सन २०२५-२६ च्या अॅशेस मालिकेची सुरुवात चांगली झाली आहे. मिचेल स्टार्कची घातक गोलंदाजी आणि धावांचा पाठलाग करताना ट्रॅव्हिस हेडच्या ऐतिहासिक शतकामुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या अॅशेस कसोटीत इंग्लंडला आठ गड्यांनी पराभूत केले. पर्थच्या वेगवान खेळपट्टीवर सामन्याचा निकाल फक्त दोन दिवसांत लागला. गेल्या १०० वर्षात पहिल्यांदाच अॅशेस कसोटी दोन दिवसांत संपली आहे. भारत आणि भारतीय खेळपट्टयांवर अडीच दिवसांत संपणाऱ्या कसोटी सामन्यांवर टीका करणारे ऑस्ट्रेलियन दिग्गज पर्थ कसोटीबद्दल मात्र गप्प गार बसले आहेत.
पहिल्याच दिवशी गोलंदाजांनी जोरदार कामगिरी करत जिवघेण्या खेळपट्टीवर फलंदाजांना सळो की पळो करून सोडले. या सामन्यात कोणाचा जीव गेला नाही एवढं काय ती समाधानाची बाब ठरली. इतकी भयानक खेळपट्टी पर्थवर केवळ जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाने बनवली होती. यावर ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू, प्रसारमाध्यमे, सोशल मिडीयावर कुठेहीं टिका झालेले जाणवले नाही. इतर कोणत्या देशात जेंव्हा असे प्रकार होतात तेंव्हा हेच ऑस्ट्रेलियन फक्त जग डोक्यावर घ्यायचं बाकी राहातात. 'आपल्या चुका ठेवायच्या झाकून व दुसऱ्यावर टिका करायची जीव झोकून ' हि ऑस्ट्रेलियन्सची अप्पलपोटी रणनिती आता मात्र जगासमोर आली आहे. अनेक खोटे व रडीचे डाव खेळून सामने जिंकल्याचे अनेक किस्से आपणास क्रिकेट इतिहासाचे पानं चाळल्यानंतर लक्षात येतील.
जेव्हा भारतातील कसोटी सामने दोन किंवा अडीच दिवसांत संपतात तेव्हा ऑस्ट्रेलियन दिग्गज आणि माध्यमे खेळपट्यांना लक्ष्य करतात. असे म्हटले जाते की, भारतीय खेळपट्टया योग्यरित्या तयार केलेल्या नसतात आणि त्या निकृष्ट दर्जाच्या असतात. कोलकात्यातील ईडन गार्डन्स येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अलिकडेच झालेला कसोटी सामना तीन दिवसांत संपला, ज्यामुळे खेळपट्टीवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. पण आता, पर्थमधील वेगवान खेळपट्टीवर सामना दोन दिवसांत संपला, तेव्हा ऑस्ट्रेलियाने स्वतःचीच खिल्ली उडवली आहे. हेच ऑस्ट्रेलियन पर्थच्या खेळपट्टीचे समर्थन करताना दिसले. भारतीय खेळपट्टयांवर टिका करणारे दोन दिवसांत संपलेल्या पहिल्या अॅशेस कसोटीचे समर्थन कसे करू शकतात ?
या सामन्यात मिचेल स्टार्क प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडसाठी मारेकरीच ठरला. त्याच्या आक्रमक गोलंदाजीने दिवसाच्या दुसऱ्या सत्रात इंग्लंडला १७२ धावांवर रोखले. स्टार्कने त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी केली आणि सात विकेट्स घेतल्या. त्यानंतर जेव्हा ऑस्ट्रेलिया फलंदाजी करत होता तेव्हा इंग्लंडच्या गोलंदाजांनीही त्यांच्यावर प्रहार केला. प्रथम जोफ्रा आर्चर आणि ब्रायडन कार्सने बळी घेतले, त्यानंतर इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्सने दिवसाच्या शेवटच्या पाच विकेट्स घेऊन धावसंख्या रोखली. खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने १२३ धावांवर नऊ विकेट्स गमावल्या होत्या. दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाकडून आणखी एक धोकादायक गोलंदाजी आक्रमण झाले, ज्यामुळे इंग्लंड दुसऱ्या डावात २०० पेक्षा कमी धावसंख्येत गुंडाळला गेला. त्यानंतर, २०५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, ट्रॅव्हिस हेडने विक्रमी शतक झळकावून कांगारूंना विजय मिळवून दिला. सामन्याच्या दुसऱ्या दिवशीही तेरा विकेट्स पडल्या.
ऑस्ट्रेलियाने अॅशेस मोहिमेची सुरुवात विजयाने केली, पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर अवघ्या दोन दिवसांत इंग्लंडला हरवले. दोन दिवसांच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला ८ विकेट्सने हरवले. १९२१ नंतर पहिल्यांदाच अॅशेस सामना दोन दिवसांत निकाली काढण्यात आला. दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियासमोर २०५ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते आणि ट्रॅव्हिस हेडच्या धमाकेदार खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने अवघे दोन गडी गमावून ते साध्य केले. लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने ७ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या.
फक्त दोन दिवसांत संपलेला अॅशेस सामना १८८८ मध्ये होता. ऑस्ट्रेलियाने हा सामना ६१ धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने त्यांच्या पहिल्या डावात ११६ धावा केल्या. प्रत्युत्तरात, इंग्लंडचा पहिला डाव फक्त ५३ धावांवर संपला. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डावही ६० धावांवर संपला. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडला दुसऱ्या डावात फक्त ६२ धावा करता आल्या. हा दौऱ्यातील पहिला सामना होता. या दौऱ्यातील दुसरा सामना ओव्हल येथे खेळला गेला आणि तोही फक्त दोन दिवसांत संपला. इंग्लंडने हा सामना एक डाव आणि १३७ धावांनी जिंकला. त्यानंतर १८९० मध्ये ओव्हल येथे आणि १९२१ मध्ये नॉटिंगहॅम येथे झालेले सामने दोन दिवसांत संपले. लॉर्ड्स १८८८, ओव्हल १८८८, मँचेस्टर १८८८ ,ओव्हल १८९०, नॉटिंगहॅम १९२१, पर्थ २०२५ याअॅशेस मालिकेतील कसोटी केवळ दोन दिवसांत संपल्या आहेत.
या सामन्यात एकूण ८४७ चेंडू टाकण्यात आले, ज्यामध्ये चारही डाव एकत्रित आहेत. चेंडू टाकण्याच्या बाबतीत हा तिसरा सर्वात कमी अॅशेस सामना आहे. सन १८८८ च्या मँचेस्टर कसोटीला निकालापर्यंत पोहोचण्यासाठी ७८८ चेंडू लागले, तर १८८८ च्या लॉर्ड्स कसोटीला निकालापर्यंत पोहोचण्यासाठी ७९२ चेंडू लागले. सन १८९५ च्या सिडनी कसोटीला निकालापर्यंत पोहोचण्यासाठी ९११ चेंडू लागले. हा विक्रम पर्थ कसोटीत मोडला गेला.
शनिवारी ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ८ विकेट्सने पराभव करून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ट्रॅव्हिस हेडच्या धमाकेदार खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने २०५ धावांचे लक्ष्य सहज गाठले. ट्रॅव्हिस हेडने दुसऱ्या डावात ८३ चेंडूंचा सामना केला आणि १६ चौकार आणि चार षटकारांसह १२३ धावा केल्या. हेडची खेळी निर्णायक ठरली. या खेळीदरम्यान, ट्रॅव्हिस हेडने कसोटी क्रिकेटमध्ये यापूर्वी कोणत्याही फलंदाजाने गाठलेली कामगिरी केली नव्हती. ट्रॅव्हिस हेडने ६९ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. अॅशेसच्या इतिहासातील हे दुसरे सर्वात जलद शतक आहे आणि कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीराचे संयुक्तपणे सर्वात जलद शतक आहे. चौथ्या डावात लक्ष्याचा पाठलाग करताना फलंदाजाने केलेले हे सर्वात जलद शतक आहे. हेडने त्याच्या शतकादरम्यान १२ चौकार आणि चार षटकार मारले.
पर्थ कसोटीच्या दुसऱ्या दिवशी, ट्रॅव्हिस हेडने निर्णायक खेळी केली आणि सामना पूर्णपणे उलटा केला. हेडने त्याच्या संपूर्ण डावात इंग्लंडच्या जलद गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. उस्मान ख्वाजा जखमी झाल्यानंतर डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या ट्रॅव्हिड हेडने स्फोटक फलंदाजी केली. इंग्लंडच्या कथीत बॅजबॉलला उत्तर देताना, ऑस्ट्रेलियाने टी-२० शैलीत फलंदाजी केली, कसोटीत ७ पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने धावा काढल्या. हेडने फक्त ६९ चेंडूत त्याचे शतक पूर्ण केले. ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने हेडच्या डावाचे वर्णन 'अन ऑफ द वर्ल्ड' असे केले.
पर्थ कसोटीत पाच सत्रांमध्ये तीन डाव संपले. जलद गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. ११३ षटकांत ४६८ धावांसाठी ३० विकेट्स पडल्या. पहिल्या दिवशी स्टंपपर्यंत, जलद गोलंदाजांनी १९ विकेट्स घेतल्या होत्या, तर दुसऱ्या दिवशी चहापानाच्या ब्रेकपर्यंत ११ विकेट्स पडल्या होत्या. हेडने ८३ चेंडूत १२३ धावा केल्या आणि संपूर्ण मैदानावर चौकार मारले.
पराभवानंतर, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स म्हणाला की त्याचा संघ "थोडा आश्चर्यचकित" झाला आणि त्याने हेडच्या खेळीचे वर्णन "अभूतपूर्व" असे केले. या विजयासह, ऑस्ट्रेलियाने घरच्या मैदानावर अॅशेस कसोटीत त्यांची अपराजित मालिका १६ पर्यंत वाढवली. सन २०१०-११ मालिका जिंकल्यापासून इंग्लंडने ऑस्ट्रेलियात एकही कसोटी जिंकलेली नाही.
ऑस्ट्रेलिया त्यांचे प्रमुख वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड व नियमीत कर्णधार पॅट कमिन्स हे या सामन्यात खेळले नाही. ते दोघे नसल्यामुळे इंग्लंडला या सामन्यात विजयाचे दावेदार गणले जात होते, तसे बघाल तर हेडची ती स्फोटक खेळी वगळता त्यांची कामगिरी सरसच होती. पण ऑस्ट्रेलियाची खेळपट्टी आपल्या सोयीने बनवण्याची रणनितीच खरी इंग्लंडच्या पराभवाचे कारण ठरले.
@डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
मो. क्रं - ९०९६३७२०८२.

