shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडार समाजाचा वीस वर्षांपासून लोकप्रतिनिधीविना संघर्ष..!

लातूर/ प्रतिनिधी —
लातूर महानगरपालिकेच्या स्थापनेपासून आजतागायत मागील वीस वर्षांच्या कालावधीत वडार समाजाचा एकही नगरसेवक निवडून न येणे ही बाब गंभीर असून लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांनाच आव्हान देणारी आहे.


 “वडार समाजाचा वीस वर्षांपासून लोकप्रतिनिधीविना संघर्ष असा थेट सवालच सामाजिक कार्यकर्ते भटक्या- विमुक्त समूहाचे अभ्यासक तथा वडार समाज संघ, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष श्रीकांत मुद्दे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. 

महानगरपालिकेच्या प्रत्येक निवडणुकीत बिल्डर, गुत्तेदार, ठेकेदार व व्यापारी, आर्थिकदृष्ट्या सधन वर्गातील उमेदवार मोठ्या आर्थिक बळावर निवडून येत असताना, एकीकडे प्रभागात ओबीसी आरक्षण जाहीर करायचं आणि त्यातही मूळ मायक्रो ओबीसी प्रवर्गातील उमेदवार डावलून आर्थिक दृष्ट्या जो सधन आहे, त्याचीच तिकीट देऊन निवड करायची यामुळे समाजाच्या मुख्य प्रवाहात योगदान देणाऱ्या वडार समाजाला मात्र सातत्याने डावलले जात असल्याचा आरोप समाजबांधवांकडून करण्यात येत आहे. शहराच्या विकासात मोलाचे योगदान असूनही राजकीय प्रतिनिधित्वापासून वंचित ठेवले जाणे हे लोकशाहीच्या आत्म्याला घातक असल्याचे मत सामाजिक  कार्यकर्ते श्रीकांत मुद्दे यांनी व्यक्त केले. 
लोकशाही व्यवस्थेत सर्व समाजघटकांना समान संधी मिळणे अपेक्षित असते. मात्र प्रत्यक्षात आर्थिक व राजकीय ताकदीच्या जोरावरच उमेदवार निवडून येत असल्याने सामान्य, भटक्या-विमुक्त व कष्टकरी समाज घटकांचे प्रतिनिधित्व शून्याच्या पातळीवर पोहोचले आहे. यामुळे महापालिकेच्या निर्णय प्रक्रियेत वडार समाजाच्या प्रश्नांना व समस्यांना वाचा फुटत नसल्याचे वास्तव समोर येत आहे.

 लातूर महानगरपालिका निवडणुकीत वडार समाजाला योग्य असे प्रतिनिधित्व मिळाले नाही, तर ही लोकशाहीची थट्टा ठरेल, असेही यावेळी म्हटले. “प्रतिनिधी नसेल तर न्याय कसा?” असा सवाल करत वडार समाजाने सर्व राजकीय पक्षांकडे ठोस भूमिका मांडण्याची मागणी केली आहे. कारण वडार वस्तीतील नागरीक सुविधांचे प्रश्न २०-२० वर्ष सुटत नाहीत, याला काय म्हणावे? त्याचे कारण प्रभागातील निवडून आलेले नगरसेवक एकदा निवडून दिला की तो पाच-पाच वर्ष ढुंकूनही पाहत नाही आणि कोण नगरसेवक आहे हेच आम्हाला कळत नाही. या कारणास्तव आमच्या अनेक नागरी सुविधांचे प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबितच राहतात. म्हणून आमचा वापर केवळ निवडणुकीपुरताच होतो आणि निवडणुका संपल्या की आमचे प्रश्नही संपतात, अशीच एकंदरीत परिस्थिती वर्षानुवर्ष निर्माण होताना दिसते आहे.

लोकशाही बळकट करायची असेल, तर सर्व समाजघटकांचा सहभाग आणि प्रतिनिधित्व आवश्यक असून वडार समाजाला न्याय देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते भटक्या-विमुक्त समूहाचे अभ्यासक तथा वडार समाज संघ, महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्याध्यक्ष श्रीकांत मुद्दे यांनी पत्रक काढून केली आहे.

.         श्रीकांत मुद्दे 
close