shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

१३ फेब्रुवारीच्या परिक्रमेसाठी शिर्डी सज्ज; लेंडी बागेत ५० रातराणीच्या रोपांचे वृक्षारोपण

साईबाबांच्या लेंडी बागेत दरवळणार आता 'रातराणी'चा सुगंध; ऐतिहासिक शिर्डी परिक्रमेची घोषणा

शिर्डी प्रतिनिधी: ( तुषार महाजन )
सर्वधर्मसमभावाचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या शिर्डी नगरीत, साई मंदिर परिसरातील पवित्र लेंडी बागेत आता रातराणीचा सुगंध दरवळणार आहे. 'ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन'च्या संकल्पनेतून आज लेंडी बागेत सुवासिक रातराणीच्या ५० रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने, आगामी १३ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या ऐतिहासिक 'शिर्डी परिक्रमे'ची घोषणाही करण्यात आली.
या कार्यक्रमास साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, शिर्डी नगर परिषदेचे ज्येष्ठ नगरसेवक अभय राजे शेळके, साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार, नवनिर्वाचित नगरसेवक मंगेश त्रिभुवन, नगरसेवक अमित शेळके, नगरसेवक नंदू गोंदकर, नगरसेवक दीपक गोंदकर, नगरसेवक बापू ठाकरे, ग्रीन अँड क्लीन शिर्डीचे अध्यक्ष अजित पारख, ॲड. अनिल शेजवळ, मनीलाल पटेल, सोसायटीचे संचालक रामभाऊ गागरे, संजय शिरडीकर, मयूर चोळके, ऋषी माळी, मनोज वाघ, माऊली जवक, नारायण दराडे, विश्वनाथ गायकवाड, श्री. गवारे, रोहित गुंजाळ, प्रज्वल त्रिभुवन आदींसह साई संस्थान बगीचा विभागाचे प्रमुख भणगे उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते लेंडी बागेत ५० रातराणीची झाडे लावण्यात आली.

यावेळी बोलताना मनीलाल पटेल म्हणाले की, १३ फेब्रुवारी २०२६ रोजी शिर्डी परिक्रमा महोत्सव असल्याने दरवर्षी नवीन संकल्प केला जातो. आज पवित्र लेंडी बागेत ही झाडे लावण्यात आली असून, ज्या दिवशी या फुलांचा सुगंध चावडी आणि द्वारकामाईपर्यंत पोहोचेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने शिर्डी परिक्रमा आणि 'ग्रीन अँड क्लीन शिर्डी'चे उद्दिष्ट साध्य होईल.

ज्येष्ठ नगरसेवक अभय शेळके म्हणाले, "१३ फेब्रुवारी रोजी येणाऱ्या साईभक्तांच्या स्वागतासाठी शिर्डी ग्रामस्थ सज्ज झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बाबांच्या पवित्र लेंडी बागेत रातराणीची झाडे लावली आहेत. आम्ही सर्व नगरसेवकांनी यासाठी पुढाकार घेतला असून, भाविकांनी देखील या परिक्रमेसाठी पाऊल उचलावे," असे आवाहन त्यांनी केले.

नगरसेवक दीपक गोंदकर यांनी १३ फेब्रुवारीच्या परिक्रमेत जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. नगरसेवक अमित शेळके यांनी बाबांच्या आशीर्वादाने लेंडी बाग विकसित होत असून, प्रदूषणमुक्त शिर्डीसाठी आमचा पुढाकार असेल, असा विश्वास व्यक्त केला. नगरसेवक मंगेश त्रिभुवन यांनी १९११ मध्ये निस्सीम साईभक्त तात्या पाटील कोते यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या स्वच्छता कमिटीच्या आठवणींना उजाळा देत, आज वृक्षारोपण करण्याचे भाग्य लाभल्याबद्दल आनंद व्यक्त केला. नगरसेवक नंदू गोंदकर यांनी 'ग्रीन अँड क्लीन'च्या उपक्रमास भविष्यातही सहकार्य राहील अशी ग्वाही दिली.

साई संस्थान सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार यांनी सांगितले की, लेंडी बागेत रातराणीच्या सुगंधाने भाविकांना सकारात्मक ऊर्जा मिळेल. तसेच, ग्रीन अँड क्लीन शिर्डीचे अध्यक्ष अजित पारख यांनी १३ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या 'शिर्डी महापरिक्रमा महोत्सवाची' अधिकृत घोषणा करून बाबांच्या प्रधान लेंडी बागेत ग्रीन अँड क्लीन शिर्डी यांच्या संकल्पनेतून रात राणीची झाडे लावण्यात आल्याचे सांगितले.
close