‘चला पुस्तक वाचूया’ कवितेने रसिकांची मने जिंकली; मान्यवरांकडून दाद.
एरंडोल | प्रतिनिधी —
जामनेर येथे पार पडलेल्या जिल्हा ग्रामीण युवा साहित्य संमेलनात एरंडोल येथील राष्ट्रीय साहित्य संघाचे संयोजक कवी प्रवीण आधार महाजन यांच्या ‘चला पुस्तक वाचूया’ या कवितेला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कवितेच्या प्रभावामुळे त्यांना दोनदा सादरीकरणाची संधी देत ‘वन्स मोअर’ मिळाला.
संमेलनाध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक व समीक्षक प्रा. डॉ. फुला बागुल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संमेलनात मान्यवर व विद्यार्थी वर्गाने कवितेचे भरभरून कौतुक केले.यावेळी व्यासपीठावर डी.डी. पाटील, प्रा. बी.एन. चौधरी, प्रा. डॉ. एस.आर. महाजन, प्रा. मंगला महाजन, प्रतिभा नरवाडे, डी.एस. चौधरी यांच्यासह साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई आणि जामनेर तालुका साहित्य संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन संपन्न झाले.कार्यक्रमात प्रा. डॉ. फुला बागुल यांच्या हस्ते प्रवीण महाजन यांचा सन्मानचिन्ह व गौरवपत्र देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मोनाली महाजन यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रतिभा नरवाडे यांनी मानले.




