जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
निवडणूक काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा प्रचारासाठी वापर केल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने दाखल केलेल्या तक्रारीची राज्य निवडणूक आयोगाने अधिकृत दखल घेतली आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस धनंजय रामकृष्ण शिंदे यांनी दिली.
दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई मेट्रो रेल्वे परिसरात एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत ही निवडणूक आचारसंहितेचा स्पष्ट भंग असल्याचा आरोप काँग्रेसच्या तक्रारीत करण्यात आला आहे. या संदर्भातील व्हिडीओ पुरावे, घटनाक्रम आणि कायदेशीर मुद्दे सविस्तर स्वरूपात तक्रारीसोबत सादर करण्यात आले होते.
या प्रकरणाची प्राथमिक छाननी केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने पुढील कार्यवाहीसाठी हे प्रकरण मुंबई महानगरपालिका (MCGM) प्रशासनाकडे पाठवले आहे. आयोगाने MCGM अधिकाऱ्यांना अधिकृत ई-मेलद्वारे चौकशी व अहवाल सादर करण्याबाबत कळवले असून, त्या ई-मेलची प्रत तक्रारदारालाही पाठवण्यात आली आहे.
*तक्रारीतील प्रमुख मुद्दे :
• निवडणूक काळात मुंबई मेट्रोसारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा प्रचारासाठी वापर
• शासकीय यंत्रणेच्या संभाव्य गैरवापराचा प्रश्न, ज्यामध्ये परवानग्या व समन्वयाचा समावेश
• वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह असमान व विशेष सुरक्षा बंदोबस्त
• माध्यमांच्या उपस्थितीत प्रचारात्मक स्वरूपाची मुलाखत
हे सर्व मुद्दे निवडणूक प्रक्रियेची निष्पक्षता, समान संधीचे तत्त्व आणि लोकशाही मूल्यांशी थेट संबंधित असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
*काँग्रेसची भूमिका*:
या संदर्भात बोलताना प्रदेश सरचिटणीस धनंजय रामकृष्ण शिंदे म्हणाले, *”निवडणूक काळात मुख्यमंत्री स्वतः सार्वजनिक मालमत्ता आणि शासकीय यंत्रणेचा प्रचारासाठी वापर करत असतील, तर तो आचारसंहितेचा गंभीर आणि जाणीवपूर्वक भंग आहे. कायदा सर्वांसाठी समान आहे. पद कितीही मोठे असले तरी नियमांचे पालन बंधनकारक आहे. या प्रकरणात राज्य निवडणूक आयोगाने केवळ औपचारिक नव्हे, तर कठोर आणि उदाहरणार्थ कारवाई करावी, अशी आमची स्पष्ट मागणी आहे.”*
पुढील भूमिका :
सदर प्रकरण सध्या सक्षम विचाराधीन असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी या संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता, निष्पक्षता आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ते सर्व कायदेशीर व लोकशाही मार्ग काँग्रेस अवलंबेल, असेही धनंजय रामकृष्ण शिंदे यांनी स्पष्ट केले.

