shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिवसेना उबाठाच्या या अतिदारूण पराभवास जबाबदार कोण?

निवडणुकीत पक्षांतर्गत विरोधकला कसे संपवायचे? याचे मासलेवाईक उदाहरण !

ज्येष्ठ पत्रकार .दिलीप मालवणकर, अंबरनाथ यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

अंबरनाथ नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक अतिशय चूरशीची झाली. दोन दिग्गज उमेदवारांच्या साठमारीत कोण निवडून येणार हे प्रथमदर्शनी सांगणे कठीण होते. जो कोणी येईल तो अत्यल्प मताधिक्याने  येईल, हे मात्र नक्की होते. दिवसेंदिवस दिवस चूरस वाढवणाऱ्या या निवडणुकीत भाजपच्या तेजश्री करंजुले पाटील यांचा 5344 मताधिक्याने विजय झाला.

 भाजपची उमेदवारी व सासऱ्याच्या पुण्याईमुळे तेजश्री करंजुले या युवतीचा विजय झाला. 2005 साली थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत त्यांचे सासरे गुलाबराव करंजुले पाटील हे निवडून आले होते. या विजयाची पुनरावृत्ती तेजश्री यांनी केली. अंबरनाथ शहराला सनदी लेखापाल असलेल्या सुशिक्षित नगराध्यक्ष  लाभल्या ही त्यातल्या त्यात आनंदाची बाब आहे. त्यांना स्वातंत्रपणे काम करू दिले जाणार की सासरे व पती यांच्या छत्रछाये खाली त्यांच्या निगराणीत काम करावे लागणार? हे लवकरच दिसून येईल. जनमताच्या कौलाचा आदर राखत त्यांचे अभिनंदन केलेच पाहिजे.

दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे अरविंद वाळेकर यांच्या पत्नी सौ मनिषा वाळेकर यांचा निसटता पराभव सलणारा आहे. एकंदरीत परिस्थिती पाहता सौ मनिषा वाळेकर या निवडून येण्यासारखी परिस्थिती होती. मात्र निवडणूक पुढे ढकलल्याचा लाभ करंजुले यांनी पुरेपूर उठवला. भाजपच्या परंपरेनुसार बेसुमार पैसे वाटप झाले, हे काही गुपित नाही. परंतू वाळेकरांना तसे करण्यास मज्जाव नव्हता. त्याबाबतीत ते कमी पडले असावेत. मीं यापूर्वी लिहिलेल्या निवडणूक समीक्षेत वाळेकरांना पक्षांतर्गत विरोध भोवणार हे स्पष्ट केले होते. झालेही तसेच. वरवर शांत दिसणाऱ्या आमदारांनी पेरलेले सुरुंग कामी आले. उबाठा शिवसेनेचे घरभेदी हाताशी धरून त्यांना जे साधायचे होते ते साध्य केले. विधानसभा निवडणुकीपासून त्यांच्या दावणीला बांधले गेलेल्या अनाजींनी त्यांचे कर्तव्य (?) चोख बजावले.

या निवडणुकीत उबाठा शिवसेनेचा अपेक्षेप्रमाणे सुफडासाफ झाला. शिव सेनेची मशाल निशाणी घेऊन उबाठा शिवसेनेचे 25 व मनसेचे 11 उमेदवार उभे होते ते सर्व आडवे झाले. यात दुहेरी निष्ठा असलेले काही उमेदवार होते तर निवडणूक लांबल्याने हतबल होऊन शत्रू पक्षाचा दारुगोळा घेऊन लढणारे व ही रसद पुरवणारे दलाल ही होते. गुलाबरावांचा गुलकंद खाणारे व वालेकरांची मलई खाणारे असे दोन्ही प्रकारचे अनेक घरभेदी होते. त्यामुळे पराभव अटळच होता, परंतू किमान 4-5 नगरसेवक तरी येतील ही आशाही वांझोटी ठरली. ३६ चे ३६ उमेदवार आडवे पडले. किमान दुसऱ्या क्रमांकाची मतं  मिळावी तर तेही नाही. 

सगळ्यात दारुण अवस्था व अति दारुण पराभव झाला तो नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अंजली राऊत यांचा.

सुरुवातीपासून त्यांच्यात जिगुविशू वृत्ती व जिंकण्याची मानसिकता दिसली नाही. स्वतःची आर्थिक ऐपत नव्हती,पण पक्ष निधी देईल, या आशेवर त्या नगराध्यक्षपदाच्या महासंग्रामात उतरल्या तरीपण पराभूत मानसिकता दिसत होती. पक्ष व नेतृत्वाने त्यांना युद्धात ढकलले परंतु शस्त्रसज्ज केले नाही. ना ढाल ना तलवार,  ना मशाल तेवण्यासाठी इंधन. त्यातून घरभेदी दबा धरून बसलेले. त्यामुळे दारुण नव्हे तर अति दारुण पराभव पत्करावा लागला.

अंबरनाथ हा शिव सेनेचा एकेकाळचा बाले किल्ला ! या बाले किल्ल्यात अंजली राऊत यांना अवघी 4701 मतं मिळाली. अनामत रक्क्म वाचवण्यासाठी 17 हजार मतं आवश्यक असताना त्याच्या ही 25 टक्के मतं मिळाली. ही नामुष्की अंजली राऊत यांची म्हणता येणार नाही. जिल्हा नेतृत्वाचे व स्थानिक नेतृत्वाचे हे महाभयंकर अपयश आहे. त्यांच्यावर कारवाई होण्या ऐवजी  मातोश्रीवर पराभवाची मुलामेदार चर्चा होईल. याहून मोठ्या पराभवाची अजून एक संधी या लाडोबांना दिली जाईल.

वाळेकरांचा पराभव हा एक सुनियोजित कटाचा भाग आहे. त्यांची उंची व वर्चस्व छाटण्याचा हा प्रयोग यशस्वीपणे पार पडला. वाळेकरांच्या घरात फूट पडून त्यांची भाजपात रवानगी केलेले दोन्ही उमेदवार विजयी झाले. वाळेकरांचा मुलगा मात्र पराभूत झाला. पवन वाळेकरांच्या कार्यालयावर सुनियोजित गोळीबार झाला, परंतू तो करविणारे सूत्रधार पडद्या आड आहेत. त्यांचा पडदा उठला की तो वाळेकरांना निवडणूक काळात बदनाम करण्याचा डाव होता व त्याचा सूत्रधार कोण होता हे निष्पन्न होऊ शकते. मात्र देवाभाऊ है ना! मग काहीच होणार नाही.

अंबरनाथ नगरपालिकेत शिव सेना शिंदे गटाचे जे उमेदवार होते त्यात आमदारांचे जे समर्थक ऊमेदवार होते ते सर्व निवडून आले, मात्र त्या नगरसेवकांच्या प्रभागात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनिषा वाळेकर ह्या पिछाडीवर असल्याचे समजते. हे कसे शक्य आहे ? याची चौकशी झाली तर कपटी कोण व कट कोणी केला हे सिद्ध होईल.

आत्ता निवडणुकांची परिभाषा व समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे निवडणूक जिंकणे व त्याद्वारे पक्षांतर्गत  विरोधकांना कसे संपवायचे याचे हे मासलेवाईक उदाहरण गणले गेले पाहिजे.
close