shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

परदेशी जन्म, इंग्लिश जर्सी : क्रिकेटमधील खरी जागतिक एकात्मता


                  मुळातच क्रिकेट हा जन्माने इंग्लिश खेळ आहे. बाराव्या शतकात इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळायला सुरुवात झाल्याच्या इतिहासात नोंद आहे. इंग्लंडनेच ऑस्ट्रेलियासह १८७७ मध्ये पहिला कसोटी सामना खेळला. पहिला एकदिवसीय सामना १९७१ मध्ये खेळण्याचा योग या दोन संघांनीच साधला. एकेकाळी इंग्लिश साम्राज्याचा ध्वज जगातल्या अनेक देशात फडकत होता. त्याच अनुषंगाने क्रिकेटचा जगभर प्रवास, प्रसार व प्रचार झाला. पण तोच खेळ आज  संपूर्ण जगाचा झाला आहे. मनोरंजन, राष्ट्रभावना, आणि कौशल्याचा संगम असलेला हा खेळ इंग्लंडच्या पलीकडे पसरला आणि एकप्रकारे "जागतिक परिभाषा" बनला. परंतु या खेळाचा सर्वात आश्चर्यकारक भाग म्हणजे — स्वतः इंग्लंड संघासाठी खेळणाऱ्या परदेशी-जन्म झालेल्या किंवा मुळ परदेशी असलेल्या खेळाडूंची संख्या संख्या मोठी आहे. इंग्लंड आर्थिक, राजकीय, वैज्ञानिक व सामाजिक दृष्टया प्रगत असला तरी त्यांची लोकसंख्या आगमितीलाही केवळ सहा कोटींच्या आसपास आहे. त्यामुळे त्यांना जागतिक दर्जाचे त्यांचे स्वतःचे खेळाडू सातत्याने मिळणे कठिण असल्याने इतर देशातल्या गुणवान खेळाडूंना आपल्या कळपात सामावून घेण्याशिवाय पर्याय नाही. तसेच बाहेरच्या देशातील खेळाडूंना त्यांच्या स्वदेशातील संधी त्रोटक असल्याने इतर देशात जाऊन खेळणे व स्वतःची कारकिर्द घडविणे हा देखील मोठा प्रश्न असतो, तो या माध्यमातून निकालात निघतो.                          
                 अशा प्रकारे इंग्लंडलाही अनेक महान खेळाडूलाभले आहेत व अनेक परदेशी खेळाडूंच्या कारकिर्दीला आकार व आधार मिळाला. आजपर्यंत इंग्लंडकडून ११४ परदेशी-जन्म क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे. हा आकडा केवळ सांख्यिक नाही, तर तो इंग्लंडच्या सामाजिक, राजकीय, वसाहतकालीन आणि सांस्कृतिक इतिहासाचे प्रतिबिंब आहे.
                इंग्लंडकडून खेळलेले खेळाडू केवळ ब्रिटिश द्वीपकल्पात जन्मलेले नाहीत, तर ते आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया, युरोप, आणि कॅरिबियन बेटांपर्यंत पसरलेले आहेत.
एकूण ७७३ खेळाडूंनी इंग्लंडसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व केले असून त्यापैकी ७१२ खेळाडूंनी टेस्टमध्ये, २८० खेळाडूंनी वनडेमध्ये, आणि १२९ खेळाडूंनी टी२० मध्ये सहभाग घेतला आहे. त्यापैकी ११४ खेळाडू परदेशी भूमीत जन्मलेले आहेत. वरील ७७३ पैकी ७१२ खेळाडू कसोटी, २८० खेळाडू वनडे व १२९ टी २० मध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व करु शकले हि आकडेवारी लक्षात घ्यावी.

                सर्वाधिक परदेशी-जन्म असलेले इंग्लिश क्रिकेटपटू दक्षिण आफ्रिका येथे जन्मलेले आहेत. या यादीत बॅसिल डी’ऑलिव्हिएरा, टोनी ग्रेग, अ‍ॅलन लॅम्ब, अँड्र्यू स्ट्रॉस, केविन पीटरसन, जोनाथन ट्रॉट, जेसन रॉय, किटन जेनिंग्ज, टॉम करन, ब्रायडन कार्से अशी मोठी नावे आहेत. हे खेळाडू दक्षिण आफ्रिकेतील खेळसंस्कृती व इंग्लंडच्या व्यावसायिक संधी यांच्या संगमातून उदयास आले.

दक्षिण आफ्रिकेत जन्मलेले इंग्लिश खेळाडू:
बॅसिल डी'ऑलिव्हिएरा, टोनी ग्रेग, इयान ग्रेग, अ‍ॅलन लॅम्ब, ख्रिस स्मिथ, रॉबिन स्मिथ, अँड्र्यू स्ट्रॉस, केविन पीटरसन, मॅट प्रायर, जोनाथन ट्रॉट, क्रेग किस्वेटर, जेड डर्नबाच, स्टुअर्ट मीकर, निक कॉम्प्टन, मायकेल लंब, जेसन रॉय, कीटन जेनिंग्ज, ब्रायडन कार्से, जॉन टर्नर.

                 ब्रिटिश वसाहतकालीन काळात भारतात जन्मलेल्या इंग्लिश क्रिकेटपटूंची परंपरा समृद्ध आहे. रणजितसिंहजी व दुलीपसिंहजी यांनी भारतीय मातीवर जन्म घेऊन इंग्लिश क्रिकेटला राजेशाही स्पर्श दिला. त्यांच्यापाठोपाठ पतौडीचे नवाब, कॉलिन काउड्रे, नासेर हुसेन, विक्रम सोलंकी, मिन पटेल यांनी त्या वारशाला नवा अर्थ दिला.
भारत भूमीत जन्म घेतलेले इंग्लिश खेळाडू पुढीलप्रमाणे : - के.एस. रणजितसिंहजी, टेडी वायनयार्ड, रिचर्ड यंग, नेव्हिल टफनेल, डग्लस जार्डिन, दुलीपसिंहजी, पतौडीचे नवाब (इफ्तिखार अली खान), एरोल होम्स, नॉर्मन मिशेल-इन्स, जॉर्ज एमेट, कॉलिन काउड्रे, जॉन जेम्सन, बॉब वुल्मर, रॉबिन जॅकमन, नासेर हुसेन, विक्रम सोलंकी, मिन पटेल.

वेल्स आणि स्कॉटलंड इंग्लंडचा अविभाज्य भाग असला तरी क्रिकेटमध्ये स्वतंत्र ओळख टिकवून ठेवली आहे.
वेल्समधून आलेले फिल साल्ट, सायमन जोन्स, पॅट पोकॉक तर स्कॉटलंडमधून आलेले गेव्हिन हॅमिल्टन, डौगी ब्राउन यांनी इंग्लंडच्या यशात वाटा उचलला.

वेल्समध्ये जन्म झालेले खेळाडू असे आहेत : -
जॉनी क्ले, रॉबर्ट क्रॉफ्ट, जेफ जोन्स, टोनी लुईस, ऑस्टिन मॅथ्यूज, ह्यू मॉरिस, गिल्बर्ट पार्कहाऊस, पॅट पोकॉक, ग्रेग थॉमस, मॉरिस टर्नबुल, सिरिल वॉल्टर्स, स्टीव्ह वॉटकिन, अ‍ॅलन वॉटकिन्स, सायमन जोन्स, अ‍ॅलन जोन्स, फिल साल्ट.

स्कॉटलंडमध्ये जन्म असलेले खेळाडू : -
माइक डेनेस, गेव्हिन हॅमिल्टन, अ‍ॅलेक केनेडी, डेव्हिड लार्टर, ग्रेगर मॅकग्रेगर, इयान पीबल्स, एरिक रसेल, डौगी ब्राउन, पीटर सच.

आयर्लंडमध्ये जन्म झालेले  खेळाडू:
लेलँड होन, सर टिम ओ'ब्रायन, फ्रेडरिक फेन, एड जॉइस, इऑन मॉर्गन.

 झिंबाब्वेमध्ये जन्म घेतलेले खेळाडू : - 

 सॅम करन, टॉम करन, ग्रॅहम हिक, पॉल पार्कर, गॅरी बॅलेन्स, 

इंग्लंड व ऑस्ट्रेलिया या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्येही खेळाडूंची देवाणघेवाण झाली आहे. बिली मर्डोक, जॉन फेरिस, अ‍ॅडम व बेन हॉलिओके बंधू, सॅम रॉबसन, टिम अ‍ॅम्ब्रोस हे ऑस्ट्रेलियात जन्मलेले इंग्लिश खेळाडू आहेत. तर
न्यूझीलंडमध्ये जन्मलेला बेन स्टोक्स आज इंग्लंडचा चेहरा बनला आहे.

ऑस्ट्रेलियात जन्मलेले खेळाडू पुढीलप्रमाणे : -
बिली मर्डोक, जॉन फेरिस, सॅमी वुड्स, अल्बर्ट ट्रॉट, गब्बी अ‍ॅलन, अ‍ॅडम हॉलिओके, बेन हॉलिओके, जेसन गॅलियन, टिम अ‍ॅम्ब्रोस, सॅम रॉबसन.

न्यूझीलंड-जन्म झालेले खेळाडू असे आहेत  : -        अँडी कॅडिक, बेन स्टोक्स.

                  ब्रिटिश साम्राज्याचा विस्तार जितका व्यापक, तितकी क्रिकेटची मुळे खोल गेली.
बार्बाडोस, जमैका, त्रिनिदाद, गयाना, झांबिया, झिम्बाब्वे, हाँगकाँग, डेन्मार्क, केनिया, डोमिनिका, पेरू, पापुआ न्यू गिनी, सेंट किट्स आणि नेव्हिस या देशांतील खेळाडूंनी इंग्लिश संघाला जागतिक बनवले.

कॅरिबियन / आफ्रिकन / इतर देश-जन्म खेळाडू:-
रोलँड बुचर, ग्लॅडस्टोन स्मॉल, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, जेकब बेथेल (बार्बाडोस),
ग्रीम हिक, पॉल पार्कर, गॅरी बॅलेन्स, सॅम करन, टॉम करन (झिम्बाब्वे),
डोनाल्ड कार, पॉल टेरी (जर्मनी),
ख्रिस लुईस, मोंटे लिंच (गयाना),
नॉर्मन कोवन्स, डेव्हॉन माल्कम (जमैका),
डेरेक प्रिंगल, जेमी डॅलरिम्पल (केनिया),
अमजद खान (डेन्मार्क),
फिलिप डिफ्रेटस (डोमिनिका),
गेरेन्ट जोन्स (पापुआ न्यू गिनी),
फ्रेडी ब्राउन (पेरू),
जोई बेंजामिन (सेंट किट्स),
विल्फ स्लॅक, नील विल्यम्स (सेंट व्हिन्सेंट),
फिल एडमंड्स, नील रॅडफोर्ड (झांबिया),
डरमोट रीव्ह, सॅम हेन (हाँगकाँग),
टेड डेक्सटर (इटली),
लॉर्ड हॅरिस, पेल्हम वॉर्नर (त्रिनिदाद).

               इंग्लंडचा क्रिकेट संघ म्हणजे आजच्या काळातील बहुराष्ट्रीय प्रतिभेचे प्रतीक आहे. एकाच जर्सीत विविध देशांच्या मातीत वाढलेले खेळाडू, एकाच राष्ट्रगीताखाली मैदानात उतरताना दिसतात. ही परंपरा केवळ इंग्लंडसाठीच नाही, तर संपूर्ण क्रिकेटविश्वासाठी प्रेरणादायक आहे. ११४ परदेशी जन्म घेतलेल्या खेळाडूंनी इंग्लंडसाठी खेळले हे फक्त सांख्यिक नव्हे, तर सांस्कृतिक एकतेचे प्रतीक आहे.
जागतिकीकरणाच्या या युगात इंग्लंड क्रिकेट हे खरेच सांगते- "जन्मभूमी वेगळी असली, तरी क्रिकेट ही सर्वांची समान मातृभूमी व कर्मभूमी आहे."

@ लेखक : डॉ. दत्ता विघावे

क्रिकेट समिक्षक

मोबाईल -९०९६३०२०८२.
close