एरंडोल — सनश्योर एनर्जी कंपनीच्या वतीने सामाजिक जबाबदारी उपक्रमांतर्गत ‘स्वास्थ्य पहल’ या सीएसआर कार्यक्रमाद्वारे एरंडोल तालुक्यात मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांना मूलभूत आरोग्य सेवा सुलभ व्हाव्यात, या उद्देशाने हे शिबिर राबविण्यात येत आहे.l
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, ७ व १३ डिसेंबर रोजी गांधीपुरा येथे, १४ डिसेंबर रोजी एरंडोल येथील विश्वरज रस्त्यावरील कम्युनिटी हॉलमध्ये शिबिरे पार पडली. या शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून आतापर्यंत ४०० हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला आहे.
या शिबिरांत सामान्य वैद्यकीय तपासणी, माता आरोग्य सल्ला, नेत्र व दंत तपासणी, रक्तदाब व मधुमेह तपासणी आदी सेवा मोफत देण्यात आल्या. शिबिरे जुन्नर व मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने राबविण्यात आली.
उपक्रमाच्या पुढील टप्प्यात ३० डिसेंबर रोजी एरंडोल येथील एचडीएफसी बँकेजवळील दत्त नगर परिसरात तसेच सकाळी ९ वाजता आणखी एक मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
सनश्योर एनर्जीचे मुख्य व्यवसायिक अधिकारी (CCO) व सह-संस्थापक श्री. मनिष मेहता यांनी निवेदनात सांगितले की, आरोग्य सेवांची सर्वाधिक गरज असलेल्या ठिकाणी पोहोचून ठोस व अर्थपूर्ण परिणाम साधणे हा ‘स्वास्थ्य पहल’चा मुख्य उद्देश आहे. या माध्यमातून आरोग्य जागरूकता वाढून दीर्घकालीन सकारात्मक परिणाम साधले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘स्वास्थ्य पहल’सारख्या उपक्रमांद्वारे सनश्योर एनर्जी स्वच्छ व शाश्वत ऊर्जेसोबतच स्थानिक समुदायांच्या सामाजिक विकासालाही प्राधान्य देत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


