वाळकी प्रतिनिधी (दादासाहेब आगळे) : लोहार समाजाच्या रक्तात बुद्धीत उत्पादन कसे करावे याचे ज्ञान आहे. आपल्या आजूबाजूला होणारे स्थित्यंतरे ओळखून उत्पादन करणारा लोहार समाज हा उत्पादक आहे व्यावसायिक अन् व्यापारी नव्हे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे भटके विमुक्त अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. सत्यनारायण कोठे यांनी केले.
अखिल लोहार समाज विकास संघ, लोहार यूथ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य व अहिल्याननगर जिल्ह्यातील लोहार समाज बांधवांच्या वतीने रविवारी (११ जानेवारी) शहरातील लक्ष्मी नारायणमंगल कार्यालयात आयोजित राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्यात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी व्हीजेएनटी ओबीसीचे राज्याचे जॉईंट डायरेक्टर संतोष हराळे हे होते. व्यासपीठावर अखिल लोहार समाज विकास संघाचे अध्यक्ष संदीप थोरात, लोहार युथ फाउंडेशनचे राज्याध्यक्ष किशोर सोनवणे, मेळाव्याचे स्वागताध्यक्ष प्रा. हर्षल आगळे, महसूल अधिकारी राजेंद्र लाड, सेवानिवृत्त प्राचार्य सुभाष कौसे, सोमनाथ हरेर, प्रा. प्रभाकर लाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात आदी उपस्थित होते.
भटके विमुक्त अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. कोठे म्हणाले, भटके विमुक्तांचा अभ्यास करण्यासाठी मुंबई विद्यापीठात भटके विमुक्त संशोधन अध्ययन केंद्र स्थापन झाले आहे. केंद्राच्या माध्यमातून केंद्राकडे चार कोटींचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे, राज्य शासनाकडे 40 लाखांचा प्रस्ताव पाठवला आहे. या केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील लोहार कुटुंबांचा अभ्यास केला जाणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील समाजाचा अभ्यास व्हावा यासाठी तेरा हजार पाचशे कुटुंबांचा सर्वे करण्यात येणार आहे. यातून आपल्या समाजाचा जिल्हा निहाय अभ्यास होईल. त्यातून आपल्या समाजाचे खरे स्वरूप मिळेल त्यातून आपल्या समाजाचे काय प्रश्न आहे, शासनाला काय मागायचे आहे हा अभ्यास यातून महत्त्वाचा ठरेल. आपल्या जवळ कौशल्य आहे याचा पुरेपूर वापर आपण करून घ्यायला पाहिजे. आपण आपल्यामध्ये जोपर्यंत बदल घडून आणू शकत नाही तोपर्यंत आपले प्रगती होऊ शकत नाही. लोहार कुठे कमी नाही ना बुद्धीने, ना पैशाने. त्याला गरज आहे योग्य व योग्य गोष्टींचा वापर करायची भांडवलाची त्यातूनच आपला समाज प्रगत होऊ शकेल.
प्रास्ताविक मेळाव्याचे निमंत्रण सोमनाथ हराळे यांनी केले. त्यांनी या मेळाव्याचा उद्देश सांगितला. पाहुण्यांचा परिचय व स्वागत मेळाव्याचे स्वागताध्यक्ष हर्षल आगळे यांनी केले. ते म्हणाले, राहुरी अधिवेशनानंतर लोहार समाजाची राज्यात वेगळी ओळख निर्माण झाली. अशीच सुरुवात आपल्याला आता नगर जिल्ह्यातून पुन्हा करायचे आहे. सुरुवात विश्वकर्मा जयंती पासून करूया.
लोहार युथ फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर सोनवणे म्हणाले, आजचा हा कार्यक्रम समाजाला नवीन दिशा देणारा आहे. हा कार्यक्रम वेगळे विचाराने चालणाऱ्या दोन संघटना नियोजित केला. लोहार समाजाचा फायदा झाला पाहिजे याचा विचार करून संघटना एकत्र आल्या. त्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला. लोहार युथ फाउंडेशनच्या माध्यमातून समाजातील तरुणांना व्यवसाय करिअर याबाबत मार्गदर्शन केले जाते.
अखिल लोहार समाज विकास संघाचे अध्यक्ष संदीप थोरात यांनीही मेळाव्याला आज बांधवांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल समाज बांधवांचे आभार मानले.
व्हीजेएनटी ओबीसीचे राज्याचे जॉईंट डायरेक्टर हराळे म्हणाले, विवाह जुळवताना आर्थिक परिस्थितीचा विचार न करता मुलगा होतकरू निर्व्यसनी संस्कारी असावा हे अगोदर पहावे या मेळाव्यात समाजासाठी काम करणाऱ्यांचा जीवनगौरव समाज भूषण तसेच रंगनाथराव हरेर, बन्सी गाडेकर यांना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला.गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी सूत्रसंचालन मुख्याध्यापक संजय इघे, बाळासाहेब इघे यांनी तर आभार सुधाकर कौसे यांनी मानले. दोन्ही संस्था पदाधिकारी सदस्य, परिचय मेळावा यशस्वी होण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा समाज बांधव यांनी परिश्रम घेतले.
मेळाव्यात ३१० मुला-मुलींचा परिचय
या वधू-वर परिचय मेळाव्याला अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, बीड, सातारा, सांगली, जालना या जिल्ह्यातील २५० मुलांनी तर ६० मुलींनी आपले परिचय करून दिला.
'रेशीमगाठ' स्मरणिकेचे प्रकाशन
याच मेळाव्यात राज्यभरातील लोहार समाजातील उपवर वधू-वरांची माहिती असलेल्या 'रेशीमगाठ' या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी समाजाच्या साप्ताहिक विश्वकर्मा समाचार या साप्ताहिकाचे लोकार्पण करण्यात आले. या साप्ताहिकामार्फत विश्वकर्मा जयंती निमित्त विशेष पुरवणी करण्यात येणार आहे, त्यासाठी समाज बांधवांनी या पुरवणीत आपापल्या व्यवसायाची माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

