणात किडे वावरत होते, त्यामुळे खेळाडूंना अडचणी येत होत्या. यामुळे सामन्यात दोनदा व्यत्यय आला. स्टेडियम कर्मचाऱ्यांनी किटकनाशकाची फवारणीही केली. त्यानंतर सामना पुन्हा सुरू झाला. परंतु, षटकांमध्ये कोणतीही कपात करण्यात आली नाही. फवारणीमुळे दोन्ही संघांच्या सदस्यांना मैदान सोडण्यास सांगण्यात आले होते.
भारताने हा सामना जिंकून गुणतालिकेत भली आघाडी घेतली असली तरी भारतीय संघाची कामगिरी खासकरून क्षेत्ररक्षणात अतिशय खराब होत आहे. शिवाय स्मृती व हरमन या मुख्य फलंदाज आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत नाहीत. तसेच इतर फलंदाजही चांगल्या सुरुवातीनंतर मोठ्या खेळी खेळत नाही. भारताचे पुढील सामने बलाढ्य इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका यांच्याबरोबर असल्याने खेळाच्या कोणत्याही विभागात हलगर्जीपणा चालणार नाही. त्यासाठी आपल्या खेळात सुधारणा करणे हाच एकमेव पर्याय महिला संघाकडे आहे. सुधारणा केल्यासच भारताला मायदेशात घरच्या प्रेक्षकांसमोर प्रथम विश्वविजेता बनता येईल.
@डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
मो. क्रं - ९०९६३७२०८२.

