पळासदळ (ता. एरंडोल) येथील शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीत दि. २० नोव्हेंबर २०२५ रोजी राज्यस्तरीय फार्मसी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले. राज्यभरातील विविध महाविद्यालयांतून आलेल्या स्पर्धक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्पर्धेला विशेष रंगत आणली. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
स्पर्धेच्या फेऱ्यांमध्ये फार्मास्युटिकल सायन्स, क्लिनिकल नॉलेज, जनरल सायन्स व लॉजिकल स्किल्स या विषयांवरील प्रश्नांचा समावेश होता. प्रत्येक फेरी ज्ञानवर्धक, चुरशीची व रोमहर्षक ठरली. परीक्षकांनी निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने परिक्षणाची जबाबदारी निभावत अंतिम फेरीत पोहोचलेल्या संघांच्या कामगिरीला विशेष दाद दिली.
डी. फार्मसी गटात गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक, जळगाव (फार्मसी विभाग) येथील अक्षत लोहार व मयुरेश बाजारे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर द्वितीय क्रमांक एसएसबीटी, बांभोरीचे भावेश सूर्यवंशी आणि शास्त्री इन्स्टिट्यूटचे नर्गिस शाह (संयुक्त) यांनी मिळवला. बी. फार्मसी गटात श्री गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ फार्मसी, जळगावचे रिषभ सोनावणे व ओम वानखेडे यांनी प्रथम क्रमांक मिळवला तर शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या नाझनीन सय्यद व तेजस्विनी पाटील यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.
विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्रे प्रदान करण्याचा मान प्राचार्य डॉ. विजय शास्त्री व डॉ. पराग कुलकर्णी यांना लाभला. कार्यक्रमाच्या यशामागील शिक्षकवर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी स्वयंसेवकांचे योगदान उल्लेखनीय राहिले. संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रा. अनुप कुलकर्णी यांनी केले, तर प्रा. दिग्विजय पाटील, प्रा. सुमेश पाटील, प्रा. श्रद्धा शिवदे, प्रा. कीर्ती पाटील यांच्यासह सर्व शिक्षकवृंद व कर्मचाऱ्यांनी मनापासून सहभाग नोंदवत स्पर्धा यशस्वी केली.


