शिर्डीच्या मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना 'बँक ऑफ बडोदा'कडून १ कोटींचा विमा; कंत्राटी व कायम कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला मोठा आधार
शिर्डी (प्रतिनिधी):
बँक ऑफ बडोदा शाखा शिर्डी आणि श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑप सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने शिर्डीत एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना एकूण १ कोटी ३० लाख रुपयांच्या विमा रक्कमेचे वितरण करण्यात येणार असून, शिर्डी व राहाता नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा देखील पार पडणार आहे. हा कार्यक्रम २६ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता हॉटेल गोरडीयाज्, शिर्डी येथे राज्याचे माजी खासदार तथा युवा नेते डॉ. सुजय दादा विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी येथील कर्मचाऱ्यांचे पगार खाते बँक ऑफ बडोदा येथे असून, बँकेमार्फत 'पगार बचत खाते अपघातग्रस्त विमा कवच योजना' राबविली जाते. या योजनेनुसार कायम कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास वारसांना ४० लाख रुपये, तर कंत्राटी कामगाराच्या वारसांना २० लाख रुपये विमा संरक्षण दिले जाते. या निकषांनुसार ३ मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना या कार्यक्रमात एकूण १ कोटी रुपयांचे धनादेश डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात येणार आहेत. यामुळे दुःखात असलेल्या संबंधित कुटुंबांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.
त्याचप्रमाणे, 'श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को. ऑप सोसायटी लि. शिर्डी' यांच्या वतीने देखील संस्थेच्या मयत सभासदांच्या वारसांना नैसर्गिक व अपघाती मृत्यू विमा योजनेअंतर्गत मदत दिली जाणार आहे. सोसायटीच्या वतीने मयत सभासदांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपये याप्रमाणे एकूण ३० लाख रुपयांच्या धनादेशाचे वाटप याच कार्यक्रमात करण्यात येईल.
या मुख्य सोहळ्याचे औचित्य साधून शिर्डी नगरपरिषद व राहाता नगरपरिषद येथील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ देखील डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला आहे. बँक ऑफ बडोदा आणि साई संस्थान को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या या तत्पर मदतीमुळे मयत कर्मचाऱ्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाला सावरण्यासाठी मोठी मदत होणार असल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तरी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
शिर्डी नगरपरिषद व राहाता नगरपरिषद नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.
जाहिरातींसाठी संपर्क करा -
7666675370

