साईभक्तांची सेवा करणाऱ्यांचे 'आरोग्य' वाऱ्यावर? मोफत उपचारांसाठी एम्प्लॉईज सोसायटीचे प्रशासनाला साकडे
शिर्डी प्रतिनिधी : ( तुषार महाजन )
साईबाबा संस्थानमध्ये लाखो भक्त येतात, त्यांची सेवा सुलभ व्हावी म्हणून संस्थानच्या आवारात मोबाईल-कॅमेरा क्लोकरूम, चप्पल स्टँड, प्रसादालय आणि विविध स्टॉल्स रात्रंदिवस कार्यरत असतात. हे स्टॉल्स चालवणाऱ्या साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीचे कर्मचारी अत्यंत अल्प पगारात आपली सेवा बजावत आहेत. मात्र या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला हक्काची वैद्यकीय सुविधा नसल्याने आजारपणाच्या संकटात या कुटुंबांची आर्थिक घडी विस्कटत आहे.
आम्हालाही संस्थानच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच साईनाथ आणि साईबाबा रुग्णालयात मोफत उपचार मिळावेत, अशी भावनिक मागणी करण्यात आली आहे.
क्रेडिट सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार यांनी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांना यासंदर्भात नुकतेच पत्र दिले. यावेळी संचालक रामा गागरे, सचिव विलास वाणी, जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे उपस्थित होते.
सोसायटी कर्मचारी दिवसभर देश-विदेशातून येणाऱ्या हजारो भक्तांना सेवा देत असतात. तुटपुंज्या पगारात घरखर्च चालवताना कुटुंबातील एखाद्या सदस्याला मोठे आजारपण आले तर खासगी रुग्णालयाचे बिल भरताना या कर्मचाऱ्यांचे कंबरडे मोडते. उपचारासाठी हमखास कर्ज काढण्याची वेळ येते. जे हात भक्तांची सेवा करतात, तेच हात आज हक्काच्या उपचारांसाठी प्रशासनाकडे जोडले जात आहेत.
या कर्मचाऱ्यांच्या कार्याची व व्यथेची दखल घेऊन त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला माणुसकीच्या नात्याने वैद्यकीय कवच उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. साईंच्या दरबारात कुणीही उपाशी राहत नाही, तसाच रात्रंदिवस राबणाऱ्या या सेवाधाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्नही सोडवावा, अशी मागणी केली जात आहे.
व्यथित कर्मचाऱ्याची प्रतिक्रिया:
"आम्ही साईबाबा संस्थानचाच एक भाग म्हणून राबत आहोत. आमच्या अत्यल्प पगारात महागडे उपचार घेणे अशक्य आहे. प्रशासनाने आम्हाला केवळ कामगार न समजता साई परिवाराचा हिस्सा मानून वैद्यकीय सुविधेचा निर्णय घ्यावा, हीच आमची विनंती आहे."
- रमेश वाघे, व्यथित कर्मचारी

