एरंडोल प्रतिनिधी — दीपस्तंभ व आर्यन फाउंडेशन जळगाव, स्वामी विवेकानंद केंद्र, योगेश्वरी नागरिक सहकारी पतसंस्था व राखी हॉस्पिटल एरंडोल यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी, पालक व शिक्षकांसाठी खानदेशातील सुप्रसिद्ध अशी तीन दिवसीय दीपस्तंभ व्याख्यानमाला २२ ते २४ डिसेंबर २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.
रा.ती. काबरे विद्यालयाच्या पटांगणावर होणाऱ्या या व्याख्यानमालेत २२ डिसेंबर रोजी दीपक करंजीकर (मुंबई) “उद्याचा भारत आणि आपण”, २३ डिसेंबर रोजी शरद तांदळे (पुणे) “माझा उद्योजकतेचा प्रवास” तर २४ डिसेंबर रोजी धनश्री करमळकर व नवीन काळे (मुंबई) “तिची उत्तुंग भरारी” व “आकाशाचे खांब शोधणारे… स्वयं!” या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.
सुसंस्कृत भावी पिढी घडविणे, युवकांचा आत्मविश्वास वाढविणे तसेच पालक-शिक्षकांना प्रबोधन मिळावे या उद्देशाने गेल्या १७ वर्षांपासून कै. के.एम. महाजन, कै. डॉ. अनिल महाजन व कै. डॉ. ब.तु. राठी यांच्या स्मरणार्थ ही व्याख्यानमाला आयोजित केली जाते. या उपक्रमास रा.ती. काबरे विद्यालय, ग्रामीण उन्नती मंडळ व दादासो दि.श. पाटील विद्यालय यांचे सहकार्य लाभले आहे.
या प्रेरणादायी व्याख्यानमालेस तालुक्यातील व शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक दीपस्तंभ व्याख्यानमाला एरंडोल यांच्या वतीने करण्यात आले आहे.


