shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अंबरनाथ नगरपरिषद निवडणूक: विकासाचा अजेंडा आणि लोकांच्या अपेक्षा.. सीए देवेंद्र जैन, अंबरनाथ यांचे मनोगत !!


जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

सुमारे १०.५ वर्षांनंतर होऊ घातलेल्या अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजले असून, सर्व दिग्गज उमेदवार आता मैदानात उतरले आहेत. सार्वजनिक प्रतिमेच्या या काळात, मागील १० वर्षांत ज्यांना ज्यांना राजकीय कारकीर्द करायची होती, ते सर्वजण नेहमीच प्रकाशझोतात राहिले. कोणत्याही लहान-मोठ्या कार्यक्रमातील त्यांचे फोटो समाजमाध्यमांवर (सोशल मीडियावर) सतत झळकत असत. त्यामुळे, निवडणुकीत कोण उभे राहणार, हे कोणालाही वेगळे सांगण्याची गरजच नव्हती.

मैत्रीपूर्ण वातावरणात ही निवडणूक होत आहे; कारण पक्ष आणि त्यांच्यातील फाटाफूटीला महत्त्व नसलेल्या या काळात वैयक्तिक ब्रँड महत्त्वाचा ठरत आहे. रात्री एकत्र असलेले मोहरे सकाळी दुसरीकडे वळलेले दिसतात. प्रत्येक उमेदवाराच्या गळ्यात लाल, भगवे, हिरवे किंवा निळे उपरणे आहे आणि ते हात जोडून प्रत्येकाला भेटत आहेत. कार्य अहवाल सादर करत उमेदवार आणि त्यांची टीम गल्लीबोळात फिरताना दिसत आहेत. प्रत्येक जण केवळ विकासाच्या मुद्द्यावर मत मागत आहे.

यावेळी ज्याप्रमाणे घराणेशाहीतील उमेदवार उभे आहेत, त्याचप्रमाणे उच्चशिक्षित उमेदवारसुद्धा #निवडणुकीच्या रिंगणात आहेत. प्रचार कोणाविरुद्ध नसून, केवळ शहराचा विकास या एकाच उद्दिष्टाने भारलेला आहे. मतदारांना वॉर्डात नगरसेवक तसेच थेट बटण दाबून नगराध्यक्षांची निवड करायची आहे.

आपल्यासारख्या विकसनशील शहराला (खेडे ही ओळख आता मागे पडली आहे) नेमके काय हवे आहे आणि येणाऱ्या काळात एक नागरिक म्हणून जगण्यासाठी लागणाऱ्या किमान सुविधा आपल्याला मिळाव्यात, ही आपली अपेक्षा आहे.

अंबरनाथ शहराच्या विकासासाठी आवश्यक अपेक्षा ..

येथे ९ महत्त्वाच्या अपेक्षा आणि गरजांचा उल्लेख केला आहे, ज्यावर निवडून आलेल्या प्रतिनिधींनी लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे:

१.  प्रकाशाचे प्रदूषण नियंत्रण: रात्री आकाशात बघितल्यावर चंद्र आणि तारका स्पष्टपणे दिसण्यासाठी, शहरातील प्रकाशाचे अनावश्यक प्रदूषण कसे कमी होईल, यावर विचार करणे गरजेचे आहे.

२.  हवेचा सुधारित दर्जा: शहरात (दर्जेदार!) रस्त्यांची (तात्पुरत्या स्वरूपाची), गटारांची, इमारती बांधकामाची इत्यादी विविध कामे सुरू असल्याने हवेचा दर्जा खालावला आहे. नागरिकांसाठी हवामान गुणवत्ता चांगली असणे ही प्राथमिक गरज आहे. वायू गळती थांबली पाहिजे. 

३.  प्रकल्पांची गुणवत्ता आणि टिकाऊपणा: शहरात निर्माण होणाऱ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या (Infra Projects) किमती, त्यांचा खर्च आणि त्या प्रकल्पांचा किती वर्षे उपयोग होईल, याचा विचार ब्रिटिश काळात जसा होत होता, तसा आता व्हायला हवा. हल्ली ५-६ वर्षांतच सामाजिक प्रकल्पांची खिल्ली उडते, हे थांबले पाहिजे.

४.  कचरा व्यवस्थापन: वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या समस्येवर प्रभावी आणि कायमस्वरूपी तोडगा काढणे आवश्यक आहे.

५.  उत्कृष्ट आणि जबाबदार कामे:  बरेच उमेदवार हे नगरपरिषदेची कामे घेणारे अथवा त्यांच्या नातेवाईकांमार्फत कामे करणारे असल्याने, त्यांची उत्तरदायित्वता (Accountability) अधिक वाढते. त्यांनी हातात घेतलेले काम चांगले, टिकाऊ आणि दर्जेदार होण्याचा ध्यास घेतला पाहिजे.

६.  रस्त्यांचे बांधकाम आणि जलनिस्सारण: शहरात बांधण्यात येणारे सिमेंट-काँक्रिटचे रस्ते चांगले आहेत; परंतु त्यामुळे घरांची उंची कमी होऊन पावसाळ्यात नाल्यांचे पाणी घरात शिरते. प्रत्येकाला घराची उंची वाढवणे शक्य नसते. त्यामुळे, रस्ता बांधताना पाण्याचा निचरा योग्य होईल, याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. वालधुनी नदी चे स्त्रोत्र, प्रवाह पूर्वी प्रमाने साफ आणि स्वच्छ असला पाहिजे.

७.  पाणी उपलब्धता: अंबरनाथ शहराला नैसर्गिकरीत्या पुरेसे पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे, अनावश्यक पाणीकपात न करता, नागरिकांना मुबलक पाणी उपलब्ध व्हावे.

८.  सामाजिक सुविधा: चांगली मैदाने, कल्याण केंद्रे (Welfare Centers), सरकारी रुग्णालय, चांगल्या दर्जाच्या शैक्षणिक संस्था पुरवणे, ही सर्व नगरपरिषद सदस्यांची जबाबदारी आहे. निवडून आलेल्या या ६० प्रतिनिधींनी अंबरनाथमधील ३ लाख लोकांसाठी न टाळता, दिवसाचे २४ तास मनुष्य कल्याणासाठी ही कामे करावीत.

९.  करांचा परतावा (Return on Investment): ट्रॅफिक, प्रदूषण, पर्यावरण याकरिता सुद्धा नागरिक महापालिका कर (Municipal Taxes) भरत असतात. या विषयांवर महापालिकेने दर्जेदार कामे करणे, म्हणजेच नागरिकांना त्यांच्या कराचा परतावा (Return on Investment) देणे होय.

भ्रष्टाचार मुक्त कारभार हे एक आदर्श उद्दिष्ट आहे; परंतु त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे, शहराचा खऱ्या अर्थाने समतोल साधत विकास व्हावा आणि दर्जेदार कामे व्हावीत. निवडणुकीत उभे असलेले सगळेच उमेदवार जाणकार आहेत. तेव्हा, '*सुज्ञास सांगणे न लगे*!'
close