एरंडोल | प्रतिनिधी राजमाता जिजाऊ यांच्या कर्तृत्व, विचार आणि संस्कारांतूनच छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पराक्रमी, लोक कल्याण कारी राजा घडला आणि शिवस्वराज्य उभे राहिले, असे प्रतिपादन नगर वाचनालयाचे अध्यक्ष मा. नगरसेवक जगदीश ठाकूर यांनी केले.
नगर वाचनालयातर्फे आयोजित राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. मुघलांच्या जुलमी सत्तेला आव्हान देण्याचे बळ शिवरायांना जिजाऊंच्याच धैर्यपूर्ण विचारांतून मिळाले, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाळधी स.न. झवर विद्यालयाचे चेअरमन सुनील झवर होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
सुनील झवर यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे विचार आजच्या समाजाला दिशा देणारे असून त्यातूनच सशक्त राष्ट्रनिर्मिती शक्य आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कवी प्रवीण महाजन, तर आभार परेश बिर्ला यांनी मानले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




