कोणत्याही खेळाडूची लक्षणीय कामगिरी ही अनेकदा संघात स्थान मिळविण्याची हमी मानली जाते. दमदार कामगिरी ही संघात स्थान अबाधीत राखण्याची आधार ठरते. पण संजू सॅमसन कदाचित याला अपवाद आहे. सन २०२४ मध्ये, तो टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचा सर्वात यशस्वी फलंदाज होता. मात्र त्याला त्याचे फळ संघात कायमस्वरूपी स्थान मिळण्याऐवजी डावलून मिळाले. तो एक जिज्ञासू वृत्तीचा ततडाखेबाज सलामीवीर आहे, पण नंतर त्याला त्या स्थानावरून काढून टाकण्यात आले. मग, कधी क्रमांक ४ वर, कधी क्रमांक ५ वर, कधी क्रमांक ७ वर... म्हणजे त्याची संगीत खुर्चीच करण्यात आली. शानदार कामगिरीनंतर, त्याला त्याच्या सलामीच्या स्थानावरून काढून टाकण्यात आले, नंतर अंतिम अकरा मधूनही वगळण्यात आले. आता जर त्याला संघातून वगळण्यात आले तर आश्चर्य वाटणार नाही. त्याची कामगिरी खराब नव्हती, तर त्याच्यावर नसलेल्या वरदहस्ताच्या अभावामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. संघ व्यवस्थापनाची कृपा इतरत्र, दुसऱ्या कोणावर तरी आहे, परिणामी एका चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूची कारकीर्द धोक्यात आली असे वाटते.
सन २०२४ मध्ये संजू सॅमसन हा टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये टीम इंडियाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने १३ सामन्यांमध्ये ४३.६ च्या सरासरीने १८०.१६ च्या स्ट्राईक रेटसह ४३६ धावा केल्या. गेल्या वर्षी त्याने तीन शतके आणि एक अर्धशतक झळकविले, त्यापैकी दोन दक्षिण आफ्रिकेत झाले. तो डावाच्या सुरुवातीचा सुपरहिट खेळाडू होता. सन २०२४ च्या विश्वचषकापासून तो भारताचा तिसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.
त्याला डावाच्या सुरुवातीचा सामना करण्यापासून काढून टाकण्यात आले. का ? कारण संघ व्यवस्थापन शुभमन गिलला खेळवायचे होते. अभिषेक शर्मा आणि सॅमसनची सुपरहिट सलामी जोडी तुटली. कोहली-रोहितनंतरच्या काळात शुभमन गिल निःसंशयपणे भारताचा सुपरस्टार आहे. तो भारतीय क्रिकेटचा नवा राजा आहे, पण त्याच्यासाठी सुपरहिट सलामी जोडीशी छेडछाड करणे आवश्यक आहे का ? मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये फलंदाजी क्रमाला जास्त महत्त्व दिले जाते, असा सध्याचा संघ व्यवस्थापनाचा विचार आहे. फलंदाजी क्रम हा सलामीवीरांपुरता मर्यादित आहे आणि गरजेनुसार इतरांना कुठेही ठेवता येते. त्यामुळे या तर्काच्या आधारे, गिलला डावाची सुरुवात करण्याऐवजी वेगळ्या स्थानावर खेळवता आले असते. विशेषतः सॅमसन आणि अभिषेकची सलामी जोडी आधीच उत्तम फॉर्ममध्ये आहे व संघाचा पाया मजबूतपणे भरू शकते.
गिल आणि संजू सॅमसनच्या सलामीवीर म्हणून कामगिरीवर एक नजर टाकली तर स्पष्टपणे दिसून येते की, सॅमसनचा हात वरचढ आहे. गेल्या वर्षीच त्याने टी-२० क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून तीन शतके झळकावली. तो भारताचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. दरम्यान, शुभमन गिल जवळजवळ एक वर्षापासून टी-२० क्रिकेटमध्ये अर्धशतकाची आस धरत आहे.
टी-२० मध्ये सलामीवीर म्हणून संजू सॅमसनची कामगिरी अशी आहे. संजू सॅमसनने १७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ३२.६२ च्या सरासरीने ५२२ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये तीन शतके आणि एक अर्धशतक आहे. या काळात त्याचा स्ट्राइक रेट १७८.७६ आहे.
तर शुभमनची टी-२० मध्ये सलामीवीर म्हणून कामगिरी संजूच्या तुलनेत फ़िकी दिसते. शुभमन गिलने ३५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने एक शतक आणि तीन अर्धशतकांसह ८४१ धावा केल्या आहेत. टी-२० मध्ये सलामीवीर म्हणून गिलची सरासरी २८.०३ आहे आणि त्याचा स्ट्राइक रेट १४०.४० आहे.
सलामीवीर म्हणून गिल संजू सॅमसनच्या कामगिरीच्या जवळपासही नाही. कर्णधार सूर्यकुमार यादवची कामगिरी देखील चिंताजनक आहे, परंतु जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा सर्व प्रश्न त्या विजयात दडलेले जातात .. सध्या, भारतीय संघ सातत्याने टी-२० मालिका जिंकत आहे, म्हणूनच सूर्या किंवा गिलबद्दलचे प्रश्न दडलेले आहेत, असे दिसते की दोघांनीही संघात राखीव जागा मिळवल्या आहेत. कारण एक कर्णधार आहे, दुसरा उपकर्णधार आहे, जो कसोटी आणि एकदिवसीय संघांचे नेतृत्व करतो आणि सर्व स्वरूपातील कर्णधार म्हणून त्याची तयारी केली जात आहे.
शुभमन गिलला ऑल फॉरमॅटचा कर्णधार बनवण्याच्या जवळ पोहोचताना, बीसीसीआयने त्याला उपकर्णधार म्हणून टी२० मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री दिली आहे. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनची सलामी जोडी कोणत्याही विरोधी संघासाठी मोठी डोकेदुखी असायची, परंतु आगामी टी२० विश्वचषकाच्या काही महिन्यांपूर्वी बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापनाच्या बालिश हट्टीपणामुळे भारतासाठी डोकेदुखी निर्माण झाली आहे.
संजू सॅमसनच्या जागी शुभमन गिलला सलामीवीर म्हणून निवडण्यात आले, जे संघासाठी महागडे ठरत आहे. बीसीसीआयची वाईल्ड कार्ड एन्ट्री, गिलला सर्व स्वरूपातील खेळाडू आणि कर्णधार बनवण्याच्या आग्रहासह, भारताच्या विश्वचषकातील आशांना धक्का देऊ शकते. जर उपकर्णधार चांगली कामगिरी करत नसेल, तर दुसऱ्या कोणाला तरी संधी दिली पाहिजे. अजिंक्य राहाणे हा भारताचा कसोटीतील अपराजित हंगामी कर्णधार होता, तो विराट नंतर कर्णधारपदाचा वारसही होता, मात्र त्याची खराब फलंदाजी त्याच्या सर्व संधी हिरावून घेऊन गेली. त्यामुळे गिलला सलामीवीर म्हणून संघात कायमचा हक्क सांगण्याचा कोणताही अधिकार नाहीच, शिवाय संघ प्रबंधनानेही असा अट्टाहास करणे चुकीचे आहे. असे केल्याने संघाचे नुकसान होतेच शिवाय संजू सारखा चांगला खेळाडू बळीचा बकरा ठरत आहे.
@डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
मो. क्रं - ९०९६३७२०८२.

