“श्रमातून संस्कारांची शिदोरी!”
एरंडोल | प्रतिनिधी —
दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अंतर्गत आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिराचा उत्साहपूर्ण वातावरणात समारोप करण्यात आला. समाजसेवा, श्रमप्रतिष्ठा आणि राष्ट्रभक्तीची बीजे रुजवणारे हे शिबिर विद्यार्थ्यांसाठी अनुभवसमृद्ध ठरले.
समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा. अमितदादा पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून एरंडोल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. निलेश गायकवाड, प्राचार्य डॉ. ए.जे. पाटील, सरपंच सौ. वैशाली पाटील, श्री. विजयसिंह पाटील व मुख्याध्यापक श्री. मिलिंद साळी उपस्थित होते.
कार्यक्रमाधिकारी प्रा. विजय गाढे यांनी सादर केलेल्या अहवालात शिबिरकाळात राबविलेल्या स्वच्छता मोहिमा, श्रमदान, वनराई बंधारे, वृक्षारोपण, जलसंवर्धन, आरोग्य जनजागृती, अंधश्रद्धा निर्मूलन, गुरांचे लसीकरण व सांस्कृतिक कार्यक्रमांचा आढावा देण्यात आला. या उपक्रमांमुळे ग्रामीण भागात सकारात्मक सामाजिक जाणीव निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले.
पोलीस निरीक्षक श्री. निलेश गायकवाड यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मोबाईलच्या अति वापरामुळे होणाऱ्या मानसिक व सामाजिक दुष्परिणामांकडे लक्ष वेधले. “डिजिटल साधनांवर नियंत्रण ठेवल्यासच विद्यार्थी सक्षम आणि संतुलित घडतील,” असा त्यांनी संदेश दिला.
अध्यक्षीय भाषणात अमितदादा पाटील म्हणाले,
“स्वतःच्या श्रमातून समाजासाठी काहीतरी करण्याचे समाधान अमूल्य असते.”वनराई बंधारे व जलसंवर्धनामुळे भूजल पातळी वाढते व शेतीला बळकटी मिळते, असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सविता पाटील यांनी केले तर आभार प्रा. योगेश येंडाईत यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. शिबिरामुळे विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन अधिक सामाजिक व सकारात्मक झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.




