shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नोटीस न देता वीज कनेक्शन कट; दोन दिवसांत संपूर्ण बिल भरूनही ग्राहकाची फरफट महावितरण अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह?


अहिल्यानगर| प्रतिनिधी
महावितरणच्या एका गंभीर आणि धक्कादायक प्रकारामुळे देहरे परिसरात ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. काही महिन्यांची थकबाकी असतानाही, विद्युत अधिनियम 2003 व महावितरणच्या नियमानुसार आवश्यक असलेली लेखी नोटीस न बजावता तसेच कोणताही दूरध्वनी किंवा प्रत्यक्ष संपर्क न साधता अनेकांचे थेट वीज कनेक्शन कट करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

संबंधित ग्राहक देवदर्शनासाठी गावाबाहेर गेलेले असताना आणि दुकान बंद असतानाच महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीजपुरवठा खंडित केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, वीज कनेक्शन कट केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत ग्राहकाने संपूर्ण थकबाकी वीज बिल भरले असूनही, या कारवाईमुळे मानसिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात मोठा त्रास सहन करावा लागल्याची प्रतिक्रिया ग्राहकांकडून व्यक्त होत आहे.


विद्युत अधिनियम व महावितरणच्या अंतर्गत नियमांनुसार, थकबाकी असल्यास ग्राहकास किमान १५ दिवसांची लेखी नोटीस देणे बंधनकारक आहे. तसेच ग्राहक उपलब्ध नसल्यास संपर्क साधण्याची प्रक्रिया राबवणे अपेक्षित असताना, या प्रकरणात ती पूर्णपणे डावलण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे सदर वीज कनेक्शन कट ही कारवाई नियमबाह्य व मनमानी असल्याचा आरोप केला जात आहे.

या प्रकरणात वीजपुरवठा खंडित करण्याचा आदेश नेमका कोणी दिला? कोणत्या अधिकाऱ्याच्या सूचनेवर ही कारवाई करण्यात आली? संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित होणार का? तसेच अशा प्रकारे नियमभंग करणाऱ्यांवर चौकशी अथवा शिस्तभंग कारवाई होणार का, असे गंभीर प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाबाबत माहिती अधिकार कायद्याअंतर्गत अधिकृत माहिती मागवण्याची तयारी संबंधित ग्राहकाने दर्शवली असून, यामुळे महावितरणच्या स्थानिक कार्यालयातील अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडण्याची शक्यता आहे. नागरिकांमध्येही “नियम ग्राहकांसाठीच की अधिकाऱ्यांसाठीही?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.

महावितरण प्रशासनाने या प्रकाराची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा प्रकारे नोटीस न देता वीजपुरवठा खंडित करण्याचे प्रकार थांबवावेत, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
close