shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोथुळ राजधानीचा खंडोबा देवस्थान येतेय नावारूपाला ; चंपाषष्ठीला मोठा यात्रा उत्सव होणार संपन्न...


निसर्गाच्या कुशीत एक पवित्र देवस्थान ; इतिहासाचा सुंदर संगम राजधानीचा खंडोबा मंदिर..


वाळकी प्रतिनिधी (दादासाहेब आगळे) : अहिल्यानगर ज्ञानगंगेचे उगमस्थान,सतांची पावनभूमी म्हणून अहिल्यानगर या जिल्ह्याची ख्याती आहे या जिल्ह्यात अनेक देव देवतानी वास्तव्य करून आपली स्थाने प्रकट केली आहेत असेच श्रीगोंदा तालुक्यातील कोथुळ व गुंडेगाव सरहद्दीवर "राजधानीचा खंडोचा"हे देवस्थान असेच सध्या पर्यटन म्हणून प्रकाशझोतात आले असून हे पवित्र स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.
     जसे पुणे जिल्ह्यातील जेजुरी हे खंडोबाचे पवित्र स्थान सर्वांनाच ज्ञात आहे.तसेच सुमारे आठशे वर्षापूर्वी श्रीगोंदे-नगर तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या कोथुळ व धावडेवाडी शिवारातील संतोषाचा डोगर या ठिकाणी खंडोबाने आपले वास्तव्य केले असल्याचे सांगितले जात आहे.खंडोबाच्या पदस्पर्शाने पुनित झालेली ही भूमि कोथुळ,धावडेवाडी, गुंडेगाव, कोळगाव, विसापूर, भानगाव, ढोरजा आदि भागांतील भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे.मनमोहक निसर्ग सौंदर्य निसर्गाची हिरवीगार वनराई,उंच डोंगर टेकड्या, विविधरंगी फुले आणि प्राणी यांच्यामुळे मंदिर परिसराला सौंदर्य लाभले आहे.हे सौंदर्य भाविकांना ताजेपणा,शांतता आणि आनंद देत असून.पक्ष्यांचा किलबिलाट,वाऱ्याची झुळूक आणि सूर्यास्ताचा देखावा यांसारख्या अनुभव येथे पहावयास मिळत आहे.झाडे,फुले आणि विविध प्रकारच्या वनस्पतीमुळे येथे रंगत आली आहे येथील प्रवासात निसर्गाच्या अनेक रूपासह व सौंदर्य मन मोहून टाकणारे आहे.
           राजधानी खंडोबा येथे येत्या २६ नोव्हेंबर वार बुधवार चंपाषष्ठीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात यात्रा भरते यासाठी राज्य व परराज्यातील लाखो भाविक खंडोबा दर्शनासाठी येत असतात, भक्तांना सुलभ दर्शन व्हावे,यादृष्टीने चोख व्यवस्था केली जात असल्याची माहिती ट्रस्टचे संतोष लाटे यांनी दिली.गुंडेगाव,कोथुळ पंचटेकडी पवर्तरांगेतील डोंगराच्या खुशीत राजधानी खंडोबा विराजमान झाले आहे.कोथुळ ग्रामस्थ यांच्या पुढाकाराने या मंदिराचा भव्य दिव्य जीर्णोद्धार होऊन मंदिर नावारूपाला आले आहे.मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता झाल्यामुळे भाविकांना प्रवासासाठी अतिशय सोयीस्कर झाला आहे.दरम्यान अतिशय छोट्या स्वरुपात असलेले खंडोबाचे मंदिर गेल्या १५ वर्षांत झालेल्या विकासकामांमुळे प्रकाशझोतात आले आहे.यात्रा काळात मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री बापूराव भोसले,संतोष लाटे, राजेंद्र लाटे, सुदामजी भोसले, मच्छिंद्र लाटे, संजय लाटे, यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.पहाटे व रात्री अशा दोन वेळेस महाआरती होते. गावातून छबिना मिरवणूक,मंदिरात जागरण गोंधळ उत्सव केला जातो.येथे भक्त खंडोबाची पुजा करतात आणि विविध विधी पार पाडतात. या यात्रेत 'सदानंदाचा येळकोट' आणि 'चांगभल' या घोषणा दिल्या जातात.खंडोबा महाराष्ट्राचे कुलदैवत असल्याने अनेक भाविक या ठिकाणी आपले नवस फेडण्यासाठी ही येत असतात.यात्रेमध्ये देवाच्या काठीचा मान हा घोंडगेवाडी,कोळगाव येथील लोकांना असून दिवटीचा मान हंगेवाडीकरांना आहे.
             जिल्ह्यासह अनेक गावांचे हे दैवत आहे सर्व गावातील लोकांनी एकत्र येऊन मंदिराचा जिर्णोद्धार केला आहे.दर्शनासाठी अनेक भक्त येत असतात येथील परिसरात व विकास पाहून देणगी स्वरूपात भरपूर मदत करत आहेत.या ठिकाणी भाविकांना मिळणारी सेवा-सुविधा भाविकांचे उन,वारा व पाऊस यापासून संरक्षण व्हावे यासाठी सभामंडप करण्यात आला आहे. तसेच पिण्याच्या पाण्याचीही सुविधा केली आहे.तसेच गेली बारा ते तेरा वर्षापासून येथे दर रविवारी अन्नदान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.भविष्यात लवकरच पर्यटन विकासामध्ये या देवस्थानचा समावेश होणार असून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यातून देवस्थानाला आर्थिक फायदा मिळवण्यासाठी पर्यटन स्थळांचे नियोजन,विकास आणि व्यवस्थापन करणे. यामध्ये वाहतूक, निवास आणि इतर सुविधा सुधारणे, तसेच स्थानिक संस्कृती आणि पर्यावरणाचे जतन करणे यांसारख्या गोष्टींचा समावेश करण्यात येणार आहे. अशी माहिती देवस्थान अध्यक्ष बापूराव भोसले यांनी सांगितले.

*खंडोबा देवस्थान ऐतिहासिक माहिती..*

        राजधानी खंडोबा देवस्थानाचे महत्त्व सांगणारी जुनी मंडळी मात्र या भागात अस्तित्वात नाहीत.ज्यांना कुणाला या स्थानाचे महत्त्व माहीत आहे,ती जुजवी स्वरूपातील असल्याने राजधानीचा खंडोबा या स्थळाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर फारसा प्रकाश पडलेला नाही.डोंगरमाथ्यावर रमणीय झाडीत बसलेले हे मंदिर हेमाडपंथी स्वरूपातील आहे. मंदिराच्या आवारात भव्य स्वरूपातील दोन दीपमाळी आहेत.तसेच परिसरात पूर्वी गवळी लोकांची वसाहत असल्याचे पुरावे म्हणून पूर्वजांच्या समाधी स्वरुपात थडगे आजही येथील वास्तव्याची साक्ष देत आहेत.मदिंर कुरुंदाच्या दगडाने उभारलेले असून त्यावरील नक्षीकाम,मंदिराचा कळस आणि संपूर्ण दगडी स्वरूपातील उभारलेले मंदिराचे कोरीव दगडी खांब हे मंदिराच्या ऐतिहासिक वास्तूची साक्ष देताना दिसतात.जेजुरी हे खंडोबाचे मुख्य स्थान असले तरी काही काळापूर्वी खंडोबा विश्रांतीसाठी संतोषाच्या डोंगरावर आल्याने हो भूमी पावन झाल्याचे काही मडळींकडून सांगितले जाते.
      मंदिराच्या परिसरात जवळच एक सुंदर छोटेखानी हेमाडपंथी मंदिर बांधणी पद्धतीची साक्ष देणारे मंदिर उभारण्याचे काम किमान बाराव्या शतकात झाले असावे.या मंदिराच्या दरवाजावर मागील बाजूस व मंदिराच्या आतील भिंतीवर उठावाची काही शिल्पे कोरण्यात आली आहेत.तिघांचे मिळून एक डोके अशी एक आकृती आहे, मानवी देह पण डोक्याच्या जागी दोन पक्ष्यांच्या माना असे एक शिल्प आहे. एका आकृतीत पक्ष्याचे डोके असलेल्या व्यक्तीला चार हात दाखवण्यात आले आहेत. त्यातील एका हातात मासा, दुसऱ्या हातात शख तिसऱ्या हातात ग्रंथसदृश वस्तु तर चौथ्या हातात सुरई आहे डोक्यावर शिंगे किंवा तुरा आहे. शरभ,हत्ती व सिंहाचे चित्र कोरलेल्या अवस्थेत आहे. या चित्राच्या दोन्ही बाजूस चक्र असून त्याखाली पोपटाच्यामूर्ती,जलपरी,सुर्यबिंबाकडे झेपावणारा बाल हनुमान,यक्ष,किन्नरासारख्या काही आकृत्या,हत्तीची शिल्पे असुन ही शिल्पे नगरचा भूईकोट किल्ला, आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर,रायगड,सिंहगड, देवगिरी या ठिकाणी सुद्धा पहायला मिळतात तसेच येथील दगडी बांधकाम निजामशाही काळातील म्हणजे १६ व्या ते १७ व्या शतकातील असल्याचा उल्लेख आहे.
          गुंडेगाव व कोथूळ जंगलात खंडोबा गड,गडावर गोसावी बाबा समाधी, तपस्वी गुहा व घाटरस्त्यांचे सुरेख दर्शन घडत असताना या परिसरात अनेक प्राचिन अवशेष आढळून येत आहेत. त्यापैकी काहींचा उलगडा झाला आहे. काही वास्तूंबद्दल कुतूहल कायम आहे.यातीलच एक खंडोबा डोंगर रस्त्यावरील पाण्याच्या ऐतिहासिक टाके आहे.हे टाके झाकलेले असून पाणी काढण्यासाठी २ फूट व्यासाचे दगडात लोलक ठेवलेले पाहायला मिळते. दोन दगडी खांब कोरले आहेत. पाण्यात कचरा पडू नये व कमीत कमी पाण्याची वाफ व्हावी, अशी टाक्यांची रचना आहे. हे टाके सातवाहन काळात खोदले गेले आहे. इसवी सन पूर्व दुसऱ्या ते इसवी सनाच्या तिसऱ्या शतकादरम्यान हे खोदकाम झाल्याचा अंदाज आहे. ही दगडी टाकी सैन्यासाठी केली असावी अंदाज दादासाहेब आगळे यांनी व्यक्त केला आहे.

माहिती संकलन - दादासाहेब आगळे, गुंडेगाव.
close