एरंडोल–धरणगाव रस्त्याच्या रुंदीकरण व नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने परिसरात प्रचंड प्रमाणात धूळ उडत असून स्थानिक रहिवाशी, शालेय विद्यार्थी तसेच ये–जा करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत मनसे व स्थानिक नागरिकांच्या वतीने एरंडोलचे प्रांताधिकारी मनीष कुमार गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, काम सुरू असलेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी धूळ नियंत्रणासाठी दिवसातून किमान तीन–चार वेळा पाणी मारणे आवश्यक असताना आजपर्यंत एकदाही पाणी मारण्यात आलेले नाही. त्यामुळे उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांना सर्दी, खोकला, घसा व श्वसनाचे त्रास सुरू झाले असून रस्त्यालगतच्या दुकानदारांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे व दुकानातील माल खराब होत आहे. सध्या थंडीचे दिवस व लवकर पडणारा अंधार, वाहनांच्या प्रकाशात उडणारी धूळ यामुळे समोरचे वाहन वा पादचारी दिसत नसून छोटे–मोठे अपघात घडत असल्याचेही निवेदनात नमूद आहे.
त्रास असह्य झाल्याने मनसे जिल्हा उपाध्यक्ष अनिल बागुल यांच्यासह नागरिकांनी तहसीलदार प्रदीप व प्रांताधिकारी मनीष कुमार गायकवाड यांना निवेदन देत तातडीने धूळ नियंत्रणाची उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिक रामदास पाटील, ॲड. हिम्मतराव पाटील यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.


