shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चुकांचा भडीमार, वनडे मालिका पराभवाचे खरे कारण


भारताने न्यूझीलंडविरुद्धचा तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना ४१ धावांनी गमावला. इंदूरमधील या पराभवामुळे टीम इंडियाने तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका २-१ अशी गमावली. गेल्या तीन महिन्यांत टीम इंडियाचा हा दुसरा एकदिवसीय मालिकेतील पराभव होता. भारताचा ऑक्टोबरमध्ये यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव झाला होता, परंतु दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिका विजयामुळे असे दिसून आले की भारत अजूनही घरच्या मैदानावर मजबूत आहे. परंतु, घरच्या मैदानावर न्यूझीलंड विरुद्धच्या २-१ अशा पराभवाने अनेक प्रश्न उपस्थित केले. हा केवळ मालिका पराभव नव्हता, तर ऐतिहासिक पराभव होता, कारण सन १९८८ नंतर न्यूझीलंडने भारतात द्विपक्षीय एकदिवसीय मालिका जिंकण्याची ही पहिलीच वेळ होती. शिवाय, सलग सात सामने जिंकल्यानंतर भारताने इंदूर येथे पहिल्यांदाच पराभव पत्करला. तीन दशकांच्या या विक्रमांमुळे हा पराभव आणखी जिव्हारी लागणारा ठरला.

               एवढ्या मोठ्या अपयशानंतरआता हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की, या पराभवाच्या मुळाशी कोणत्या कमजोर बाबी आहेत. पॉवरप्लेमध्ये रोहित शर्माचा संघर्ष होता का ? अष्टपैलू खेळाडू म्हणून रवींद्र जडेजाचे अपयश ही एक प्रमुख बाब होती ?  की मधल्या फळीचे पतन भारताच्या पराभवासाठी निर्णायक ठरले ?

या सर्व गोष्टींचा नीट विचार केला तर या मालिकेतील पराभवाची मुख्य कारणे अशी आहेत : -

पॉवरप्लेमध्ये रोहित शर्माकडून अपयशी सुरुवात, जडेजाचे अष्टपैलू म्हणून अपयश, मधल्या फळीची घसरगुंडी आणि मोठ्याभागीदारीचा अभाव, गोलंदाजांकडे नियंत्रणाचा अभाव आणि प्लॅन बी नसणे. न्यूझीलंडचा सुधारित रणनीतिक दृष्टिकोन आणि परिस्थितीजन्य समज ठेवण्यात अपयश.

 वरील सगळ्या बाबींचा परिस्थितीजन्य अभ्यास केला तर पराभवाचे प्रमुख कारणं कोणत्या खेळाडूत दडली होती हे सहज लक्षात येईल.

 रोहित शर्मा : चांगली सुरुवात पण...

भारताचा पॉवरप्ले रोहित शर्माच्या आक्रमकतेवर अवलंबून असतो, परंतु या मालिकेत त्याने गती किंवा सातत्य दिले नाही. खराब वेळ, मर्यादित शॉट निवड आणि कमी स्ट्राईक रेटमुळे भारताची सुरुवात कमकुवत झाली. जेव्हा एखादा सलामीवीर धावा काढण्यात अपयशी ठरतो तेव्हा मधल्या फळीवर दबाव येतो आणि या मालिकेत हे स्पष्ट झाले. विराट कोहलीला पॉवरप्ले नियंत्रणाच्या कमतरतेची भरपाई करावी लागली, 

 रवींद्र जडेजा : -अष्टपैलू म्हणून सफसेल निष्प्रभ

रवींद्र जडेजा हा भारताचा संतुलित खेळाडू आहे, त्याच्याकडे गोलंदाजीत नियंत्रण, फलंदाजीत स्थिरता आणि क्षेत्ररक्षणात अतिरिक्त मूल्य आहे. परंतु, न्यूझीलंडविरुद्ध तो यादोन प्रमुख क्षेत्रांमध्ये अपयशी ठरला. मधल्या षटकांमध्ये त्याचे काम धावा मर्यादित करणे आणि विकेट घेणे आहे, परंतु ग्लेन फिलिप्स आणि डॅरिल मिशेलविरुद्ध तो सातत्याने महागडा ठरला. शेवटच्या एकदिवसीय सामन्यात सहा षटकांत ४१ धावा देऊन तो बाद झाला हे याचा पुरावा आहे. बॅटसह त्याने केलेल्या ४, २७ आणि १२ धावांवरून हे देखील दिसून येते की या मालिकेत खरा जडेजा दिसत नव्हता. विशेष म्हणजे त्याची खासीयत असलेल्या क्षेत्ररक्षणातही तो ढिसाळ दिसला.

शुभमन गिल : कर्णधारपदाचा दबाव व अपरिपक्वता 
शुभमन गिलची एकदिवसीय कर्णधार म्हणून सुरुवात एक भयानक स्वप्नवत राहिली आहे. टीम इंडियाने त्याच्या नेतृत्वाखाली दोन एकदिवसीय मालिका खेळल्या आहेत, त्या दोन्ही गमावल्या आहेत. याआधी त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कर्णधारपद भूषवले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तो दुखापतग्रस्त झाला आणि केएल राहुलने कर्णधारपद भूषवले. तथापि, शुभमनची कामगिरी विशेष प्रभावी राहिलेली नाही. त्याचे कर्णधारपदही निराशाजनक दिसून आले आहे. कर्णधारपदाचा दबाव त्याच्या फलंदाजीवरही परिणाम करत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन डावात त्याने ४३ धावा काढल्या, तर न्यूझीलंडविरुद्धच्या तीन डावात शुभमनने १३५ धावा काढल्या. त्याची सरासरी ४५ होती, परंतु चांगली सुरुवात केल्यानंतर तो विकेट गमावत राहिला, अनेकदा तो खराब शॉट्स खेळत राहिला. गिलने दोन अर्धशतकेही झळकविली, परंतु त्याच्याकडून अपेक्षित असलेली कामगिरी पूर्ण करू शकला नाही. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने फक्त २३ धावा काढल्या. १-० अशी मालिका आघाडी घेतल्यानंतर कर्णधारपद आणि रणनीती कुठे चुकली हे फक्त गिल आणि प्रशिक्षक गंभीरलाच कळेल.

मधल्या फळीचे अपयश

जर कोणत्या विभागाने सर्वात जास्त निराशा केली तर ती मधल्या फळीची होती. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताची धावसंख्या फक्त नऊ षटकांत नाबाद २८ वरून ४ बाद ७१अशी झाली. काइल जेमिसन आणि जॅक फोक्स यांनी केएल राहुल आणि श्रेयस अय्यरवर दबाव आणला आणि त्यांना स्ट्राइक रोटेट करता आला नाही किंवा भागीदारीही करता आली नाही. या परिस्थितीत, विराट कोहलीचे १२४ धावांचे शतक व्यर्थ ठरले. नितीश रेड्डी (५२) याने प्रयत्न केले, पण तिसऱ्या हाफमध्ये संघाला पाठिंबा मिळाला नाही. भारताला तळाच्या फळीचा पाठिंबा मिळाला, अन्यथा पराभव आणखी मोठ्या फरकाने झाला असता.

गोलंदाजीत भेदकता नसणे आणि पर्यायी नियोजनाचा अभाव

भारताच्या गोलंदाजीतही भेदकता व वैविध्य नव्हते. जवळजवळ तिन्ही सामन्यांमध्ये न्यूझीलंडने ३०० धावा सहज गाठल्या असे दिसून आले. पहिल्या एकदिवसीय सामन्यात किवींनी ५० षटकांत आठ बाद ३०० धावा केल्या, त्यानंतर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ४७.३ षटकांत तीन बाद २८६ धावा करून विजय मिळवला आणि तिसऱ्या सामन्यात किवींनी आठ बाद ३३७ धावा केल्या. ३३८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ ४६ षटकांत २९६ धावांवर आटोपला. भारतात आलेल्या परदेशी संघाने भारतीय संघापेक्षा चांगली फलंदाजी करताना पाहिले. हे भारतीय गोलंदाज आणि फिरकीपटूंचे पूर्ण अपयश होते.


सिराज आणि कुलदीपचे अपयश

यांनी विकेट घेतल्या पण दबाव निर्माण करण्यात अपयशी ठरले. हर्षितनेही विकेट घेतल्या पण भरपूर धावा दिल्या, तर प्रसिद्धने मोठी निराशा केली, तो निष्प्रभ दिसत होता. नितीश रेड्डी गोलंदाज म्हणून चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला. दरम्यान न्यूझीलंडचे फलंदाज, विशेषतः मिशेल आणि फिलिप्स, भारतीय गोलंदाजांविरुद्ध आरामदायी दिसत होते. मिशेलची दोन शतके याचा पुरावा आहेत. जडेजाच्या अपयशामुळे कुलदीपवर अधिक भार पडला, प्लॅन बीचा अभाव स्पष्ट झाला आणि डेथ ओव्हर्समध्ये धावा मिळत गेल्या. डेथ ओव्हर्समध्ये भारताला जसप्रीत बुमराहची उणीव भासली.

नितीशचा प्रयोग अपयशी, हार्दिकची अनुपस्थिती निर्णायक
नितीश रेड्डीचा प्रयोग पुन्हा अपयशी ठरला. वॉशिंग्टन सुंदर पहिल्या एकदिवसीय सामन्यात खेळल्यानंतर, दुखापतीमुळे नितीशला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात संधी देण्यात आली. तथापि, तो बॅटने किंवा बॉलने प्रभाव पाडू शकला नाही. त्याने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात चांगली कामगिरी केली, परंतु त्याची गोलंदाजी अपयशी ठरली. या महत्त्वाच्या मालिकेत भारताला हार्दिक पंड्याची उणीव भासली. हार्दिक संघाला संतुलन प्रदान करतो. त्याच्याकडे वेग आणि स्विंग आहे, ज्याची नितीशकडे कमतरता आहे. त्याचे मध्यमगती चेंडू फलंदाज सहजपणे खेळतात.

संघ प्रबंधानाचे रणनैतिकतीक अपयश

टीम इंडियाची रणनीती देखील कमकुवत दिसली. मिशेल फिरकीपटूंना चांगला खेळतो हे लक्षात घेता त्याच्याविरुद्ध फिरकीपटूंचा वापर करण्यात आला. दरम्यान, प्रसिद्ध कृष्णाला भारतीय खेळपट्टयांवर अपेक्षित उसळी मिळत नाही. असे असूनही त्याला दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये संधी मिळाली. हर्षित राणाचा इकॉनॉमी रेट प्रत्येक सामन्यात ५.५० च्या वर होता. तथापि, त्याने त्याच्या फलंदाजीने त्याची भरपाई केली.

श्रेयस अय्यरचे पूर्णपणे अपयश

भारतीय एकदिवसीय उपकर्णधार श्रेयस अय्यरची खराब कामगिरी या अपयशात पूर्णतः उघडी पडली. तीन सामन्यांमध्ये त्याने ८१ च्या स्ट्राईक रेटसह २० च्या सरासरीने केवळ ६० धावा केल्या. असे असूनही त्या टी२० मालिकेत बदली खेळाडू म्हणून निवडले. श्रेयसचे अपयश हे भारतीय संघाच्या पराभवाचे एक प्रमुख कारण होते. मोठ्या धावांचा पाठलाग आणि मोठ्या धावसंख्येसाठी, चौथ्या क्रमांकाच्या ठोस फलंदाजाला कामगिरी करावी लागते, परंतु श्रेयस तसे करण्यात अपयशी ठरला.

या मालिकेने अनेक जुने पायंडे मोडले 

सन १९८८ नंतर पहिल्यांदाच न्यूझीलंडने भारतात द्विपक्षीय एकदिवसीय मालिका आठ प्रयत्नांनंतर जिंकली. सात विजयानंतर इंदूरमध्ये भारताचा पहिला एकदिवसीय पराभव. इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या आठ एकदिवसीय सामन्यांपैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने सहा जिंकले. ऑक्टोबर २०२२ नंतर पहिल्यांदाच, घरच्या मैदानावर झालेल्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर भारताने एक सामना गमावला (१३ विजयांनंतर). या आकडेवारीवरून स्पष्ट होते की हा पराभव सामान्य प्रक्रियेचा भाग नव्हता, तर अनेक कमकुवतपणाचा एकत्रित परिणाम होता.

वनडे विश्वचषक स्पर्धा २०२७ मध्ये होणार आहे. त्याच्या तयारीचाच हा एक भाग असला तरी प्रत्येक वेळी प्रयोग अपयशी ठरायलाच हवे असे नाही. कारण असे प्रयोग भारतीय क्रिकेटमध्ये तिनही प्रारूपात मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. त्यामुळे रसिकवर्ग निराश होतोच पण चांगल्या व गुणी खेळाडूंच्या आत्मविश्वासाला ठेच पोहोचत आहे. हे भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठी नक्कीच चांगले नाही.

@डॉ.दत्ता विघावे                    
    क्रिकेट समिक्षक 
    मो. क्रं - ९०९६३७२०८२.
close