नागलीचे भाव वधारले, तरीही महागाईवर मात करत साखळी पद्धतीने सुरू आहे पापड, कुरडया बनवण्याची लगबग
नगर प्रतिनिधी : ( तुषार महाजन )
उन्हाळ्याची चाहूल लागताच सामोडे येथील दत्त नगर, राम नगर, विठ्ठल नगर आणि इंदिरा नगर या भागांमध्ये उन्हाळी वाळवणाचे पदार्थ बनवण्याच्या कामांना कमालीचा वेग आला आहे. सध्या घरोघरी नागलीचे पापड, गव्हाचे वडे, तिखट वडे आणि कुरडया बनवण्याची लगबग जोरात सुरू असून, या पारंपरिक कामांत परिसरातील महिला मोठ्या उत्साहाने मग्न असल्याचे विलोभनीय चित्र पाहायला मिळत आहे.
विशेष म्हणजे, या श्रमाच्या कामांसाठी महिलांनी एक अनोखा आणि कौतुकास्पद सामूहिक मार्ग अवलंबला आहे. गल्लीतील १० ते १२ महिला एकत्र येऊन आळीपाळीने एकमेकींच्या घरी जाऊन (पडजी करून) पापड आणि वडे बनवण्याचे काम करत आहेत. पहाटे ५ वाजल्यापासूनच या कामाला उत्साहात सुरुवात होते आणि दुपारचे १२ वाजेपर्यंत हसत-खेळत सर्व कामे आटोपली जातात. या साखळी पद्धतीमुळे श्रमांची विभागणी होऊन कामे जलद आणि आनंदात पार पडत आहेत.
सध्या बाजारात नागलीचे भाव गगनाला भिडले आहेत. २०० रुपये प्रती चंपे असा दर असून, त्यासाठी लागणारा इतर खर्चही मोठा आहे. वाढत्या महागाईची झळ बसत असली, तरी वर्षभरासाठी आणि दैनंदिन आहारात लागणाऱ्या या पारंपरिक पदार्थांची निर्मिती महिला तितक्याच आवडीने करत आहेत. महागाईवर मात करत, "एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ" या वचनाची प्रचिती सामोडे परिसरातील या महिला भगिनींच्या एकजुटीतून आणि उत्साहातून खऱ्या अर्थाने पाहायला मिळत आहे.

