दक्षिण आफ्रिकेविरूध्दच्या कोलकाता कसोटीतील पराभवानंतर सन २०२५-२७ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचे भारताचे मार्ग खडतर बनले आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या या चक्रात आठपैकी तीन कसोटी गमावल्या आहेत, एक सामना अनिर्णित राहिला आहे आणि फक्त चार कसोटी जिंकल्या आहेत. ही कामगिरी अंतिम फेरीत पात्र होण्यासाठी आवश्यक असलेल्या मानकांपेक्षा खूपच कमी आहे. संघाचा सध्याचा गुणांचा टक्का (पीसीटी) ५४.१७ टक्के इतका खालावला आहे, जो मागील तीन चक्रांचा विचार करता, अंतिम फेरीत पात्र होण्यासाठी पुरेसा मानला जात नाही. डब्ल्यूटीसीमध्ये अंतिम फेरीत पोहोचणाऱ्यांसाठी गुणांची टक्केवारी सामान्यतः ६४-६८% दरम्यान असते. परिणामी, भारताचा मार्ग अत्यंत बिकट आणि आव्हानात्मक बनला आहे.
या मालिकेत भारताला एकूण १८ कसोटी सामने खेळायचे होते, त्यापैकी त्यांनी आधीच आठ सामने खेळले आहेत. आता, त्यांचे १० महत्त्वाचे सामने शिल्लक आहेत. यामध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (गुवाहाटी) घरच्या मालिकेतील एक कसोटी, श्रीलंका दौऱ्यावरील दोन कसोटी, न्यूझीलंड दौऱ्यावरील दोन कसोटी आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका यांचा समावेश आहे. या सर्व सामन्यांमध्ये भारताला जवळजवळ परिपूर्ण क्रिकेट खेळावे लागेल. विशेषतः ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच कसोटी सामन्यांची मालिका भारताचे डब्ल्यूटीसी फायनलचे भवितव्य ठरवू शकते, कारण या मालिकेतील पराभव भारताचे अंतिम फेरीतील प्रवेशास पूर्णविराम आणू शकतो जसा मागच्या चक्रात झाला होता तसा.
जर भारताने उर्वरित सर्व १० सामने जिंकले तर त्याचे एकूण गुण १७२ होतील आणि गुणांची टक्केवारी ७९.६३ टक्के होईल, म्हणजेच अंतिम फेरीत स्थान निश्चित होईल. तसे बघाल तर ही एक आदर्श परिस्थिती आहे. भारताची संभाव्य गुणांची टक्केवारी उर्वरित सामन्यांमध्ये संघ किती विजय मिळवतो यावर अवलंबून असेल. भारताने १८ पैकी आठ कसोटी सामने खेळले आहेत आणि पुढील १० कसोटी सामन्यांमध्ये किती विजय ( अनिर्णित राहाणाऱ्या सामन्यांची शक्यता दुर्लक्षित करून) भारताच्या गुणांची टक्केवारी वाढेल पुढीलप्रमाणे असू शकेल : -
पुढील १० कसोटींमध्ये ५ विजय: ५१.८५%
पुढील १० कसोटींमध्ये ६ विजय: ५७.४१%
पुढील १० कसोटींमध्ये ७ विजय: ६२.९६%
पुढील १० कसोटींमध्ये ८ विजय: ६८.५२%
पुढील १० कसोटींमध्ये ९ विजय: ७४.०७%
पुढील १० कसोटींमध्ये १० विजय: ७९.६३%
स्पष्टपणे दिसते की, अंतिम फेरीच्या शर्यतीत राहण्यासाठी भारताला किमान आठ विजयांची आवश्यकता आहे. यामुळे संघ ६८% पेक्षा जास्त होईल, बहुतेक संघ अंतिम फेरीत खेळले आहेत त्यांचा ऐतिहासिक मर्यादेचा टप्पा असा होता.
गेल्या तीन सत्रांमध्ये अंतिम फेरीत खेळलेल्या सहा संघांच्या गुणांची टक्केवारी अशी होती. सन २०१९–२०२१, अंतिम विजेता न्यूझीलंड होता.
भारताने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकविले तेंव्हा ७२.२ % अशी गुणांची टक्केवारी होती. न्यूझीलंडने गुण क्रमवारीत ७० % गुण मिळवून दुसरे स्थान पटकविले होते. सन २०२१–२०२३ चा अंतिम विजेता ऑस्ट्रेलिया होता. ऑस्ट्रेलियाने डब्ल्यूटीसी गुणांकनात ६६.७ % मिळवून अव्वल स्थान पटकविले होते. तर भारताने ५८.८ % सह दुसऱ्या क्रमांकाने फायनलमध्ये पोहोचला होता.
सन २०२३–२०२५ च्या तिसऱ्या चक्रातील अंतिम विजेता संघ दक्षिण आफ्रिका होता. दक्षिण आफ्रिका गुणतालिकेत ६९.४४ % गुणांसह अव्वल स्थानी होती. तर दुसऱ्या क्रमांकावरील ऑस्ट्रेलियाचे ६७.५४ % गुण होते.
हे आकडे स्पष्टपणे दर्शवतात की, अंतिम फेरीसाठी संघांच्या गुणांची टक्केवारी सातत्याने ६५-७०% दरम्यान राहिली आहे. या पॅटर्ननुसार, भारताला टॉप-टूमध्ये स्थान मिळवण्यासाठी पुढील १० पैकी किमान आठ सामने जिंकावे लागतील आणि सद्य परिस्थितीत ते महाकठीण दिसते.
भारताची समस्या केवळ प्रतिस्पर्ध्यांच्या प्रभावी कामगिरीची नाही, तर त्यांच्या स्वतःच्या विसंगत कामगिरीची देखील आहे. फलंदाजांना परदेशातही संघर्ष करावा लागला आहे. भारतीय कसोटी संघ सध्या संक्रमणाच्या काळातून जात आहे. कर्णधार नवीन आहे आणि अंतिम अकरा जणांमध्ये अद्याप कोणीही निश्चित झालेले नाही. या सर्व बाबींमुळे भारताच्या अडचणी वाढतात. तथापि, चांगली बातमी अशी आहे की भारताचे अजूनही १० सामने आहेत, त्यापैकी सहा सामने घरच्या मैदानावर आहेत. भारताला घरच्या परिस्थितीचा फायदा घ्यावा लागेल. मात्र विद्यमान संघ प्रबंधानाला केवळ आणि केवळ संघ हिताचेच निर्णय घ्यावे लागतील. त्यासाठी गटबाजी, वशिलेबाजी व राजकारणा पासून चार हात दूर राहावे लागेल. हे सर्व करताना मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या इगोचा प्रश्न मुख्य अडथळा ठरू शकतो. त्यासाठी बीसीसीआयलाच गंभीरतेने कठोर निर्णय घ्यावे लागतील. पर्यायाने गंभीरला हटविण्याची वेळ आली तरी चालेल. मात्र हे सगळं किती इमानदारीने होते हे बघणे मनोरंजक ठरेल.
@डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
मो. क्रं - ९०९६३७२०८२.

