पंढरपूर | प्रतिनिधी
पंढरपूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी महादेव धोत्रे यांची निवड झाल्याने शहराच्या राजकीय, सामाजिक व विकासात्मक वर्तुळात समाधानाची आणि उत्साहाची लाट उसळली आहे. जनतेच्या प्रश्नांशी थेट नाळ जोडून, निस्वार्थपणे काम करणाऱ्या नेतृत्वाला मिळालेली ही योग्य पावती असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
महादेव धोत्रे हे नाव पंढरपूरच्या जनतेसाठी नवे नाही. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, गरीब व गरजू नागरिकांचे प्रश्न, मूलभूत सुविधा यासाठी सातत्याने झटणारा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख आहे. पद असो वा नसो, “जनतेचे काम हेच माझे पद” या भूमिकेतून त्यांनी आजवर काम केले आहे.
उपनगराध्यक्ष पदाच्या जबाबदारीसाठी निवड होताच धोत्रे यांनी विकास, पारदर्शकता आणि लोकहित हेच आपले प्रमुख सूत्र राहील, असा निर्धार व्यक्त केला. नगरपरिषदेच्या कामकाजात गतिमानता आणणे, रखडलेली कामे मार्गी लावणे आणि पंढरपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणे, हे त्यांचे स्पष्ट उद्दिष्ट आहे.
त्यांचा साधेपणा, सर्वसामान्यांशी असलेला थेट संवाद, आणि कोणताही भेदभाव न करता काम करण्याची वृत्ती यामुळे ते सर्व स्तरातील नागरिकांमध्ये लोकप्रिय आहेत. कार्यकर्त्यांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत प्रत्येकाशी आपुलकीने वागणे हीच त्यांची खरी ओळख आहे.
महादेव धोत्रे यांच्या निवडीचे शहरभर स्वागत होत असून, विविध सामाजिक संस्था, नागरिक, कार्यकर्ते आणि हितचिंतकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. “हा उपनगराध्यक्ष जनतेतून आलेला, जनतेसाठी झटणारा आहे” अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
पंढरपूरच्या विकासाच्या वाटचालीत महादेव धोत्रे यांचे नेतृत्व निश्चितच नवी दिशा देईल, असा विश्वास व्यक्त केला जात असून, त्यांच्या कार्यकाळात शहराला अधिक सक्षम, स्वच्छ आणि समृद्ध स्वरूप प्राप्त होईल, अशी अपेक्षा सर्वसामान्य पंढरपूरकर व्यक्त करत आहेत.

