टि२० विश्वचषक २०२६ चा गट टप्पा संपून सुपर ८ ची लढत सुरू होताच स्पर्धेला खरी धार प्राप्त झाली आहे. प्रारंभीच्या विजयांनी आत्मविश्वास वाढवणाऱ्या भारतीय संघासमोर आता केवळ सामने नाहीत, तर अनेक बहुआयामी आव्हाने उभी ठाकली आहेत. सुपर ८ ही फेरी केवळ गुणतालिकेची गणिते ठरवत नाही, तर संघाची मानसिकता, रणनीती, खेळाडूंची जिद्द आणि नेतृत्वाची कसोटी पाहणारी असते. याच टप्प्यावर भारतासमोर सर्वांत मोठा प्रश्न उभा राहतो. आपण खरोखरच विजेतेपदासाठी सज्ज आहोत का?
अपेक्षांचे ओझे आणि मानसिक दबाव
भारतीय क्रिकेट संघ म्हणजे केवळ अकरा खेळाडू नव्हेत, तर कोट्यवधी चाहत्यांच्या अपेक्षांचा महासागर. प्रत्येक विश्वचषकात “यंदा तरी भारत” ही भावना अधिक तीव्र होत जाते. सुपर ८ मध्ये प्रवेश केल्यानंतर हा दबाव अधिकच वाढतो. प्रत्येक चूक, प्रत्येक अपयशी डाव, प्रत्येक चुकीचा निर्णय जनतेच्या आणि माध्यमांच्या न्यायासनावर उभा राहतो. खेळाडूंच्या मनातील हा दबाव खेळात उतरल्यावर त्यांच्या नैसर्गिक क्षमतेला मर्यादा घालतो. टि२० सारख्या झपाट्याच्या खेळात मुक्त मानसिकता अत्यावश्यक असते; मात्र भारतासाठी हीच बाब सर्वांत मोठे आव्हान ठरते.
फलंदाजीतील विस्कळीतपणा
गट टप्प्यात काही सामने जिंकूनही भारतीय फलंदाजीने सातत्य दाखवले आहे असे ठामपणे म्हणता येत नाही. सुरुवातीच्या षटकांत संयम आणि आक्रमकता यांचा समतोल राखण्यात अडचणी येत आहेत. एकीकडे धडाकेबाज फटकेबाजीची अपेक्षा असते, तर दुसरीकडे विकेट वाचवण्याची गरज भासते. या द्वंद्वात अनेक फलंदाज गोंधळलेले दिसतात. मधल्या फळीत धावा गतीमान न झाल्यास शेवटच्या षटकांवर ताण येतो आणि तेथे अनावश्यक धोके पत्करले जातात. सुपर ८ मध्ये प्रत्येक सामना अंतिम सामन्याइतकाच महत्त्वाचा असल्याने हा विस्कळीतपणा परवडणारा नाही.
गोलंदाजीतील अनिश्चितता
भारतीय गोलंदाजी परंपरेने संघाची ताकद राहिली आहे. मात्र टि२० विश्वचषक २०२६ मध्ये काही सामन्यांत गोलंदाजांचा सूर ढासळलेला दिसतो. डेथ ओव्हर्समधील धावांचा पाऊस, नो-बॉल आणि वाईडसारख्या चुका, तसेच फलंदाजांच्या योजनेनुसार बदल न करण्याची प्रवृत्ती भारतासाठी घातक ठरू शकते. सुपर ८ मध्ये समोर असलेले संघ तांत्रिकदृष्ट्या अधिक सक्षम आणि मानसिकदृष्ट्या अधिक कणखर असतात. त्यामुळे गोलंदाजांनी केवळ वेग किंवा फिरकीवर नव्हे, तर डावपेच आणि बुद्धीवर भर देणे गरजेचे आहे.
फिरकीची धार बोथट होण्याचा धोका
भारतीय क्रिकेटची ओळख म्हणजे फिरकी. मात्र या विश्वचषकात अनेक खेळपट्टया फलंदाजांसाठी अनुकूल आहेत. अशा परिस्थितीत फिरकी गोलंदाजीचा प्रभाव कमी होतो. सुपर ८ मध्ये भारताला फिरकीवर अवलंबून राहून चालणार नाही. वेगवान गोलंदाजांनी सुरुवातीच्या षटकांत विकेट्स घेणे आणि मधल्या टप्प्यात धावांचा वेग रोखणे अत्यावश्यक ठरणार आहे. अन्यथा प्रतिस्पर्धी संघ मोठी धावसंख्या उभारून भारताला दबावाखाली टाकू शकतात.
नेतृत्व आणि निर्णयक्षमता
सुपर ८ मध्ये प्रत्येक निर्णय सामन्याची दिशा बदलू शकतो. फलंदाजी क्रमात बदल, गोलंदाजांची निवड, क्षेत्ररक्षणातील मांडणी या सर्व बाबींत कर्णधाराची भूमिका निर्णायक ठरते. भारतीय संघाकडे अनुभव आहे, मात्र काही वेळा अतिसावध किंवा अतिआक्रमक निर्णय संघाला अडचणीत आणतात. कर्णधाराने संघातील खेळाडूंवर विश्वास ठेवून त्यांना मुक्तपणे खेळण्याची मुभा देणे ही काळाची गरज आहे.
क्षेत्ररक्षण : दुर्लक्षित पण निर्णायक घटक
टि२० क्रिकेटमध्ये एका झेलाची किंवा एका धाव रोखण्याची किंमत अनेकदा सामन्याचा निकाल ठरवते. भारताचे क्षेत्ररक्षण काही सामन्यांत प्रभावी ठरले असले तरी सातत्याचा अभाव जाणवतो. सोपे झेल सुटणे, थ्रोमध्ये अचूकतेचा अभाव आणि सीमारेषेजवळील चुका या गोष्टी सुपर ८ मध्ये महागात पडू शकतात. क्षेत्ररक्षण हा केवळ पूरक घटक नसून तो विजयाचा कणा ठरू शकतो, याची जाणीव भारतीय संघाने ठेवणे आवश्यक आहे.
प्रतिस्पर्ध्यांची वाढती ताकद
सुपर ८ मध्ये भारताला पारंपरिक बलाढ्य संघांसोबतच आत्मविश्वासाने खेळणाऱ्या नव्या आव्हानांचा सामना करावा लागतो. दक्षिण आफ्रिकेची सर्व क्षेत्रातील ताकद. वेस्ट इंडिजचा रांगडेपणा व झिंबाब्वेची नवी उभारी या सर्व घटकांमुळे भारतासाठी मार्ग सोपा नाही. प्रत्येक संघ भारताला पराभूत करण्यासाठी विशेष रणनीती आखून मैदानात उतरणार हे शंभर टक्के सत्य आहे.
खेळपट्टी आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे आव्हान
विश्वचषकातील सामने विविध प्रकारचे वातावरण व खेळपट्टया होत असल्याने परिस्थिती झपाट्याने बदलते. कधी वेगवान गोलंदाजांना मदत, कधी फिरकीला, तर कधी फलंदाजांसाठी स्वर्गसमान परिस्थिती. भारतीय संघाने या बदलांना त्वरेने आत्मसात करणे आवश्यक आहे. एकाच रणनीतीवर अवलंबून राहिल्यास सुपर ८ मध्ये अपयश पदरी पडू शकते.
दुखापती आणि खेळाडूंची तंदुरुस्ती
दीर्घ स्पर्धेत दुखापती हा अनिवार्य घटक ठरतो. सुपर ८ मध्ये थकवा, ताणतणाव आणि सततचे सामने यांचा परिणाम खेळाडूंच्या तंदुरुस्तीवर होतो. प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यास संघाची संपूर्ण रचना विस्कळीत होऊ शकते. त्यामुळे योग्य विश्रांती, फिरवणूक आणि वैकल्पिक खेळाडूंचा वापर ही रणनीती भारतासाठी महत्त्वाची ठरणार आहे.
इतिहासाची सावली
मागील काही विश्वचषकांतील अपयशांची आठवण अजूनही भारतीय चाहत्यांच्या मनात ताजी आहे. निर्णायक सामन्यांत झालेली घसरण, उपांत्य फेरीतील पराभव हे सारे इतिहास भारताच्या पाठीशी उभे आहेत. सुपर ८ मध्ये खेळताना या आठवणी खेळाडूंच्या मनात नकळत डोकावतात. या मानसिक अडथळ्यांवर मात करणे हे भारतासमोरील सर्वांत कठीण आव्हान आहे.
निष्कर्ष : संधीही तितकीच मोठी
सर्व आव्हानांनंतरही भारताकडे अपार गुणवत्ता, अनुभव आणि क्षमता आहे. सुपर ८ ही केवळ अडचणींची यादी नसून, स्वतःला सिद्ध करण्याची सुवर्णसंधी आहे. जर भारतीय संघाने दबाव झुगारून दिला, फलंदाजी-गोलंदाजी-क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर समतोल साधला आणि परिस्थितीनुसार निर्णय घेतले, तर टि२० विश्वचषक २०२६ मधील विजेतेपदाचे स्वप्न साकार होऊ शकते.
सुपर ८ मधील प्रत्येक सामना भारतासाठी परीक्षा आहे. केवळ क्रिकेट कौशल्याची नव्हे, तर मानसिक कणखरतेची, नेतृत्वाची आणि संघभावनेची. या परीक्षेत यश मिळाले, तर भारत पुन्हा एकदा जगज्जेता होण्याच्या मार्गावर ठाम पाऊल टाकू शकेल.
भारत विद्यमान विश्वविजेता आहे व त्या संघातील बरेचसे खेळाडू आजही संघात असल्याने जुन्या अनुभवाचा कस ते लावतीलच यात तिळमात्र शंका नाही. मात्र हे करताना कुठलाच अनुचित प्रकार घडू नये अशी अपेक्षा.
@डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
मो. क्रं - ९०९६३७२०८२.

