प्राथमिक आरोग्य केंद्र जानवे, उपकेंद्र मंगरूळ अंतर्गत चिमनपुरी–पिंपळे खु. गावात ११ ते ४९ वयोगटातील किशोरवयीन मुली व महिलांची हिमोग्लोबिन तपासणी मोहीम राबविण्यात आली. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर व तालुका आरोग्य अधिकारी गिरीश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र जानवे व ग्रामपंचायत पिंपळे यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान पार पडले.
या तपासणी मोहिमेत वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय रनालकर, डॉ. रिया शिसोदे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत कदम, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आकाश माळी यांच्यासह आरोग्य कर्मचारी व आशा सेविकांनी सक्रिय सहभाग घेतला. सरपंच सौ. वर्षा युवराज पाटील, उपसरपंच मीना पाटील, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक व सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आरोग्यविषयक जनजागृती व महिलांच्या आरोग्य संरक्षणासाठी ही मोहीम उपयुक्त ठरली.


