जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
राज्यपालांच्या शपथ ग्रहणाच्या वेळी परंपरेनुसार सोनेरी रंगाचा मुलामा असलेली, त्रिमूर्ती व अशोकचक्र या राजमुद्रा असलेली, सुंदर नक्षीकाम केलेली व लाल रंगाची गादी असलेली भव्य खुर्ची वापरतात. खुर्चीच्या दोन हातांना हत्ती सोंड वर करून आधार देत असल्याचे मजबूत काष्ठकाम करण्यात आले आहे.
महाराष्ट्र लोकभवनात अशा प्रकारच्या दोन भव्य खुर्च्या आहेत. नियमितपणे त्यांची देखभाल केली जाते. पूर्वी राज्यपालांच्या शपथ ग्रहणाच्या वेळी दरबार हॉलमध्ये, किंवा शपथविधी हिरवळीवर असला तर त्या ठिकाणी - या दोन भव्य खुर्च्या ठेवल्या जायच्या.दोनपैकी एका खुर्चीवर मावळते राज्यपाल तर दुसऱ्या खुर्चीवर शपथ घेत असलेले नवे राज्यपाल बसत.
राज्यपालांच्या शपथविधीला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी व उपमुख्यमंत्र्यांनी देखील उपस्थित राहण्याची प्रथा आहे.
शपथविधीच्या वेळी त्यांची देखील आसनव्यवस्था व्यासपीठावर राज्यपालांच्या शेजारी केली जाते.
अर्थात त्यांची आसन व्यवस्था 'नॉर्मल' खुर्च्यांवर केली जाते !
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती महाराष्ट्राच्या राज्यपालांना शपथ देत असतात. त्यामुळे एक 'नॉर्मल' खुर्ची त्यांचेसाठी देखील ठेवली जाते.राजभवनातील या शाही खुर्च्या स्वातंत्र्यानंतर झालेल्या राज्यपालांच्या अनेक शपथविधीच्या वेळेस वापरण्यात आल्या असल्याचे दिसते.
*खुर्च्यांची अदलाबदल*
शपथविधीला मावळते व नवे दोन्ही राज्यपाल उपस्थित असल्यास शपथविधीच्या सुरुवातीला मावळते राज्यपाल शिष्टाचारानुसार वरिष्ठ असतात. परंतु नव्या राज्यपालांनी शपथ घेतली की ते लगेच राजशिष्टाचारानुसार वरिष्ठ होतात. मावळते राज्यपाल प्रोटोकॉल नुसार खाली येतात. त्यामुळे नव्या राज्यपालांनी शपथ घेतली की आजी व माजी असे दोन्ही राज्यपाल आपापली आसने बदलतात.
*नियम नाही
राज्यपालांनी शपथविधीला याच मोठ्या शाही खुर्च्यांवर बसावे असा काही नियम नाही.
काही लोकांना अश्या आसनावर बसणे आवडत नाही; काहींना कंफर्टेबल वाटत नाही. अश्यावेळी त्यांचेसाठी 'नॉर्मल' खुर्चीची व्यवस्था केली जाते. अनेकदा मावळते राज्यपाल नव्या राज्यपालांच्या शपथविधीच्या एक दिवस अगोदर राज्य सोडून निघून जातात.
त्यामुळे गेल्या १२ वर्षांमध्ये राज्यपालांच्या शपथविधीला दोन खुर्च्या वापरण्याचे काम पडले नाही.
*शंकरनारायणन यांचा शपथविधी
राज्यपाल के शंकरनारायणन यांनी आजपासून बरोबर १६ वर्षांपूर्वी म्हणजे दिनांक २२ जानेवारी २०१० रोजी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली.या शपथविधीला मावळते राज्यपाल एस सी जमीर हे देखील उपस्थित होते. उभयतांनी शपथविधीनंतर आसने बदलली आणि एकमेकांना आलिंगन दिले.
दिनांक २४ ऑगस्ट २०१४ रोजी शंकरनारायणन यांनी (मिझोराम येथे बदली केल्यानंतर) महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सहा दिवसांकरिता गुजरातचे राज्यपाल ओमप्रकाश कोहली यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता.
कोहली यांच्या शपथविधीला शंकरनारायणन हे देखील उपस्थित होते.
त्यामुळे त्या शपथविधीला दोन्ही खुर्च्या वापरण्यात आल्या.
दोन खुर्च्या वापरण्याचा तो शेवटचा प्रसंग ठरला.
राज्यपाल चे. विद्यासागर राव (पदग्रहण दि. ३० ऑगस्ट २०१४), राज्यपाल रमेश बैस (दि १८ जुलै २०२३), राज्यपाल सी पी राधाकृष्णन (दि. ३१ जुलै २०२४) व राज्यपाल आचार्य देवव्रत (दि. १५ सप्टेंबर २०२५) यांच्या शपथविधीला एकच भव्य खुर्ची वापरण्यात आली.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (दि. ५ सप्टेंबर २०१९) यांनी शपथविधीच्या वेळी स्वतःसाठी साधी खुर्ची वापरणेच पसंत केले. शपथविधीनंतर या शाही खुर्च्या नव्या राज्यपालांच्या आगमनापर्यंत 'जलविहार' सभागृहाच्या दर्शनी भागात ठेवल्या जातात. राज्यपालांचा शपथविधी सोडल्यास त्या इतर कोणत्याही कार्यक्रमात वापरल्या
जात नाहीत.

