प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकारणातील खंबीर नेतृत्व आणि राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या शिरपेचात आज मानाचा तुरा खोवला गेला. पुण्याच्या लोहगाव येथील प्रतिष्ठित अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या १० व्या दीक्षांत समारंभात पंकजाताई मुंडे यांना शैक्षणिक क्षेत्रातील सर्वोच्च 'डी.लिट' (मानद डॉक्टरेट) पदवीने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची आणि प्रशासकीय कौशल्याची दखल घेऊन हा गौरव करण्यात आला आहे.
लोकाभिमुख कार्याची पावती
पंकजाताई मुंडे यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून पर्यावरण आणि पशुसंवर्धन खात्याचा पदभार स्वीकारल्यापासून अनेक धाडसी आणि लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत. सामाजिक कार्यातील त्यांचा सातत्यपूर्ण सहभाग आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण यामुळे त्यांची ओळख एक 'जननेती' म्हणून अधोरेखित झाली आहे. याच सेवेचा सन्मान आज शैक्षणिक व्यासपीठावरून करण्यात आला.
दीक्षांत समारंभाचा थाट
हा सोहळा विद्यापीठाचे कुलपती डॉ. अजिंक्य पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी व्यासपीठावर विशेष अतिथी म्हणून:
श्री धरमकुमार सिरजी (हाय कमिशनर, रिपब्लिक ऑफ गायना)
डॉ. निशिकांत ओझा (मुख्य सल्लागार, इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ)
श्रीमती पूजा पाटील (चेअरमन, डी. वाय. पाटील ग्रुप)
आमदार बापूसाहेब पठारे
यांच्यासह अनेक मान्यवर, प्राध्यापक आणि पदवीप्राप्त विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बीड जिल्ह्यात आनंदाचे वातावरण
पंकजाताई मुंडे यांना मिळालेल्या या जागतिक दर्जाच्या सन्मानामुळे बीड जिल्ह्यात जल्लोषाचे वातावरण असून, आमदार सौ.नमिता मुंदडा, आंबेजोगाई चे नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा काकाजी ,युवा नेते अक्षय मुंदडा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती डॉ वासुदेव नेहरकर, तालुका अध्यक्ष भगवान केदार, सुनील आबा गलांडे, पापा शिंदे, संजय गंभीरे , महादेव सुर्यवंशी यांच्या सह सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध असणाऱ्या नेतृत्वाचा हा गौरव संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.

